‘आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालया’च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह ५ जणांवर गुन्हा नोंद !

पिंपरी – निरीक्षण आणि पडताळणीसाठी आलेल्या शासकीय पथकाला माहिती देणे बंधनकारक असतांना सहकार्य न केल्याच्या प्रकरणी ‘आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक यांच्यासह ५ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी राधेश्याम पडलवार यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयान्वये योजनेची कार्यवाही पारदर्शकपणे होत आहे ना ? हे पडताळण्यासाठी राज्यस्तरीय ‘विशेष मदत कक्ष’ स्थापन केला आहे. त्यानुसार निर्धन आणि दुर्बल घटकांतील रुग्णांवर विनामूल्य, तसेच सवलतीच्या दराने उपचार होत आहेत ना ? या संबंधी निरीक्षण आणि पडताळणी करण्यासाठी तक्रारदारांचे पथक ‘आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालया’त आले होते. त्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश गुप्ता, महाव्यवस्थापक संदीपकुमार सिंह आणि वैद्यकीय समाजसेवक संचित सूर्यवंशी यांनी सरकारी काम करतांना त्यांना अटकाव केला. धर्मादाय रुग्णालयाने साहाय्य करणे, कागदपत्रे पुरवणे, तसेच शासनाच्या आदेशाची पूर्तता करणे क्रमप्राप्त असतांनाही कोणत्याही आदेशाचे पालन न करता ते रुग्णालयातून निघून गेले. त्यांच्यातील एका अनोळखी महिलेने तपासणी पथकास धमकावले. (रुग्णालयातील अनागोंदी कारभाराच्या संदर्भात बरेच प्रसंग घडूनही कारवाई न झाल्याने रुग्णालयांचे फावते. हे सर्व थांबवण्यासाठी रुग्णालयाची पारदर्शकता पडताळून त्वरित कारवाई व्हायला हवी. – संपादक) या सर्व प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून वाकड पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी दिली.

‘रुग्णालय प्रशासनाने समितीला सर्व कागदपत्रे सादर केली असून कोणत्याही सरकारी कामात अडथळा निर्माण केला नाही. समितीला नेहमीच पारदर्शक पद्धतीने सहकार्य करण्याची भूमिका रुग्णालयाने घेतली आहे’, असे आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पमेश गुप्ता यांनी सांगितले.