सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याची साधिकेला आलेली प्रचिती !

श्रीमती मधुरा तोफखाने

१. स्वभावदोषांमुळे निर्णय घेता न आल्याने साधिकेच्या अनाहतचक्रावर अनिष्ट शक्तीचे आवरण येऊन छातीत वेदना होणे

‘मी काही काळ मिरज आश्रमात रहायला आले होते. तेव्हा मला साधनेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे होते. ते निर्णय मला घेता येत नव्हते. ‘भावनाशीलता आणि काळजी करणे’ या स्वभावदोषांमुळे माझ्या मनात विचारांचे वादळ चालू होते. त्यामुळे माझ्या अनाहतचक्रावर अनिष्ट शक्तीचे पुष्कळ आवरण येऊन छातीत तीव्र वेदना होत होत्या. मी गुरुदेवांच्या चरणी सारखी शरण जात होते; पण माझे मन अस्थिर होते.

२. अनाहतचक्रावरील अनिष्ट शक्तीचे आवरण काढतांना साधिकेला त्रास होऊ लागल्यावर सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांनी साधिकेसाठी नामजपादी उपाय करणे 

१०.१२.२०२३ या दिवशी मिरज आश्रमात मी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांना माझी अडचण सांगितली. तेव्हा त्यांनी मला अनाहतचक्रावरील अनिष्ट शक्तीचे आवरण काढायला सांगितले. मी आवरण काढायला चालू केल्यावर मला पुष्कळ त्रास होऊ लागला. त्या वेळी सद्गुरु पिंगळेकाका यांनी नामजपादी उपाय करून माझ्यावरील आवरण काढायला आरंभ केला.

३. सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांनी केलेल्या नामजपादी उपायांमुळे साधिकेचा त्रास नष्ट होऊन तिला साधनेविषयी योग्य तो निर्णय घेता येणे

सद्गुरु पिंगळेकाका माझ्यापासून ५ – ६ फूट दूर बसून नामजपादी उपाय  करत होते, तरीही माझ्या अनाहतचक्रावरील आवरणाचा भेद होऊन ते विशुद्धचक्रापर्यंत आले. नंतर मला माझ्या घशात फार त्रास होऊ लागला. माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. त्यानंतर मला सलग १५ – २० ढेकरा आल्या आणि माझ्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले. नंतर मला आज्ञाचक्रावर थंडावा जाणवू लागला. तेव्हा सद्गुरु काकांनी श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा सद्गुरु काकांच्या चरणांच्या ठिकाणी मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणांचे दर्शन झाले. त्यानंतर मी मानसिकदृष्ट्या पुष्कळ स्थिर झाले आणि साधनेच्या दृष्टीने योग्य असा निर्णय दृढतेने घेऊ शकले. त्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि सद्गुरु पिंगळेकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती मधुरा तोफखाने, गावभाग, सांगली (१०.१२.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.