एकदा सद्गुरु चारुदत्त पिंगळेकाका यांना मी बिंदूदाबन सेवा करत होतो. त्या वेळी त्यांनी भ्रमणभाषमध्ये एक ध्वनीफीत लावली होती. त्यातील १ – २ वाक्यांनी मला पुष्कळ अंतर्मुख केले. त्या संदर्भातील आत्मचिंतन सद्गुरु काकांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘हे चिंतन योग्य आहे.’’ तेव्हा हे सूत्र माझ्या मनावर कोरले गेले. त्यासाठी कृतज्ञता म्हणून हे लिखाण सद्गुरु काकांच्या चरणी समर्पित करतो.
१. साधनेच्या संदर्भात विकल्प आल्याने मनात नकारात्मक विचार येणे
‘काही कालावधीपासून माझ्या मनात स्वतःच्या साधनेसंदर्भात पुष्कळ विकल्प येत होते, उदा. साधना करायची आहे, तर मला कायम पूर्णवेळ होणे जमेल का ? पुढे माझ्या जीवनात काही अडचण आल्यास मला साहाय्य कोण करणार ? स्वतःची साधना होत आहे कि नाही ? तेव्हा ‘अनिष्ट शक्ती मला साधनेपासून विन्मुख करत होत्या’, असे मला वाटले. माझ्या मनातून नकारात्मक विचार जात नव्हते.
२. नकारात्मक विचारांच्या ताणामुळे कुणाशी बोलू न शकणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर त्यांनी गुरु-शिष्य यांचा संवाद ऐकण्याची संधी देणे
मी प्रतिदिन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करायचो, ‘देवा, माझ्या मनात असे विचार का येत आहेत ? माझी साधना होत आहे कि नाही ? माझ्या मनात असे विचार अनिष्ट शक्ती घालत असतील, तर त्यांच्यापासून माझे रक्षण करा.’ या विचारांचे माझ्या मनावर ओझे झाले होते; पण मी कुणाशी बोलू शकलो नाही. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव भक्तवत्सल असल्याने मला या ताणातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी पुढील गुरु-शिष्य यांचा संवाद ऐकण्याची मला संधी दिली.
३. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या भ्रमणभाषवरील ध्वनीफीतीमधील गुरु-शिष्य यांचा संवाद !
एकदा मी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना बिंदूदाबन करण्यासाठी त्यांच्या खोलीत गेलो होतो. तिथे त्यांनी भ्रमणभाषवर एक ध्वनीफीत लावली होती. त्यात गुरु-शिष्य यांचा संवाद होता. ‘एकदा एक तरुण शिष्य गुरूंना आदराने विचारतो, ‘गुरुदेव, मला ब्रह्मज्ञानाविषयी बोध करा.’ तेव्हा गुरुदेवांनी शिष्याचा विवेक जाणण्यासाठी त्याला विचारले, ‘तू इतका तरुण आहेस ! या वयात तू अनेक कर्मे करू शकतोस. आई-वडिलांची सेवा करू शकतोस. विवाह करून सुखाने जगू शकतोस. मुलांच्या माध्यमातून आपले जीवन सुखाने व्यतीत करू शकतोस. या वयात एवढे सुख सोडून तू आता ब्रह्मबोध जाणण्यासाठी कशाला आला आहेस ? स्वतःच्या वयानुसार तुझे कर्म कर.’
शिष्याने गुरूंना आर्ततेने प्रार्थना केली, ‘‘हे गुरुदेव, आपण सर्वज्ञ आहात. मी अनेक जन्म घेतले आहेत. प्रत्येक जन्मी मी तरुण होतो. मला आई-वडील होते. मी पत्नी आणि मुलांचे सुख अनंत जन्मी भोगले असणार. ते मी आता पुन्हा भोगणार त्यात वेगळे काय ? मला भाग्याने या जन्मी गुरुप्राप्ती झाली आहे. तुमची सेवा आणि ज्ञानार्जन करून या भवबंधनातून मुक्त होण्यासाठीच तुम्ही माझ्या जीवनात आला आहात.’’ शिष्याचे हे बोल ऐकून गुरूंना आनंद झाला आणि त्यांनी त्याला अनुग्रह देऊन त्याचा उद्धार केला.
