भारतात गेल्या मासात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली. ‘या निवडणुकीत भाजप आघाडीला ४०० हून अधिक जागा मिळू शकतात’, असे मतदानोत्तर चाचणीतून सांगण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात भाजप आघाडीला २९२ जागाच मिळाल्या. अशीच काहीशी स्थिती फ्रान्समध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर दिसून आली आहे. या निवडणुकीत नॅशनल रॅली (राष्ट्रीय मोर्चा) या पक्षाला बहुमत मिळून तो सत्तेवर येण्याचे अंदाज मतदानोत्तर चाचण्यांतून सांगण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात ‘पॉप्युलर फ्रंट’ या साम्यवादी आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या असून नॅशनल रॅली दुसर्या क्रमांकावर गेली आहे. त्यामुळे देशात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. या निकालानंतर लगेच देशात अनेक ठिकाणी हिंसाचार चालू झाला. या हिंसाचारामागे कोण आहेत ? हे अद्याप समजू शकलेले नसले, तरी साम्यवादीच असतील असे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे ‘नॅशनल रॅली पक्षाला बहुमत मिळाल्यावर फ्रान्समध्ये दंगली होतील’, अशी भीती काही दिवसांपासून व्यक्त करण्यात येत होती. प्रत्यक्षात या पक्षाला बहुमत मिळाले नसले, तरी दंगली चालू झाल्या आहेत. नॅशनल रॅली हा पक्ष उजव्या म्हणजे प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीचा पक्ष मानला जातो. या पक्षाला गेल्या ४० वर्षांत देशात सत्ता मिळवता आलेली नाही. ‘राष्ट्रवादी विचारसरणीमुळेच देशात दंगली होतील’, असे सांगण्यात आले होते; कारण फ्रान्समधील डावे, तसेच कट्टरतावादी मुसलमान यांना नॅशनल रॅली पक्षाची सत्ता नको आहे. ‘हा पक्ष हरण्यामागे मुसलमानांची एकगठ्ठा मते आहेत का ?’, याचाही शोध घेतला जाईल, हे नक्की; कारण ज्या प्रकारे भारतात भाजपला मागील निवडणुकीच्या तुलनेत, तसेच अंदाजानुसार अपेक्षित यश न मिळण्यामागे मुसलमानांची एकगठ्ठा मते कारणीभूत ठरली आहेत, तसेच फ्रान्समध्येही असणार, यात शंका नाही. युरोपमधील देशांपैकी फ्रान्समध्येच सर्वाधिक मुसलमान रहातात. फ्रान्सच्या लोकसंख्येच्या ८-९ टक्के मुसलमान आहेत. त्यामुळे फ्रान्समध्ये नेहमीच या धर्मांधांकडून दंगली होत असतात. फ्रान्समध्ये मोरोक्कोसारख्या इस्लामी देशांतून आलेले निर्वासित मुसलमान मोठ्या संख्येने आहेत. त्याचसमवेत अन्य देशांतून आलेले मुसलमानही आहेत. यापूर्वी मुसलमानांकडून ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) करण्याच्याही काही घटना घडल्या आहेत. ‘शार्ली हेब्दो’ या नियतकालिकाच्या विरोधातील जिहादी आतंकवादी आक्रमणात १३ जण ठार झाले होते. यातून फ्रान्स युरोपमधील जिहाद्यांमुळे संवेदनशील देश ठरला आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये या वेळी प्रखर राष्ट्रवादी नॅशनल रॅली सत्तेवर येण्याची शक्यता होती; मात्र तसे होऊ शकले नाही. फ्रान्समध्ये आता कुणाचे सरकार स्थापन होईल ? हे सांगता येणार नाही; कारण साम्यवादी आघाडी आणि नॅशनल रॅली यांच्यात युती होऊच शकत नाही. तिसर्या क्रमांकावर सध्याचे राष्ट्रपती इमॅन्युअर मॅक्रॉन यांचा पक्ष आहे. तो कुणाचे समर्थन करतो, हे पहावे लागेल. मॅक्रॉन यांची मानसिकता किंवा त्यांच्या पक्षाचे धोरण लक्षात घेता नॅशनल रॅलीला समर्थन दिले जाईल, असे वाटत नाही. त्यामुळे फ्रान्समध्ये पुन्हा निवडणुका झाल्यास आश्चर्य वाटणार नाही आणि ते कदाचित् फ्रान्ससाठी योग्य ठरेल; कारण निवडणुकीच्या निकालानंतरच देशात दंगली चालू झाल्या. तशा दंगली जर साम्यवादी आघाडी सरकार सत्तेवर आले, तर झाल्यास फ्रान्सच्या शांततेसाठी मोठा प्रश्न निर्माण होईल. भारतातही असेच आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप या मुसलमानप्रेमी आणि हिंदुविरोधी पक्षांची सरकारे ज्या राज्यांत येतात, तेव्हा तेथे दंगली होतात, हे नवीन राहिलेले नाही. बंगालसारख्या राज्यात हिंदूंचे अस्तित्व येत्या काही वर्षांत राहील का ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ‘जे भारतात होत आहे, ते पुढे युरोपमध्ये होईल’, असे कुणी म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये.
