दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पावसाअभावी शेतकर्‍यांची हानी !; अतीवृष्टीतील हानीग्रस्त २ वर्षे साहाय्याविना !…

पावसाअभावी शेतकर्‍यांची हानी !

वणी (यवतमाळ), २६ जून ( वार्ता.) – पूर्व विदर्भात अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने शेतकर्‍यांचे बियाणे वाया गेले. यात त्यांची आर्थिक हानी झाली. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.


अतीवृष्टीतील हानीग्रस्त २ वर्षे साहाय्याविना !

यवतमाळ – वर्ष २०२२ मधील अतीवृष्टीतील हानीनंतर जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून हानीग्रस्तांसाठी निधीची मागणी राज्यशासनाकडे पाठवली; पण २ वर्षे उलटूनही साहाय्य मिळालेले नाही. ‘४ सहस्रांहून अधिक घरे आणि ६७१ दुकाने यांची हानीभरपाई कधी मिळणार ?’, असा प्रश्न पीडित नागरिक करत आहेत.

संपादकीय भूमिका : हा निधी गेला कुठे ? याचे उत्तर प्रशासन देईल का ?


वणी शहरात अतिक्रमण वाढले !

वणी (यवतमाळ) – शहरात दुकानांची अतिक्रमणे वाढतच आहेत. अतिक्रमण हटवण्याचे दायित्व असणार्‍या नगरपालिकेचे कार्यालयच अतिक्रमणांनी वेढलेले आहे. पदपथावरही अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत आहे.

संपादकीय भूमिका : नगरपालिकेची उदासीन वृत्ती कारणीभूत !


अबू सालेमचा अर्ज फेटाळला !

मुंबई – जिवाला धोका असल्याने मला तळोजा कारागृहातून अन्यत्र हलवू नये, अशी मागणी करणारा मुंबईतील वर्ष १९९३ च्या साखळी बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड अबू सालेम याचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. ३ जुलैपर्यंत त्याला अन्य कारागृहात हलवू नये, असा आदेश विशेष न्यायालयाने तळोजा कारागृह प्रशासनाला दिला.


पनवेलमध्ये ५२ जणांना हत्तीपाय रोग !

पनवेल – पनवेल तालुक्यामध्ये हत्तीपाय रोगाचे ५२ रुग्ण आहेत. त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिले जात असून त्यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी महापालिका साहाय्य करणार आहे. हत्तीपाय रुग्णामध्ये हालचालीवर कमालीची बंधने येतात. रुग्ण मुक्तपणे हिंडू-फिरू शकत नाही.


पुणे येथे ‘झिका’ विषाणूचे दोन रुग्ण !

पुणे – येथील एरंडवणा परिसरामध्ये ‘झिका’ विषाणूचा संसर्ग ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलीला झाला आहे. या दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे आल्याची सौम्य लक्षणे होती. यांच्यावर औषधोपचार चालू आहेत. दोघांची प्रकृती स्थिर आहे. शहरामध्ये यंदा प्रथमच ‘झिका’ विषाणूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.