‘ज्ञानाचा अथांग सागर’ असणार्‍या सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेले मार्गदर्शन !

मी आणि प्रियांकाताई (कु. प्रियांका लोणे) आम्ही पुण्याहून रामनाथी आश्रमात येत होतो. अनपेक्षितपणे आम्हाला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांचा सहवास आणि सत्संग लाभला. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सद्गुरु काकांच्या माध्यमातून आम्हाला अनेक विषयांवर मार्गदर्शन केले.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. सहजता

आरंभी ‘सद्गुरुकाकांशी कसे बोलावे ?’, असे प्रतिमेचे विचार माझ्या मनात आले; परंतु त्यानंतर सद्गुरु पिंगळेकाकांनी सहजतेने आमची ओळख करून घेतली. त्या वेळी आम्हाला सद्गुरु काकांमधील सहजता आणि प्रेमभाव या गुणांचे दर्शन झाले.

२. इतरांचा विचार करणे

‘वास्को गोवा एक्सप्रेस’ पुणे रेल्वेस्थानकाच्या फलाट (प्लॅटफार्म) क्र.१ वर येणार’, असे नियोजित होते; परंतु नंतर ‘ती फलाट क्र. ४ वर येणार आहे’, असे समजले. साहित्य पुष्कळ असल्याने सद्गुरुकाकांना सोडायला आलेल्या साधकांनी साहित्य घेतले; परंतु माझ्या हातात दोन आणि खांद्यावर एक अशा एकूण ३ बॅगा होत्या. हे पहाताच सद्गुरुकाकांनी माझ्या हातातील एक बॅग स्वतः घेतली. त्या वेळी ‘सद्गुरुकाका इतरांचा किती विचार करतात !’, हे मला शिकायला मिळाले.

३. सद्गुरु पिंगळेकाकांनी ‘भावजागृतीसाठी प्रयत्न करतांना मनात येणार्‍या विचारांवर कशी मात करायची ?’, याविषयी सांगणे

कु. प्रतिमा लोणे

गाडीत बसल्यावर कु. प्रियांकाताईने सद्गुरु पिंगळेकाकांकडून समष्टी सेवेच्या संदर्भातील काही अडचणींवर मार्गदर्शन घेतले. त्यानंतर तिने ‘‘तुम्हीसुद्धा सद्गुरुकाकांशी बोलून त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकता’, असे आम्हाला सांगितले.’’ एका साधिकेने सद्गुरुकाकांना प्रश्न विचारला, ‘‘भावजागृतीसाठी प्रयत्न करतांना मनात अनेक विचार येतात.’’ त्या वेळी सद्गुरुकाकांनी सांगितले. ‘‘पाण्याचा पेला (ग्लास) रिकामा असतो, तेव्हा त्यात केवळ हवा असते. जसजसे आपण त्यात पाणी भरत जातो, तसतशी हवा बुडबुड्यांच्या रूपात येऊन निघून जाते. अगदी तसेच आपल्या मनाचे असते. आपले मन असंख्य विचार, स्वभावदोष, अहं आणि वाईट संस्कार यांनी भरलेले असते. जर आपण त्या मनामध्ये भाव टाकला, तर हवेप्रमाणे आपले विचारही बाहेर पडून नष्ट होतात आणि नंतर केवळ भावच मनात उरतो. एक दिवस पेला (ग्लास) पूर्ण पाण्याने भरायचा, म्हणजे मन पूर्णतः भावमय करायचे.’’ सद्गुरुकाकांनी आम्हाला ‘गुरुदेवांना अपेक्षित अशी मनाची स्थिती कशी असावी ?’, हे सांगितले.

४. सद्गुरुकाका एका संतांना हार घालत असतांना त्या संतांनी ‘‘तुम्ही पूर्ण हारला असाल, तरच मला हार घाला’’, असे सांगितल्यावर त्यांच्या या वाक्याचा सद्गुरुकाकांना जाणवलेला भावार्थ

सद्गुरु पिंगळेकाकांनी आम्हाला त्यांना शिकायला मिळालेली काही सूत्रे सांगितली. एकदा सद्गुरुकाका एका संतांना भेटायला गेले होते. त्या वेळी त्या संतांचा सन्मान करतांना ते त्यांना हार घालण्यास गेले असता ते संत त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही पूर्ण हारला असाल, तरच मला हार घाला.’’ त्या वेळी सद्गुरुकाकांनी त्यांच्या या वाक्याचा ‘तुम्ही देवाला पूर्ण समर्पित म्हणजे संपूर्ण शरणागत झाला असाल, तरच मला हार घाला’, असा भावार्थ सांगितला. त्या वेळी त्यांनी आम्हाला ‘हार’ या शब्दाचे पुढील अर्थ सांगितले.

अ. हार म्हणजे ‘हारणे’ किंवा ‘जिंकणे.’

आ. हार म्हणजे ‘संपूर्ण शरणागती.’

इ. हार म्हणजे ‘माळ.’ (क्रमश:)

– कु. प्रतिमा लोणे, सांगवी, पुणे. (३१.७.२०२३)