‘महायोग पीठ’ असलेले पंढरपूर… !

पंढरपूरचे स्थानमाहात्म्य

१. पवित्र धाम असलेले पंढरपूर

श्रीयंत्राच्या खालच्या बाजूला असलेल्या प्रकृतीदर्शक त्रिकोणाच्या मध्यभागी पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि उत्तरेला पुरुष त्रिकोणाच्या मध्यभागी मथुरा अन् वृंदावन ही पवित्र क्षेत्रे आहेत. त्याच्या दक्षिण आणि उत्तर टोकांना शंकराची स्थाने, तर पूर्व, पश्चिम अन् दोन्ही त्रिकोणांमध्ये श्रीकृष्णाची स्थाने आहेत. पंढरपूर हे पवित्र धाम आणि महान तीर्थक्षेत्र आहे. अध्यात्माच्या क्षेत्रात पृथ्वीवर भारताचे जे महत्त्व आहे, तेच महत्त्व भारतात महाराष्ट्राचे आहे. महाराष्ट्राइतके संत आणि संतांविषयीचे लिखाण भारतात अन्यत्र कुठेच झाले नाही.

२. संतांचे माहेर असलेले पंढरपूर

पंढरपूर हे संतांचे माहेरघर आहे. महाराष्ट्रातील आणि इतर अनेक ठिकाणच्या संतमंडळींचे माहेर असलेल्या या पंढरपुरातील पांडुरंगावर संतांची अपार भक्ती होती आणि आहे. ही संत मंडळी आषाढ शुद्ध एकादशीपासून आरंभ होणार्‍या चातुर्मासात आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी या तिथींना ‘पंढरपूरची यात्रा’ करत असत. त्यांच्या या यात्रेला ‘वारी’ असे म्हणतात.

३. पंढरीमाहात्म्य

पंढरी हे भगवान शंकराचे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र मानले आहे. ते श्री गोपालकृष्णाचे दक्षिणेकडील रासक्रीडेचे गोकुळच आहे. या संदर्भात पुराणांत निरनिराळ्या कथा आहेत.

३ अ. लोहतीर्थ : एकदा शिव आणि पार्वती वरुण राजाच्या भेटीस निघाले असतांना त्यांना तहान लागली. तेव्हा ते भीमा नदीच्या काठावर थांबले. तिथे शंकराने आपल्या त्रिशुळाने पाताळगंगेला वर आणले. ती भोगवती वर येताच त्या दोघांनीही आपली तहान भागवली. त्यामुळे शिव-पार्वतीने प्रसन्न होऊन त्या प्रवाहाला ‘लोहतीर्थ’ हे नाव दिले.

चोविसाव्या त्रेतायुगात इंद्राने गौतम ऋषींची पत्नी अहल्या हिचा भोग घेतल्यामुळे इंद्राच्या सर्वांगावर सहस्र भेगा पडल्या. तेव्हा इंद्राने याच लोहतीर्थावर येऊन स्नान केले आणि तो बरा झाला.

३ आ. विष्णुपाद तीर्थ : फार पुरातन काळी पंढरपूरला चंद्र नावाचा एक राजा राज्य करत होता. त्या वेळी पंढरपूर जवळच्या अरण्यात ‘दिंडीर’ नावाचा राक्षस रहात होता. त्याच्या त्रासामुळे चंद्र राजाची प्रजा त्रस्त झाली होती; म्हणून राजाने श्रीविष्णूची आराधना करून श्रीहरीला प्रसन्न केले आणि ‘आपण पुत्ररूपाने ‘मल्लिकार्जुन’ या नावाने जन्म घ्यावा’, असा वर मागितला. त्याप्रमाणे श्रीविष्णूने मल्लिकार्जुनाच्या रूपात जन्म घेऊन ‘दिंडीर’ राक्षसाचा वध केला; म्हणून त्या वनाला ‘दिंडीर वन’ असे म्हणतात. याच दिंडीर वनात इंद्राने वृत्रासुराचा वध केला. मृत्यूपूर्वी वृत्रासुराने ‘तू वीट होशील’, असा इंद्राला शाप दिला. हीच वीट पंढरपूरला विठ्ठलाच्या पायाखाली आहे. श्रीहरीने चंद्र राजाला जिथे दर्शन दिले, त्या ठिकाणाला ‘विष्णुपादतीर्थ’ असे नाव पडले.

  संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘पंढरीचा पहिला वारकरी’

‘पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।’

पुंडलिकाच्या भक्ती-भावामुळे पांडुरंग पंढरपुरात येऊन सर्वांच्या उद्धारासाठी उभा आहे. पुंडलिकामुळेच पंढरपूरला महत्त्व आले असून ती पुण्यभूमी झाली आहे. भगवंताने पुंडलिकाच्या भेटीच्या माध्यमातून पंढरपूरला येऊन त्याला दर्शन दिले. ‘भगवंताचे दर्शन होणे’, हा ‘योग’ असून ‘भगवंताने स्वतः येऊन दर्शन देणे’, हा ‘महायोग’ आहे. पुंडलिकाला भेटण्यासाठी भगवंत स्वतः पंढरपुरात अवतरले. त्यामुळे श्रीमद् आद्यशंकराचार्य पंढरपूरला ‘महायोग पीठ’ असे म्हणतात.

श्रीमद् आद्यशंकराचार्यांनी पांडुरंगाचे वर्णन करतांना म्हटले आहे, ‘भीमा नदीच्या तीरावर महायोगाचे अधिष्ठान असलेल्या पंढरपूर क्षेत्रात पुंडलिकाला वर देण्यासाठी श्रेष्ठ मुनींसह रहाणार्‍या ‘आनंदकंद’ परब्रह्मरूप पांडुरंगाला मी भजतो.’ यावरून पांडुरंग हा ‘भोगानंद’ नाही, तर ‘आत्मानंद’ आहे. तो ‘रसो वै सः ।’, म्हणजेच भक्तीरसमय असा आहे. येथे भक्त आणि भगवंत एकरूप झाले आहेत, ते केवळ भक्तीचा महिमा वाढवण्यासाठी ! पंढरपूरला पुंडलिकाच्या भेटीसाठी जाणारा पांडुरंग हा ‘पहिला वारकरी’ आहे. त्यामुळे त्याची पूजा, म्हणजे भक्ताचीच पूजा आहे. अशा या भक्ती महिम्यामध्ये रंगलेला पांडुरंग पंढरपूरला राहिल्यामुळे पंढरपूर हे मोठे ‘शक्तीकेंद्र’ झाले आहे. असा हा भक्तवत्सल पाडुरंग निरंतर २८ युगे भक्तांची वाट पहात तिष्ठत उभा आहे.