छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार प्रविष्ट होत नसल्याने फसवणुकीचे प्रकार वाढले !
छत्रपती संभाजीनगर – शहरासह विविध गावांतील विवाह इच्छुक तरुणांचा शोध घेत त्यांना चांगली मुलगी दाखवण्याचे आमीष दाखवणारे दलाल मोठ्या संख्येने सक्रीय झाले आहेत. २८ आणि २९ जून या दिवशी याविषयी एका दैनिकात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरसह परजिल्ह्यातही अनेक तरुणांची फसवणूक झाली आहे, असे उघड झाले. या सर्व प्रकरणांत २ ते ५ लाख रुपये घेऊन विवाह लावणार्या टोळीने दिलेले पत्ते चुकीचे असल्याचे लक्षात आले आहे. विवाह झाल्यानंतर तरुणी ‘तुमच्यावर पोलीस खटला प्रविष्ट करीन, आत्महत्या करीन’, अशा धमक्या देत असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक भीतीपोटी पोलिसांत तक्रार करत नाहीत. रांजणगाव येथील एका दलाल महिलेने परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतील ३ विवाह लावून फसवणूक केली. नुसते दलाल नाही, तर उपदलालांची संख्याही १०० हून अधिक आहे. फसवणूक झालेल्यांनी तक्रार करणे आवश्यक आहे.
गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी सांगितले की, विवाह जमवणारे शक्यतो पैशांची मागणी करत नाहीत. कुणी पैशांची मागणी करत असेल, तर आपली फसवणूक होत आहे, असे ओळखून पोलिसांना कळवावे. चौकशी करून जर दलाल फसवणूक करत असेल, तर कारवाई करू. अनवधानाने फसवणूक झालीच, तर तात्काळ गुन्हा नोंदवावा. जेणेकरून अन्य कुणाची फसवणूक होणार नाही. दामिनी आणि गस्तीवरील पथक यांच्या वतीने जनजागृती चालू आहे.
विवाह जमवतांना दोन्ही कुटुंबांची खातरजमा करा !
‘मराठी सोयरीक संस्थे’चे अध्यक्ष अशोक कुटे म्हणाले की, मुलांचे अल्प शिक्षण असणे, चांगली नोकरी नसणे आणि घर नसल्याने विवाहासाठी मुली मिळत नाहीत. त्यामुळे ‘पैसे गेले तरी हरकत नाही; पण मुलगी मिळाली पाहिजे’, या भावनेतून काही जण दलालांच्या भूलथापांना बळी पडतात. अनाथाश्रम, गरीब घरच्या मुली असल्याचे सांगत सामाजिक माध्यमांवर विज्ञापन करून फसवणूक होत असल्याची अनेक प्रकरणे आमच्याकडे येतात. नागरिकांनी विवाह जमवतांना मुलगा, मुलगी आणि त्यांच्या कुटुंबाची सखोल चौकशी करावी.
संपादकीय भूमिकाअडचणीत आलेल्या तरुणांच्या जीवनाशी खेळणार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |