जगातील अनेक संस्कृतीत निसर्गपूजेला स्थान दिलेले आढळते. यातून लक्षात येते की, पर्यावरणरक्षण आणि संवर्धन यांचे महत्त्व आपल्या पूर्वजांना आधीपासूनच ठाऊक होते. मागील शंभर-दीडशे वर्षांत औद्योगीकरण आणि जागतिकीकरण यांमुळे प्रचंड प्रमाणात पर्यावरणाचा र्हास झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जीवसृष्टीला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जागतिक तापमानवाढ, चक्रीवादळ, त्सुनामी इत्यादी त्याचेच परिणाम आहेत.
अनेक पशू-पक्षांच्या प्रजाती आधीच नष्ट झाल्या आहेत, तर आणखी शेकडो प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या १०० वर्षांतील सरासरीपेक्षा वर्ष २०२३ चे तापमान २.१२ अंशाने अधिक होते. प्रतिवर्षी १०० अब्ज टन बर्फ वितळत आहे. त्यामुळे समुद्रपातळीत वाढ होत आहे. अनेक शास्त्रज्ञांनी भीती व्यक्त केली आहे की, जर वर्ष २०३० पर्यंत असेच चालू राहिले, तर आपण कधीही पर्यावरणाला पूर्वस्थितीत आणू शकणार नाही.
असे झालेच, तर आपण येणार्या पिढ्यांसाठी किती भयानक परिस्थिती निर्माण करणार आहोत, याची कल्पनाच न केलेली बरी ! हाच संदर्भ घेऊन ‘टाटा चहा आस्थापना’ने एक विज्ञापन बनवले आहे. त्यात शालेय स्नेहसंमेलनात विद्यार्थी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देतांना दिसत आहेत. ते पाहून त्यांच्या पालकांनाही आश्चर्य वाटून ते अंतर्मुख होतात. सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने दिलेला हा संदेश कौतुकास्पद आहेच; परंतु आपण केवळ चर्चा करून विसरून जाण्याचा हा विषय नाही.
जगभरात या विषयावर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. ‘संयुक्त राष्ट्रां’नी यंदाच्या वर्षी पर्यावरणाविषयीचा २९ वा परिसंवाद ११ ते २२ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आयोजित केला आहे. यातून जगभरातील सर्व देश पर्यावरणरक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन तात्काळ प्रयत्न करतील, ही अपेक्षा आहे; परंतु एक सजग नागरिक म्हणून ‘मी काय करू शकतो ?’, याचा विचार प्रत्येकाने करायलाच हवा. मी प्लास्टिकचा किती प्रमाणात
वापर करतो ? प्लास्टिकचा वापर करणार्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो का ? प्रदूषण करणार्यांना मी थांबवतो का ? मी कचर्याची विल्हेवाट कशी लावतो ? मी कुठल्या प्रदूषणाला चालना देतो ? मी वातानुकूलन यंत्रांचा वापर न्यूनतम करून त्यासाठी इतरांना प्रेरित करतो का ? मी प्रदूषण करणार्या वाहनांचा वापर न्यून करतो का ? मी नदीप्रदूषण रोखण्यासाठी काय करतो ? असे प्रश्न प्रत्येक नागरिकाने स्वतःला विचारायला हवेत. स्वतःच्या परिसरात प्रदूषण होणार नाही किंवा असलेले प्रदूषण अल्प करण्यासाठी लोकांना संघटित करून काय प्रयत्न करू शकतो ? असा प्रत्येक नागरिकाने विचार करायला हवा.
– श्री. किशोरकुमार जगताप, पुणे