MP Madrasa Weekly Off : मध्‍यप्रदेशातील मदरशांमध्‍ये रविवार ऐवजी शुक्रवारी दिली जाते सुटी !

९ सहस्र हिंदू घेतात मदरशांत शिक्षण !

भोपाळ (मध्‍यप्रदेश) – मध्‍यप्रदेश बाल आयोगाच्‍या सदस्‍या निवेदिता शर्मा यांनी श्‍योपूर कलान जिल्‍ह्यात तपासणी केली असता येथील मदरसा संचालक मनमानीपणे वागत असल्‍याचे आढळून आले. मदरशांमध्‍ये रविवारी ऐवजी शुक्रवारी सुट्टी दिली जाते, तर रविवारी मदरसा चालू ठेवला जातो. बाल आयोगाने मदरशांच्‍या मनमानीपणावर आक्षेप घेतला आहे. मध्‍यप्रदेशात सुमारे दीड सहस्र मदरसे सरकारशी संलग्‍न आहेत, त्‍यांना अनुदानही मिळते. आश्‍चर्याची गोष्‍ट म्‍हणजे राष्‍ट्रीय बाल संरक्षण अधिकार आयोगाच्‍या अहवालानुसार राज्‍यातील मदरशांमध्‍ये जवळपास ९ सहस्र हिंदु मुले शिक्षण घेतात. (हिंदु पालक स्‍वतःच्‍या मुलांना मदरशांमध्‍ये पाठवून आत्‍मघात करून घेत आहेत ! – संपादक)

१. मदरशांमध्‍ये मुसलमानांसह हिंदु मुलेही शिक्षण घेत असले, तरी मदरसाचालकांनी सरकारी नियमांकडे दुर्लक्ष करून शुक्रवारी सुटी घोषित केली आहे. रविवारी सरकारी सुटीच्‍या दिवशी मदरसा उघडतो. मदरशातील हिंदु मुलांचे चांगले भविष्‍य घडवण्‍याचा दावा करत असले, तरी हिंदु मुलांच्‍या शिक्षणाशी त्‍यांना काहीही देणेघेणे नाही, असे समोर आले आहे. आश्‍चर्याची गोष्‍ट म्‍हणजे मदरशांमध्‍ये महापुरुषांचे छायाचित्रे कुठेही दिसत नाहीत.

२. मध्‍यप्रदेशात मदरशांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असे शालेय शिक्षणमंत्री उदय प्रताप सिंह यांनी सांगितले. ते म्‍हणाले की, मदरशांना शालेय शिक्षण विभागाच्‍या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. मध्‍यप्रदेशात कोणीही आपल्‍या इच्‍छेनुसार सुटी घेऊ शकत नाही. शासकीय सुटी रविवार असून त्‍याच दिवशी सुटी ठेवावी लागणार आहे. नियम आणि कायदे सर्वांसाठी समान आहेत. प्रत्‍येकाला त्‍याचे पालन करावे लागेल, विभाग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल. (सरकारने अशा मदरशांवर कारवाई करावी. त्‍यांना देण्‍यात येणारे अनुदान बंद करावे, तरच त्‍याचा काहीतरी परिणाम होईल ! – संपादक)

३. काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री लखन घंघोरिया मदरशांच्‍या प्रकरणी म्‍हणाले की, प्रत्‍येकाला निर्णय घेण्‍याचे स्‍वातंत्र्य आहे. (काँग्रेसचे मुसलमानप्रेम ! अशा मुसलनाप्रेमी काँग्रेसवाल्‍यांना हिंदू मत देतात आणि आत्‍मघात करवून घेतात ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • मध्‍यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना आणि मदरशांना सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जात असतांना प्रशासन याकडे पहात कसे नाही ?
  • मुळात धर्मनिरपेक्ष देशात धर्माचे शिक्षण देणार्‍या मदरशांना सरकार अनुदान देतेच कसे ?

मदरशांमध्‍ये देशद्रोहाचे काम चालू आहे ! – भाजपच्‍या आमदार उषा ठाकूर

मदरशांमध्‍ये देशद्रोहाचे काम चालू आहे. आसाम आणि जम्‍मू काश्‍मीर राज्‍यांमध्‍ये काय चालले आहे, ते तुम्‍ही पाहिले आहे. आधुनिक तंत्रशिक्षणाच्‍या युगात मदरशांना शिक्षणाशी जोडणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. अनेक मदरसे शिक्षण मंडळाच्‍या अनुमतीविना चालू आहेत. एका छोट्या खोलीत ३० ते ४० मुले अभ्‍यास करतात. यामुळे मानवी तस्‍करीची शक्‍यता वाढते, ज्‍याविषयी सरकार सतर्क आहे.

संपादकीय भूमिका

भाजपच्‍या आमदारांना हे ठाऊक आहे, तर त्‍यांनी सरकारवर दबाव टाकून मदरसे बंद करण्‍यासाठी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !