छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ब्राह्मण अधिवेशन
छत्रपती संभाजीनगर – मनुस्मृती फाडली जाते, जाळली जाते. असे केल्याने काय फरक पडणार आहे ? मनृस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध ? मनुस्मृती ज्या वेळी लिहिण्यात आली, तेव्हा एकट्या ब्राह्मणानेच लिहिली नाही. जे मनू होऊन गेले, ते सर्व ब्राह्मणच होते, यावर विश्वास असण्याचे कारण नाही. त्यातील जे चांगले आहे, ते घ्या; जे वाईट आहे त्यावर सर्व मिळून टीका करू, अशी रोखठोक भूमिका खासदार मेधा कुलकर्णी यांनी १ जुलै या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ब्राह्मण अधिवेशनात मांडली. स्वत:चा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ऊठसूट विनाकारण ब्राह्मणांवर टीका करणे आता थांबवा, अशी चेतावणीही त्यांनी दिली.
अ.भा. पेशवा संघटनेच्या तापडिया नाट्यमंदिरात आयोजित या अधिवेशनाला राज्यभरातून ब्राह्मण समाजातील लोक आले होते. खासदार म्हणून निवडून आल्याविषयी मेधा कुलकर्णी यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. समाजाची आजची परिस्थिती आणि राजकीय स्वार्थामुळे राजकारण्यांकडून सतत समाजावर होणारी टीका, यांवर त्यांनी सडेतोड उत्तरे दिली.
मेधा कुलकर्णी यांनी मांडलेली काही सूत्रे
गांधींची हत्या केली एकाने, समाज दोषी कसा ?
मोहनदास गांधींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली. हत्या करणारा एक ब्राह्मण होता, यात सर्व समाजाचा काय दोष ? मात्र संपूर्ण ब्राह्मणांवर त्याचा राग काढण्यात आला, समाजाला वाळीत टाकण्यात आले. अजूनही विरोधी पक्षातील राजकारणी समाजा-समाजांत द्वेष निर्माण करण्यासाठी त्या घटनेवरून ब्राह्मण समाजावर टीका करतात. हे किती दिवस सहन करायचे ? हे थांबले पाहिजे, असेही मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.
संस्कार, विधी म्हणून शेंडी ठेवली जाते, जानवे घातले जाते !
मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, शेंडी, जानव्याचे असे कोणते वेगळे हिंदुत्व नाही आहे. हिंदु धर्मात असे अनेक समाज, पंथ आहेत ज्यांत संस्कार, विधी म्हणून शेंडी ठेवली जाते आणि जानवे घातले जाते. (‘आम्ही शेंडी, जानव्याचे हिंदुत्व मानत नाही’, असे लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या नावाचा उल्लेख न करता मेधा कुलकर्णी यांनी उत्तर दिले.)
हिंदु धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे !
हिंदु म्हणजे एकटा ब्राह्मण नव्हे. यात सर्व जातीपंथांचा समावेश होतो. आपण सर्वजण आधी हिंदु आणि नंतर ब्राह्मण, मराठा आणि विविध जातीपंथांतील आहोत. यामुळे हिंदु धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही मेधा कुलकर्णी यांनी केले.