संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पुणे येथे उत्साहाने स्वागत !

पालखीचे स्वागत करताना भाविक

पुणे – कपाळी अष्टगंधाचा टिळा, डोक्यावर गुलाबी फेटा, खांद्यांवर भागवत धर्माची पताका घेऊन ‘ग्यानबा-तुकारामा’चा जयघोष करत पंढरपूरला निघालेला वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीमध्ये २ दिवसांच्या मुक्कामी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी पुणेकर उपस्थित होते. रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या लाखो भाविकांनी पालखी सोहळ्यांवर पुष्पवृष्टी करत, टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. २ जुलै या दिवशी पालखी पुणे येथून प्रस्थान करेल.

शहरातील आळंदी रस्ता, बोपोडी येथील जुना मुंबई-पुणे महामार्ग, शिवाजीनगर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, लक्ष्मी रस्ता, नाना पेठ आणि भवानी पेठ या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अनेक तरुण-तरुणी पारंपरिक वेशभूषा करून पालखीचे स्वागत करतांना दिसून येत होते. लहान मुलांची वारकरी, विठ्ठल, रुक्मिणीची वेशभूषा लक्ष वेधून घेत होती. शहरामध्ये अनेक ठिकाणी वारकर्‍यांच्या आणि पालखीच्या स्वागतासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या अंथरल्या होत्या. अनेक संस्था, संघटना, आस्थापने (कंपन्या), राजकीय पक्ष यांच्याकडून वारकर्‍यांना ठिकठिकाणी चहा, पाणी, बिस्कीटे, फराळांचे जिन्नस, छत्र्या, रेनकोट, वस्तू ठेवण्यासाठी पिशव्या, तसेच अनेक ठिकाणी अन्नदानही करण्यात येत होते.

‘मेट्रो’मध्ये घुमला हरिनामाचा गजर

पांढरे शुभ्र कपडे, कपाळी गंध-टिळा आणि हातात भगव्या पताका घेऊन पंढरपूराकडे निघालेल्या वारकर्‍यांनी ‘मेट्रो’ प्रवासाचाही आनंद घेतला. काही तरुण वारकर्‍यांनी ज्येष्ठ नागरिक, महिलांना सोबत घेऊन ‘मेट्रो’ची सफर घडवून आणली. पिंपरी-चिंचवड, नाशिक फाटा, बोपोडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, पुणे रेल्वेस्थानक अशा ठिकाणांहून वारकर्‍यांनी हरिनामाचा गजर करत ‘मेट्रो’ प्रवासाचा आनंद घेतला.

वारकर्‍यांसाठी विविध उपक्रम

लाल महाल येथे ‘शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी’ आणि ‘पुणे पीपल्स को-ऑप. बँके’कडून अखंड १२ घंटे कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’ आणि ‘जय गणेश रुग्णसेवा अभियान’ यांच्याकडून डोळ्यांची पडताळणी, चष्मे वाटप, बाह्य रुग्ण विभाग आणि औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्व. संघवी रामलालजी विरचंदजी’ आणि ‘स्व. श्रीमती हिराबाई रामलालजी संघवी’ यांच्याकडून डोळे पडताळणी आणि चष्मे वाटप करण्यात आले. ‘श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळा’कडून भवानी पेठेतील गुळआळी येथील ‘तिळवण तेली समाज धर्मशाळे’मध्ये वारकर्‍यांची रहाण्याची, जेवणाची आणि स्वागताची सिद्धता करण्यात आली होती.

मार्केटयार्डमध्ये २५ सहस्र वारकर्‍यांचा मुक्काम

माऊलींचा जयजयकार आणि पांडुरंगाच्या जयघोषामध्ये मार्केटयार्डमधील व्यापार्‍यांनी वारकर्‍यांचे पुष्पहार घालून, पाद्यपूजा करत स्वागत केले. गुळ, भुसार विभागातील ७० ते ८० व्यापार्‍यांनी आणि फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागातील १०० हून अधिक व्यापार्‍यांनी २५ सहस्र वारकर्‍यांच्या रहाण्याची, जेवणाची व्यवस्था केली आहे, अशी माहिती ‘दी पूना मर्चंट्स चेंबर’चे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी दिली.

पालखी सोहळ्याचे ‘लाईव्ह लोकेशन’ एका क्लिकवर

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीच्या प्रारंभापासून सोहळ्याचे लोकेशन, पालखी कोठेपर्यंत पोचली ? आणि शेवटचे टोक कोठे आहे ? याची माहिती देण्यासाठी ‘लाईव्ह लोकेशन’ची सुविधा पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून उपलब्ध करून दिली आहे.

पालखी ट्रॅकिंग : http://diversion.punepolice.gov.in/