वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव सातवा दिवस (३० जून) उद़्‍बोधन सत्र : हिंदुत्‍व रक्षा

भगवान श्रीकृष्‍णाची शिकवण आचरणात आणल्‍यास हिंदु समाजाचे रक्षण शक्‍य !  – गिरिधर मामिडी, अखिल भारतीय टोली सदस्‍य, प्रज्ञा प्रवाह, तेलंगाणा

श्री. गिरिधर मामिडी

रामनाथी (गोवा) –  ब्रिटिशांनी हिंदूंना नि:शस्‍त्र केले. हिंदूंकडील शस्‍त्रे काढून घेतली. ‘शस्‍त्रे वापरण्‍याचा हक्‍क केवळ सरकारचा आहे, लोकांना नाही’ हा विचार हिंदूंवर थोपवला. त्‍यामुळे कालांतराने हिंदु समाज पूर्णपणे नि:शस्‍त्र झाला; परंतु मुसलमानांना हे नियम लागू नव्‍हते. त्‍यामुळेच वर्ष १९४७ मध्‍ये काश्‍मीरमधील राजौरी येथे पाकिस्‍तानी आक्रमकांनी २० ते ३० सहस्र हिंदूंची हत्‍या केली. केरळमधील मोपला येथे हिंदूंचे  हत्‍याकांड घडले. अशी हिंदूंची अनेक हत्‍याकांडे मुसलमानांनी घडवून आणली. भगवान श्रीकृष्‍णाची शिकवण आपण विसरलो. भगवान श्रीकृष्‍णाने सांगितलेली शिकवण आचरणात आणल्‍यास आपण हिंदु समाजाचे रक्षण करू शकतो, असे विधान तेलंगाणा येथील अखिल भारतीय टोली सदस्‍य, तसेच प्रज्ञा प्रवाहचे श्री. गिरिधर मामिडी यांनी येथे बोलतांना काढले. ‘भारतवर्षाला क्षात्रतेजाची आवश्‍यकता’ या विषयावर बोलत होते.

श्री. गिरिधर मामिडी पुढे म्‍हणाले की, भाग्‍यनगर (हैदराबाद) येथे प्रतिवर्ष गणेशविसर्जनाच्‍या वेळी मुसलमान दंगली घडवून आणायचे. एकवर्ष हिंदूंनी निर्धार करून त्‍यांच्‍यावर प्रतिप्रहार केला. तेव्‍हापासून तेथील दंगली बंद झाल्‍या. हिंदूंनी प्रतिप्रहार करणे चालू केले, तरच हिंदु समाजाचे रक्षण होऊ शकते.


अल्‍पसंख्‍यांकांसाठीच्‍या योजना बंद केल्‍या, तरच धर्मांतर रोखता येईल ! – अधिवक्‍ता श्री. अश्‍विनी उपाध्‍याय, सर्वोच्‍च न्‍यायालय

अधिवक्‍ता श्री. अश्‍विनी उपाध्‍याय

विद्याधिराज सभागृह – धर्मांतराला प्रोत्‍साहन देणार्‍या केंद्र सरकारच्‍या २०० योजना आहेत. राज्‍याराज्‍यांतील योजना मिळून भारतात अल्‍पसंख्‍यांकांसाठी ५०० योजना आहेत. या व्‍यतिरिक्‍त अल्‍पसंख्‍यांकांसाठी अन्‍यही योजना आहेत. हिंदूंच्‍या करामधून अल्‍पसंख्‍यांकांसाठी योजना चालू आहेत. या सर्व योजना धर्मांतराला प्रोत्‍साहन देत आहेत. ‘अल्‍पसंख्‍यांकांसाठीच्‍या योजना’ म्‍हणजे श्रीमंत हिंदूंच्‍या पैशांतून गरीब हिंदूंचे धर्मांतर होय. अल्‍पसंख्‍यांकांसाठीच्‍या सर्व योजना बंद केल्‍यावरच धर्मांतर रोखता येईल, असे वक्‍तव्‍य सर्वोच्‍च न्‍यायालयाचे अधिवक्‍ता श्री. अश्‍विनी उपाध्‍याय यांनी केले. ते ‘रामराज्‍य आणि भारतीय राज्‍यघटना’ या विषयावर बोलत होते.

