हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्याग करण्यासाठी सिद्ध व्हा ! – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह लोध, तेलंगाणा

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा ६ वा दिवस (२९ जून)

आमदार टी. राजा सिंह लोध

रामनाथी (गोवा), २९ जून (वार्ता.) – अनेकांनी प्राणांचा त्याग केला, तेव्हाच भारताला स्वातंत्र्य मिळाले. गुरु गोविंदसिंह यांनी स्वत:च्या मुलांसह बलीदान दिले. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसह अनेक क्रांतीकारक यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी त्याग केला. देशासाठी बलीदान देणार्‍यांची आठवण ठेऊया. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीही हरतर्‍हेचे प्रयत्न करावे लागतील. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्याग करण्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह लोध यांनी केले.

आमदार टी. राजा सिंह लोध यांनी मांडलेले जाज्वल्य विचार

१. मी राजकारणामध्ये सत्तेसाठी आलेलो नाही, तर रामराज्याची स्थापना करण्यासाठी आलो आहे. अनेक लोकप्रतिनिधी निवडून येण्यापूर्वी हिंदुत्वनिष्ठ असल्याचे नाटक करतात. सत्ता प्राप्त झाल्यावर मात्र धर्मनिरपेक्ष होतात.

२. नुकत्याच झालेल्या बकरी ईदच्या दिवशी गायींचे रक्षण करण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरला नाही. आम्ही रात्रभर गायींच्या रक्षणासाठी कार्यरत होतो. त्यामुळे तेलंगाणामध्ये गाय कापणार्‍यांना १०० वेळा विचार करावा लागतो.

३. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यापासून राष्ट्राचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र चालू आहे. सध्या प्रशासनातील मोठे अधिकारी हिंदुत्वाच्या विरोधात आहेत. हिंदुत्वनिष्ठ युवकांना उच्च पदापर्यंत पोचवा, जेणेकरून ते हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान देऊ शकतील.

४. जोपर्यंत देशात धर्मनिरपेक्ष नेते आहेत, तोपर्यंत भारताला हिंदु राष्ट्र घोषित करता येऊ शकत नाही. किमान ५० हिंदुत्वनिष्ठ खासदार निवडून आणणे आवश्यक आहे, जे संसदेमध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करतील.

५. येणारा काळ कठीण आहे. धर्मकार्य करायचे असेल, तर घाबरून चालणार नाही. केवळ बोलून हिंदु राष्ट्राची स्थापना होणार नाही. त्यासाठी झगडावेच लागेल.

हिंदुत्वासाठी संघर्ष करणार्‍यांचे अभिनंदन ! – आमदार टी. राजा सिंह लोध

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना अटक केले. डॉ. वीरेंद्र तावडे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, श्री. विक्रम भावे यांना कारागृहात जावे लागले. यांची निर्दाेष मुक्तता झाली आहे; मात्र अद्यापही सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना शिक्षा झाली आहे. हिंदू संघटित नाही, त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांवर अशी  वेळ येत आहे. ज्या अधिवक्त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना सोडवण्यासाठी न्यायालयीन संघर्ष केला, त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी हिंदुत्वासाठी संघर्ष केला.

भगवंत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आशीर्वादामुळे धर्मकार्य करू शकतो !

प्रत्येक राज्यात हिंदूंचे संघटन निर्माण करणे आवश्यक आहे, जेणेकरून सरकारवर दबाव निर्माण होईल. तेलंगाणामध्ये मी एकटाच हिंदुत्वासाठी कार्य करत आहे. साहाय्य करण्यासाठी कुणी नाही; परंतु मुख्यमंत्र्यांनाही ‘आम्ही काय करणार ?’ याचा विचार करावा लागतो; कारण भगवंत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आशीर्वाद अन् हिंदुत्वनिष्ठांचे साहाय्य यांमुळे मी कार्य करू शकतो.

 … तर येणार्‍या काळात संकटांचा सामना करावा लागेल !

येणारा काळ संकटांचा आहे; परंतु साधनेने हे वातावरणाला पालटता येईल. अखंड हिंदु राष्ट्रासाठी साधना करणे आवश्यक आहे. हिंदूंचे संघटन करण्यासाठीही साधनाच आवश्यक आहे. आता चूक केली, तर येणार्‍या काळात मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल.

भारताला हिंदु राष्ट्र केल्याविना थांबणार नाही !

लोकप्रतिनिधी स्वत:च्या मुलांना हिंदुत्व शिकवत नाहीत. माझी ३ मुले आहेत. धर्मकार्यासाठी एक हुतात्मा झाला, तरी अन्य २ मुलेही धर्मासाठी सिद्ध आहेत. भारताला हिंदु राष्ट्र करत नाही, तो पर्यंत मी थांबणार नाही. भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी हिंदूंनी त्याग करण्याची आवश्यकता आहे. साधनेच्या बळानेच भारताला हिंदु राष्ट्र घोषित करता येऊ शकेल.

क्षणचित्रे :

१. श्री. राजा सिंह लोध व्यासपिठावर आल्यानंतर, त्यांचे भाषण चालू होण्यापूर्वी आणि भाषण संपल्यानंतर उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्त घोषणा दिल्या. शेवटचे सत्र संपल्यानंतर सर्व हिंदुत्वनिष्ठांनी श्री. राजा सिंह लोध यांच्यासमवेत छायाचित्र घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.

२. श्री. राजा सिंह या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा कु. चंद्रशेखर सिंह यालाही घेऊन आले होते. या वेळी कु. चंद्रशेखर याने व्यासपिठावरून त्याचे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थितांनी उत्साहात घोषणा देऊन त्याचे मनोबल वाढवले. या संदर्भात श्री. राजा सिंह म्हणाले की, व्यासपिठावर कसे बोलायचे ? हे केवळ हिंदु जनजागृती समितीत शिकवले जाते. त्यामुळे मी माझ्या मुलाला येथे घेऊन आलो आहे.