‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘समाजसाहाय्य उपक्रमा’च्या अंतर्गत आयोजन
कुडाळ – हिंदु जनजागृती समितीच्या ‘समाजसाहाय्य उपक्रमा’च्या अंतर्गत ‘सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळ’ प्राधिकरणाच्या कर्मचार्यांकरता २६ जून २०२४ या दिवशी एक दिवसाचे प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन विमानतळ प्राधिकरणाचे मुख्याधिकारी कुलदीप सिंग यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेला भावपूर्ण पुष्प अर्पण करून करण्यात आले. या वेळी साहाय्यक मुख्याधिकारी रॉय आणि ‘आय.आर्.बी.’ या विमानतळ संचालक आस्थापनाचे मुंबई प्रतिनिधी रोनित शेट्टी, विमानतळ आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अधिकारी मनु मोहन आणि विमानतळ रुग्णवाहिका अधिकारी सौ. रश्मी नायर यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी आदी ६५ जण उपस्थित होते.
या वेळी सौ. अनुश्री गावस्कर यांनी ‘समाजाला साहाय्यभूत ठरणारे प्रथमोचार, स्वसंरक्षण प्रशिक्षण, आरोग्य साहाय्यता आदी उपक्रम हिंदु जनजागृती समिती विनामूल्य आयोजित करते’, असे सांगितले. शिबिराच्या पहिल्या सत्रात संकटग्रस्त व्यक्तीचे प्राथमिक परीक्षण, प्रथमोपचाराची मूलभूत तत्त्वे, कृत्रिम पद्धतीने हृदयश्वसनक्रियेचे पुनरुज्जीवन (CPR) यांची माहिती देऊन प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. दुसर्या सत्रात उंचावरून पडणे, अपघात आदींमध्ये होणार्या ‘मज्जारज्जू आघाता’विषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. राजेंद्र गावस्कर, सौ. धनश्री सोन्सुरकर यांनीही या वेळी मागदर्शन केले. सौ. श्यामल करंगुटकर यांचे बहुमोल साहाय्य लाभले. या वेळी सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘प्रथमोपचार ग्रंथा’विषयी माहिती देण्यात आली. मुख्याधिकारी सिंग यांनी ‘आमचा प्रत्येक कर्मचारी सर्वांगीण सक्षम व्हावा’, अशी मनीषा व्यक्त करून यासाठी हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या योगदानाविषयी आभार मानले. यासह ‘आगामी काळात पुन्हा असे शिबिर आयोजित व्हावे’, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिबिरात उपस्थित काही स्थानिकांनी त्यांच्या गावात असे शिबिर आयेजित करण्यासाठी सिद्धता दर्शवली.