अधिवक्‍ता श्री. अश्‍विनी उपाध्‍याय यांच्‍या भाषणातील उद़्‍बोधक विचार

आपण काँग्रेसची निंदा करतो; परंतु तिने केलेले राष्‍ट्रघातकी कायदे अद्यापही अस्‍तित्‍वात !

श्रीकृष्‍ण, श्रीराम, श्री हनुमान आदी हिंदूंच्‍या देवतांनी ज्‍या भूमीत जन्‍म घेतला, ती पवित्र भूमी बाँबस्‍फोट, कट्टरतावाद, लव्‍ह जिहाद, गोहत्‍या या समस्‍यांनी त्रस्‍त का आहे ? या मानवनिर्मित समस्‍यांवर उपाययोजनाही आहेत. देशात अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या हत्‍या झाल्‍या; परंतु कुणालाही कठोर शिक्षा झालेली नाही. देशात लव्‍ह जिहाद, धर्मांतर चालू आहे. याचे कारण अपराध्‍यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. कायद्याची भीती निर्माण करण्‍याचे काम सरकार आणि प्रशासन यांचे आहे. धर्मांतराच्‍या विरोधात मी न्‍यायालयात याचिका केली आहे; परंतु माझी याचिका रहित करण्‍यासाठी १० जणांनी याचिका केली आहे. याचिकांवरील सुनावणीसाठी तारखांवर तारखा पडत आहेत. हे रोखण्‍यासाठीचा कायदा संसदेत एका दिवसात होऊ शकतो. राज्‍यकर्ते आणि प्रशासन यांनी या समस्‍या सोडवणे, हे त्‍यांचे प्रथम कर्तव्‍य आहे. या समस्‍या सुटण्‍यासाठी चांगले कायदे निर्माण करणे आवश्‍यक आहे. आणीबाणी चुकीची होती, तर त्‍या काळात राज्‍यघटनेत करण्‍यात आलेला पालटही अवैध होता. मोगल आणि इंग्रज सत्तेसाठी नव्‍हे, तर धर्माचा प्रचार करण्‍यासाठी भारतात आले होते. त्‍यांचे कायदे आजही भारतात लागू आहेत. आपण काँग्रेसची निंदा करतो; परंतु काँग्रेसने केलेले राष्‍ट्रघातकी कायदे अद्यापही भारतात आहेत.

कायदा करून देशातील गुलामगिरीची सर्व चिन्‍हे नष्‍ट करायला हवीत !

देहलीमध्‍ये हुमायू, बाबर, गझनी या आक्रमकांच्‍या नावांचे रस्‍ते आहेत; मात्र महाभारतामध्‍ये पराक्रम दाखवण्‍यारे अर्जुन, भीम, युधिष्‍ठिर यांची नावे मार्गांना नाहीत.  कायदा करून संपूर्ण भारतातील गुलामगिरीची चिन्‍हे एकत्रित नष्‍ट करायला हवीत. आपण काँग्रेसचा देशद्रोह सांगतो; परंतु त्‍यांनी केलेले राष्‍ट्रविरोधी कायदे अद्यापही रहित करण्‍यात आलेले नाहीत. ‘प्‍लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्‍ट’, ‘वक्‍फ कायदा’ हे रहित करणे आवश्‍यक आहे.

भारतीय नागरित्‍व स्‍पष्‍ट करणारा कायदा हवा !

राज्‍यघटना म्‍हणते भारतातील सर्व नागरिक एकसमान आहेत, तर मग धर्माच्‍या आधारावर भेदभाव कशासाठी ? राज्‍यघटनेमध्‍ये असलेली गडबड दूर करायला हवी. धर्म आणि रिलीजन यांची स्‍पष्‍टता राज्‍यघटनेत असायला हवी. भारतात सापडणार्‍या जिहाद्यांचे नागरिकत्‍व रहित करण्‍यासाठी आपल्‍याकडे कायदा नाही. भारतीय नागरिक कोण ? हे स्‍पष्‍ट करणारा कायदा प्रथम करण्‍याची आवश्‍यकता आहे.

हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांचा पुरुषार्थ पाहून धन्‍य झालो !

हिंदु जनजागृती समितीचे कार्य अतिशय चांगले आहे. येथे येऊन आणि समितीच्‍या कार्यकर्त्‍यांचा पुरुषार्थ पाहून आम्‍ही धन्‍य झालो. हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने कधीही बोलवल्‍यास अन्‍य कार्यातून वेळ काढून उपस्‍थित राहीन, असे अधिवक्‍ता अश्‍विनी उपाध्‍याय म्‍हणाले.


‘हिंदु इकोसिस्‍टम’बळकट करण्‍यासाठी संघटित होऊन आवाज बुलंद करणे आवश्‍यक ! – डॉ. वैदेही ताम्‍हण, प्रमुख संपादिका, आफ्‍टरनून वॉइस, मुंबई

डॉ. वैदेही ताम्‍हण

विद्याधिराज सभागृह – हिंदु जनजागृती समिती हिंदूंना संघटित करण्‍याचे महान कार्य करत आहे. त्‍यामुळे या संघटनेच्‍या मुळावर आघात करण्‍याचा प्रयत्न झाला. या संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांवर अन्‍याय करण्‍यात आला. या अन्‍यायाच्‍या विरोधात ‘आफ्‍टरनून वॉइस’ या नियतकालिकाच्‍या माध्‍यमातून आवाज उठवण्‍याचा प्रयत्न आम्‍ही केला. लहान उपक्रमांतून हिंदूंना एकत्र आणण्‍याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘हिंदु इकोसिस्‍टम’ (हिंदु यंत्रणेसाठी) बळकट करण्‍यासाठी संघटित होऊन आवाज बुलंद करणे आवश्‍यक आहे, असे उद़्‍गार मुंबई येथील ‘आफ्‍टरनून वॉइस’च्‍या प्रमुख संपादिका डॉ. वैदेही ताम्‍हण यांनी येथे बोलतांना काढले. ‘समाजातील प्रतिष्‍ठित वर्गाचा इकोसिस्‍टम बनवण्‍याच्‍या दृष्‍टीने करायचे प्रयत्न’ या विषयावर त्‍या बोलत होत्‍या.

वैदेही ताम्‍हण पुढे म्‍हणाल्‍या की, जो कुणी हिंदु धर्माचा अवलंब करत आहे, मग तो मुसलमान असो, त्‍याचा आपण आदर केला पाहिजे. हाही एक हिंदु इकोसिस्‍टमचा भाग आहे. आपण एकनिष्‍ठ राहून धर्माचे कार्य केले पाहिजे. हिंदु धर्मापासून भरकटेल्‍या लोकांना परत जवळ केले पाहिजे. संस्‍कार घरातून चालू केले पाहिजे आणि हळूहळू त्‍याचे समाजात रोपण केले पाहिजे. संत, धर्म, मूलभूत अधिकार यांच्‍या रक्षणासाठी आपण पुढे सरसावले पाहिजे. हिंदूंनी संघटित होऊन हिंदु धर्माचे संवर्धन करण्‍याचा संकल्‍प केला पाहिजे.


आक्रमण करणे, हाच संरक्षणाचा चांगला उपाय ! – सुरेश चव्‍हाणके, मुख्‍य संपादक, ‘सुदर्शन न्‍यूज’

श्री.सुरेश चव्‍हाणके

विद्याधिराज सभागृह – वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्‍यानंतर हिंदूंवरील आक्रमणांमध्‍ये वाढ झाली आहे. जेवढ्या गोहत्‍या ५ वर्षांत झाल्‍या नाहीत, त्‍याहून अधिक गोहत्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधी घेतल्‍यापासून आजपर्यंत झाल्‍या आहेत. हिंदूंवरील आक्रमणांची गती थांबणारी नाही, तर ती अधिक वाढत जाणार आहे. त्‍यामुळे हिंदूंना त्‍यांची शक्‍ती दाखवून द्यावी लागेल. हिंदूंवरील आक्रमण थांबवण्‍यासाठी हिंदूंनी क्रियेला प्रतिक्रिया दिली पाहिजे, अन्‍यथा येत्‍या काळात त्‍यांचा निभाव लागणार नाही. त्‍यामुळे ‘आक्रमण करणे, हाच संरक्षणाचा चांगला उपाय’ आहे’, असे प्रतिपादन ‘सुदर्शन न्‍यूज’चे मुख्‍य संपादक श्री. सुरेश चव्‍हाणके यांनी ‘विश्‍व हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या समारोपीय दिवशी केले. ते ‘हिंदु संघटनांच्‍या समोरली आव्‍हाने आणि त्‍यांवरील उपाय’ या विषयावर बोलत होते.

श्री. सुरेश चव्‍हाणके म्‍हणाले, ‘‘धर्मांधाला थोडा धक्‍का जरी लागला, तरी त्‍याचे सहस्रो भाऊबंध एकत्र येतात. याऊलट हिंदूवर संकट आले, तर त्‍याच्‍या क्षेत्रातील १०० हिंदूही एकत्र येत नाहीत. यासाठी प्रत्‍येकाला त्‍याच्‍या क्षेत्रात बाहुबली व्‍हावे लागेल. आपण हिंदु मंदिरे सुशोभित करण्‍यावर भर देतो. त्‍यापेक्षा संकटकाळी मंदिराच्‍या ध्‍वनीक्षेपकावरून एक आवाज दिला, तर सहस्रो हिंदू कसे एकत्र होतील, अशी स्‍थिती निर्माण करण्‍याची आवश्‍यकता आहे. सध्‍या हिंदूंच्‍या लोकसंख्‍येचे प्रमाण न्‍यून होत चालले आहे. त्‍याऐवजी मुसलमानांची लोकसंख्‍या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्‍यासाठी ‘लोकसंख्‍या नियंत्रण कायदा’ आणण्‍याची मागणी करण्‍यात येते. त्‍याऐवजी या कायद्याचे नाव पालटून ‘मुसलमान लोकसंख्‍या नियंत्रण कायदा’ करण्‍याची वेळ आली आहे. हा कायदा करून त्‍याची कार्यवाही न झाल्‍यास वर्ष २०२९ मधील लोकसभा निवडणुकीचे निकाल यावर्षीहून वाईट असतील. लव्‍ह जिहाद, धर्मांतर, गोहत्‍या यांच्‍या विरोधातील कायदे राज्‍यस्‍तरांवर लागू न करता देशस्‍तरावर लागू करण्‍याची मागणी सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठांनी करावी. ज्‍याप्रमाणे ‘जी.एस्.टी.’ सारख्‍या गोष्‍टी लोकांनी स्‍वीकारल्‍या, त्‍याप्रमाणे असे कायदेही लोक स्‍वीकारतील.’’

सुरेश चव्‍हाणके यांच्‍या भाषणातील काही विचार

१. गोवा येथे हिंदु राष्‍ट्र अधिवेशन चालू होऊन १२ वर्षे झाली. या अधिवेशनांमधून सहस्रो हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्ते पूर्णवेळ बाहेर पडले. या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन त्‍यांनी लक्षावधी हिंदूंना धर्मांतरित होण्‍यापासून वाचवले, लक्षावधी हिंदु मुलींमध्‍ये जागृती केली. त्‍यामुळे त्‍यांचे ‘लव्‍ह जिहाद’पासून रक्षण झाले. लक्षावधी गायींचे गोहत्‍येपासून रक्षण झाले. ‘भूमी जिहाद’ पासून सहस्रो एकर भूमी वाचवण्‍यात आली.

२. माझ्‍यावर ‘हेट स्‍पीच’प्रकरणी (द्वेषयुक्‍त भाषण केल्‍याच्‍या प्रकरणी) १ सहस्र ८२८ गुन्‍हे नोंद आहेत.

३. हिंदूंनी मतदान केल्‍यामुळे भाजपचे २४० खासदार निवडून आले आहेत. त्‍यामुळे त्‍यांनी हिंदूंच्‍या प्रश्‍नांकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

क्षणचित्र :

या वेळी श्री. सुरेश चव्‍हाणके म्‍हणाले की, ज्‍याप्रमाणे हिंदुत्‍वनिष्‍ठ आमदार श्री. राजा सिंह या हिंदु महोत्‍सवात त्‍यांच्‍या मुलाला घेऊन आले. त्‍याप्रमाणे येथील हिंदुत्‍वनिष्‍ठांनीही पुढील वर्षी त्‍यांच्‍या मुलांना या महोत्‍सवात घेऊन यावे.


हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी ‘शत्रूबोध’ आणि ‘इतिहासाचा अभिमान’ अपरिहार्य ! – मीनाश्री शरण, संस्‍थापक, अयोध्‍या फाऊंडेशन, मुंबई, महाराष्‍ट्र

मीनाश्री शरण

विद्याधिराज सभागृह – सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दूरदृष्‍टीने विचार करतात. भारतामध्‍ये हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करून संपूर्ण जगाला कल्‍याणकारी हिंदु राष्‍ट्रापर्यंत नेण्‍याचे त्‍यांचे ध्‍येय आहे. यासाठी ‘शत्रूबोध’ आणि ‘इतिहासाचा अभिमान’ असणे अपरिहार्य आहे, असे वक्‍तव्‍य मुंबई येथील अयोध्‍या फाऊंडेशनच्‍या संस्‍थापिका मीनाश्री शरण यांनी केले. त्‍या वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या ३० जून म्‍हणजे शेवटच्‍या दिवशीच्‍या सत्रात ‘वर्ष १९४७ जशी परिस्‍थिती निर्माण झाल्‍यास महिला आणि हिंदू यांचे दायित्‍व !’ या विषयावर बोलत होत्‍या.

त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘भारतात ‘लव्‍ह जिहाद’, ‘गोहत्‍या’ होऊनही त्‍यावर हिंदूंची प्रतिक्रिया येत नाही. भारतात प्रतीवर्षाला ३ कोटी गोवंश कापला जातो; परंतु हिंदू यावर सामूहिकरित्‍या आवाज उठवत नाहीत. बहुसंख्‍य युवावर्गाला याच्‍याशी देणे-घेणे नाही. याचे कारण त्‍यांना धर्मबोध आणि शत्रूबोध नाही. हिंदु समाजही धर्मविहीन झाला आहे. आपल्‍या जाज्‍वल्‍य इतिहासाचा हिंदूंना गर्व नाही. आपल्‍या संतांचा अवमान होऊनही हिंदू गप्‍प आहेत. हिंदू केवळ अर्थ आणि काम यांमध्‍ये अडकले आहेत. भारतातील काही भागांमध्‍ये हिंदूंची लोकसंख्‍या झपाट्याने अल्‍प होत आहे. विभाजनानंतर पाकिस्‍तानमधील ५० लाख हिंदूंना मारण्‍यात आले. तेथील हिंदूंना १ सहस्र ४०० कोटी रुपयांची मालमत्ता सोडावी लागली.

दुसरीकडे मात्र पाकिस्‍तानच्‍या निर्मितीनंतर भारतात आणखी १३-१४ पाकिस्‍तान होण्‍याच्‍या मार्गावर आहेत. भारत पुन्‍हा विभाजनाच्‍या उंबरठ्यावर आहे. स्‍वत:च्‍या संस्‍कृतीविषयीची हिंदूंमधील श्रद्धा वृद्धींगत व्‍हावी, यासाठी आम्‍ही मंदिरामध्‍ये दीप लावण्‍याची योजना चालू केली आहे. दुर्लक्षित मंदिरांमध्‍ये देवतांचे पूजन करून आम्‍ही दीप लावतो. हिमाचल प्रदेश राज्‍यातून आम्‍ही ही योजना चालू केली आहे.’’


श्रीराममंदिर उभारले, आता रामराज्‍यासाठी प्रयत्न करूया ! – सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सद़्‍गुरु निलेश सिंगबाळ

विद्याधिराज सभागृह – हिंदु राष्‍ट्र एक शिवधनुष्‍य आहे. जसे रामायणात शिवधनुष्‍य उचलणे महाबली योद्ध्यांना शक्‍य झाले नाही, ते शिवधनुष्‍य श्रीरामाने खेळण्‍यासारखे उचलून मोडले. महाभारतातील युद्ध १८ वर्षे चालणार होते, ते युद्ध श्रीकृष्‍णाने अवघ्‍या १८ दिवसांत संपवले. तसेच उचित क्षण येताच या कलियुगात हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करायला ईश्‍वराला वेळ लागणार नाही. यावर दृढ श्रद्धा ठेवून हिंदु राष्‍ट्रासाठी आपल्‍या सर्वांना निरंतर प्रयत्नरत रहावे लागणार आहेत. अयोध्‍येत नुकतेच श्री रामलल्ला  विराजमान झाल्‍यानंतर देशाला आध्‍यात्‍मिक अधिष्‍ठान प्राप्‍त झाले आहे. आता देशाला रामराज्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍यासाठी आधी जनतेला  व्‍यक्‍तीगत जीवनात रामराज्‍य आणण्‍यासाठी साधना करावी लागेल, तसेच नैतिक आणि सदाचारी जीवन जगण्‍याचा संकल्‍प करावा लागेल. सात्त्विक समाजाच्‍या पुढाकारातूनच अध्‍यात्‍मावर आधारित राष्‍ट्ररचना, म्‍हणजेच रामराज्‍य शक्‍य आहे; त्‍यामुळे व्‍यक्‍तीगत आणि सामाजिक जीवनात रामराज्‍य आणण्‍याचा संकल्‍प करूया, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक  सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव : दिशादर्शन आणि संवाद’ या विषयावर बोलतांना केले.

सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ म्‍हणाले,

१. हिंदु संघटनांच्‍या एकत्रिकरणातून हिंदु ‘इकोसिस्‍टीम’ (हिंदु यंत्रणा), हिंदुत्‍वनिष्‍ठ सरकारशी बोलणी करणारा संवाद समूह आणि हिंदूंच्‍या प्रश्‍नांची नोंद घ्‍यायला लावण्‍यासाठी ‘हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समिती’ हा ‘दबावगट’ निर्माण करण्‍याची संकल्‍पना गेल्‍या वर्षीपासून प्रत्‍यक्षात आणण्‍याच्‍या प्रयत्नात आहोत.

२. मंदिर महासंघाच्‍या माध्‍यमातून झालेल्‍या प्रयत्नांतून प्रेरणा घेऊन आपापल्‍या भागात मंदिरांशी संपर्क वाढवणे, मंदिरात विविध माध्‍यमांतून धर्मशिक्षण कसे देता येईल, यासाठी प्रयत्न करणे, मंदिरात वस्‍त्रसंहिता लागू करण्‍यासाठी प्रयत्न करणे, ही काळाची आवश्‍यकता आहे.

३. हिंदुत्‍वनिष्‍ठांना लक्ष्य करून त्‍यांना कायद्याच्‍या कचाट्यात अडकवण्‍याचे योजनाबद्ध प्रयत्न चालू आहेत. कायदेशीर कचाट्यात अडकवून हिंदुत्‍वाची चळवळ कमकुवत करू पहाणार्‍यांना उत्तर देण्‍यासाठी येणार्‍या काळात अधिवक्‍त्‍यांची फळीही आपल्‍याला उभी करावी लागणार आहे.


हिंदूंनी स्‍वत:सह, कुटुंब, राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या रक्षणासाठी सिद्ध व्‍हावे ! – रमेश शिंदे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

विद्याधिराज सभागृह – ‘पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया’ला (‘पी.एफ्.आय’ला) १ जानेवारी २०५० मध्‍ये भारतात इस्‍लामी राष्‍ट्र घोषित करायचे आहे. आज ‘जमीयत उलेमा ए हिंद’ ही संघटना मुसलमान युवकांना उघडपणे सैन्‍य प्रशिक्षण देत आहे आणि येत्‍या १० वर्षांत त्‍यांना सव्‍वा कोटी युवकांना प्रशिक्षित करायचे आहे. यासाठी त्‍यांची सिद्धता चालू आहे. शत्रू नेहमी युद्धाच्‍या सिद्धतेत असतो. त्‍याला प्रत्‍येक वेळी बुद्धीने समजावता येत नाही. अशा वेळी हिंदूंनाही आपले रक्षण करण्‍यासाठी सिद्धता करणे आवश्‍यक आहे. भारताचे सैन्‍य आणि पोलीस यांच्‍या संख्‍येच्‍या तुलनेत धर्मांधांची संख्‍या २० कोटी आहे. आपल्‍याला कुणावर अन्‍याय करायचा नाही, तर धर्म आणि राष्‍ट्र यांचे रक्षण करायचे आहे. त्‍यामुळे हिंदूंनी पोलिसांवर अवलंबून न रहाता स्‍वत:सह, कुटुंब, राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या रक्षणासाठी सिद्ध व्‍हावे लागेल. आपल्‍या समवेत श्रीकृष्‍ण असेल, तर आपला पराजय होऊ शकत नाही. आपल्‍याला अनीती आणि अधर्म यांनी नाही, तर नीती आणि धर्म यांच्‍या साहाय्‍याने सिद्धता करावी लागेल, असे वक्‍तव्‍य हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या शेवटच्‍या दिवशी केले. ते ‘भावी भीषणकाळात करायची सिद्धता’ या विषयावर बोलत होते.

शोभायात्रा काढतांना त्‍यात सहभागी महिला आणि मुले यांच्‍या सुरक्षेच्‍या दृष्‍टीने उपाययोजना हवी !

श्री. शिंदे म्‍हणाले, ‘‘भारतात अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना आहेत. त्‍यांच्‍यात मतभेद असू शकतात; पण याचा लाभ शत्रूने उठवू नये, याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच सर्वांनाच हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना हवी आहे. त्‍यामुळे सर्वांनी संघटित होणे आवश्‍यक आहे. हिंदूंच्‍या प्रत्‍येक देवतेच्‍या हातात शस्‍त्रे आहेत. शीखांच्‍याही कमरेला शस्‍त्र असतात, पोलीस आणि सैन्‍य यांच्‍याकडेही शस्‍त्र असतात; पण इंग्रजांनी ‘भारतीय शस्‍त्र अधिनियम १८७८’ लागू करून हिंदूंना नि:शस्‍त्र केले. तेव्‍हापासून हिंदूंची स्‍थिती दयनीय झाली आहे. विविध दंगलींमध्‍ये धर्मांध हिंदूंवर आधुनिक शस्‍त्रांसह आक्रमणे करतात. अशा वेळी अनेक हिंदूंना जीव गमवावा लागतो. असे असतांना सण-उत्‍सवांच्‍या वेळी हिंदुत्‍वनिष्‍ठ शोभायात्रा काढतात; पण त्‍याच्‍याकडे हिंदु महिला आणि मुले यांच्‍या सुरक्षेच्‍या दृष्‍टीने काहीच उपाययोजना नसते. याचाही विचार करणे आवश्‍यक आहे.’’

श्री. शिंदे यांच्‍या भाषणातील महत्त्वाची सूत्रे  

१. स्‍वातंत्र्यवीर सावरकर इंग्‍लंडमध्‍ये गेले आणि तेथून पुस्‍तकांच्‍या मार्फत भारतात बंदुका पाठवल्‍या. तसेच बाँब बनवण्‍याची पद्धतही क्रांतीकारकांना पाठवली. ते केवळ पुस्‍तक लिहून थांबले असते, तर देशाला स्‍वातंत्र्य मिळाले नसते.

२. ‘पी.एफ्.आय’ (पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया) भारतांतर्गत युद्धाची सिद्धता करत आहे. ‘पी.एफ्.आय’ने एक धोरण बनवले आहे. त्‍यात म्‍हटले आहे की, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ‘ओबीसी’ समाजाला बरोबर घेऊन निवडणूक लढवायची. तसेच त्‍यांच्‍या मनात राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाविषयी चुकीचे मत बनवायचे.