४. गुरु-शिष्य यांच्या संवादरूपी गोष्टीतून मनातील शंकानिरसन होणे
अ. मी अनेक जन्मात पैसे कमावले आणि गमावले आहेत. या जन्मात मला तेच पुन्हा करायचे नसून साधना करायची आहे.
आ. प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थिती माझ्या मागील अनेक जन्मांत उद्भवली होती; पण माझी मुक्ती झाली नाही; म्हणून मला आता साधनाच करायची आहे.
इ. अनेक जन्म भोगूनही माझे मन आसक्तीत का अडकत आहे ? यामध्येच मी आतापर्यंतचा वेळ घालवला आहे. आता तरुण वयातच देवाने मला साधना करायचा विवेक दिला आहे.
ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन हे जिवाच्या मुक्तीसाठी दिलेले ज्ञानच आहे. गुरुकृपायोगानुसार साधना हा माझ्यासाठी ब्रह्म जाणण्याचा परम मार्गच आहे.
उ. साधकांना सध्याच्या रज-तम वातावरणामुळे साधनेविषयी मनात विकल्प येऊ शकतात. साधकांनी त्यामध्ये न अडकता आपण संबधितांना विचारून घेऊन विकल्प दूर केले पाहिजेत.
ऊ. नकारात्मक विचारात अडकण्यापेक्षा शाश्वत आनंद मिळण्यासाठी साधनाच केली पाहिजे.
ए. साधकांना साक्षात् विष्णुस्वरूप मोक्षगुरु परात्पर गुरु डॉ. आठवले हे गुरु म्हणून मिळालेले आहेत. त्यांनी सांगितलेली साधना केल्यामुळेच आपल्याला शाश्वत आनंद आणि मुक्ती मिळणार आहे.
५. गुरु-शिष्य या गोष्टीतून शिकायला मिळालेली सूत्रे
अ. साधकांना कलीयुगातील रज-तम वातावरणामुळे असे विचार येऊ शकतात. आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे की, जी अशाश्वत आहे, अशा मायेकडे आपण शाश्वत आनंद मिळण्याची अपेक्षा करतो. या भ्रमात राहून आपण आपला वेळ आणि साधना घालवतो.
आ. शाश्वत पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीहरि गुरु रूपात मिळाल्यावर अजून काही मोठे सुख आहे का ?
इ. ज्याप्रमाणे चांगले विचार येऊन जातात; परंतु आपण त्यांच्याकडे इतके लक्ष देत नाही. नकारात्मक किंवा मोहाचे विचार आल्यावर आपण त्याच ताणात राहून दिशाहीन होतो.
ई. आपल्याला मोहरूपी अंधत्व येते. या वेळी बोलून मन मोकळे करून दिशा घेतल्यावर हे सर्व विचार जाणारच आहेत. एका विचाराला इतके महत्त्व देण्यापेक्षा विचार घालवण्यावर लक्ष दिले, तर आपला उद्धारच आहे.
उ. विचारावर मात करून एकदा मायेची मर्यादा लक्षात आल्यावर आपण मायेतही निरासक्त राहून आनंद अनुभवू शकतो.
गुरु-शिष्य ही गोष्ट ऐकून माझ्या मनातील सर्व विकल्प दूर झाले. सद्गुरु पिंगळेकाका यांच्याकडून मला नेहमी साधनेसाठी दिशा, चैतन्य आणि आनंद मिळतो. ते माझ्या मनात असलेले ‘सूक्ष्म आणि अव्यक्त विचार जाणून त्यांचे निरसन करून साधनेत मला पुढची दिशा दाखवत आहेत’, त्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. देवेन पाटील, देहली (६.१.२०२३)
|