प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीला समर्थन !
फ्रान्सच्या निवडणुकीचा विचार करता गेल्या काही वर्षांत युरोपमधील राजकीय स्थितीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. काही आठवड्यांपूर्वीच युरोपीय संघाच्या निवडणुकीत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाला सर्वाधिक मते मिळाली. मेलोनी प्रखर राष्ट्रवादी म्हणजे उजव्या विचारसरणीच्या म्हटल्या जातात. त्यापूर्वी नेदरलँड्समध्ये गीर्ट विल्डर्स यांच्या ‘पार्टी फॉर फ्रिडम्’ या उजव्या विचारसरणीच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. विल्डर्स नेदरलँड्सचे पंतप्रधान होऊ शकतात, अशी स्थिती आहे. ब्रिटनमध्ये साम्यवादी विचारसरणीचा मजूर पक्ष सत्तेवर आला असला, तरी त्याचे नेते आणि पंतप्रधान झालेले किर स्टार्मर यांनी त्यांच्या पक्षाच्या विचारसरणीत मोठा पालट केला आहे. मजूर पक्ष भारताला महत्त्व देत नव्हता, तसेच तेथील हिंदूंचे समर्थन करत नव्हता; मात्र आता स्टार्मर यांनी हिंदूंचे समर्थन करण्यास प्रारंभ केला आहे. भारताशीही चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. युरोपमध्ये उजव्या विचारसरणीला सहसा लोकांकडून समर्थन मिळत नाही; मात्र गेल्या काही वर्षांपासून हे चित्र पालटले जात आहे, असे दिसून येत आहे. याला कारण मध्य-पूर्वेतून युरोपमध्ये मुसलमानांचे झालेले स्थलांतर आणि त्यांच्याकडून देशातील कायदा आणि सुव्यवस्थेला, तसेच देशाला निर्माण झालेला धोका, हे आहे. येथे कट्टर ख्रिस्तीवाद नाही, तर प्रखर राष्ट्रवाद आणि धर्मांध मुसलमानांना विरोध, अशी विचारसरणी निर्माण होत आहे. युरोपच नाही, तर अमेरिकेतही असेच होत आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रखर राष्ट्रवादी आहेत. त्यांनी राष्ट्राध्यक्ष असतांना मुसलमानांवर अनेक बंधने लावली होती. आता पुन्हा ते निवडणुकीला उभे रहात आहेत आणि त्यांना याच विचारसरणीमुळे चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे इराणमध्ये हिजाबविरोधी असणारे मसूद पजश्कियान राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. याचाच अर्थ ते कट्टरतावादी मुसलमानांचे समर्थन करत नाहीत, असाच आहे. उजव्या विचारसरणीच्या पक्षांचीही हीच भूमिका आहे.
उजवी विचारसरणी असलेल्यांनी एकत्र यावे !
जगात जिहादी आतंकवाद गेल्या अनेक दशकांपासून तापदायक ठरला आहे. आता जिहादी मानसिकताही तापदायक ठरत आहे, हे युरोपमधील स्थितीवरून लक्षात येते. जेव्हा भारत यात भरडला जात होता, तेव्हा हेच देश भारताला उपदेश करत होते. आता हेच देश जात्यात पोचले आहेत. या पार्श्वभूमीवर जगातील सर्व उजव्या आणि प्रखर राष्ट्रवादी पक्षांनी संघटित होऊन जागतिक स्तरावर आघाडी निर्माण करून इस्लामी आतंकवाद आणि जिहादी मानसिकता यांचा निःपात करण्यासाठी ध्येय ठेवून प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीच्या विचारवंतांना समवेत घेतले पाहिजे. त्यासाठी युरोपमधून पुढाकार घेतला गेला, तर त्याचा परिणाम अधिक होईल. यातून दबाव निर्माण होऊन जिहादच्या विरोधात सामूहिकपणे सर्व पातळ्यांवर म्हणजे धर्मांतर, लव्ह जिहाद, ग्रूमिंग जिहाद, लोकसंख्या जिहाद आदींच्या विरोधात लढता येईल.
जिहाद आणि साम्यवाद यांविरोधात लढण्यासाठी जागतिक स्तरावर उजवी विचारसरणी असलेल्यांनी एकत्र येण्याला पर्याय नाही ! |