अधिकोषातील भ्रष्टाचारप्रकरणी सदावर्ते पती-पत्नीला त्वरित अटक करा !

एस्.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांची मागणी

पुणे – एस्.टी. कामगार सहकारी अधिकोषात सदावर्ते पती-पत्नीने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्या दोघांनाही तात्काळ अटक करा, या मागणीसाठी पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयाबाहेर एस्.टी. कामगार संघटनेने आंदोलन केले. आशिया खंडामध्ये क्रमांक एकच्या असलेल्या अधिकोषाचे या दोघांनी वाटोळे केले आहे. संचालक मंडळाने बेहिशेबी कर्ज प्रकरणे केली आहेत. आमच्या मुलांना गेल्या ८ महिन्यांपासून शिक्षण, लग्न यांसाठी कर्ज मिळत नाही. १५० कर्मचार्‍यांची भरती करून लाखो रुपये गोळा केल्याचाही आरोप या वेळी करण्यात आला.

गुणवर्ते यांचे संचालकपद रहित केले आहे. त्यामुळे त्यांनी अधिकोषाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करू नये. अधिकोषाचे ‘डेटा सेंटर’ करण्याचे काम सदावर्ते यांनी एका आस्थापनाला दिले आहे, त्याचीही पडताळणी करण्याची मागणी या वेळी एस्.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे.