संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे लोणंद येथे आज नीरा नदीत स्नान होणार !

प्रतिकात्मक चित्र

लोणंद (सातारा) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा लोणंद येथे ६ आणि ७ जुलै या दिवशी मुक्काम (विसावा) आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणंदनगरी सज्ज झाली आहे. माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमत: माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या दत्त घाटावर स्नान घालण्यात येते. ही अनेक वर्षांची परंपरा आहे. वारीच्या मार्गांमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना ३ वेळा स्नान घालण्यात येते. प्रथम आळंदीतून प्रस्थान होण्याआधी इंद्रायणी नदीमध्ये, दुसरे निरा नदीमध्ये, तर तिसरे स्नान पंढरपूरला पोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये घातले जाते.

वारकरी आणि भाविक यांना विविध सुविधा देण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही पूर्ण झाली असून पालखी तळाच्या सपाटीकरणाचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. पाडेगाव या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रावर पाणीपुरवठ्याची आणि दिंड्यांतील टँकर भरण्याची व्यवस्था, पालखी तळावर पाणीपुरवठा, स्वच्छता, दर्शन रांगा, धोबीघाट, वीजपुरवठा, तसेच शौचालय आणि स्नानगृह उभारणीचे काम पूर्ण केले आहे.