वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातील उद्बोधन सत्र : आध्यात्मिक संस्थांद्वारे धर्मजागृती !

…केवळ भारतच नव्हे, तर विश्वात अनेक हिंदु राष्ट्रे होतील ! – प.पू. डॉ. संतोष देवजी महाराज, संस्थापक, शिवधारा मिशन फाऊंडेशन, अमरावती, महाराष्ट्र

प.पू. डॉ. संतोष देवजी महाराज

रामनाथी (गोवा) – आज विश्वात एकही हिंदु देश नाही. एक नेपाळ होता; परंतु तोही आता नाही. केवळ एकच नव्हे, तर विश्वात अनेक हिंदु राष्ट्रे होतील, असा विचार करा. श्रीरामाने वनवासात कुठल्याही सुविधा घेतल्या नाहीत. सर्व सुखांचा त्याग केला; म्हणून त्याला ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हटले जाते. आज अनेक समाज आणि परंपरा आहेत, ज्या देवाला मानतात; परंतु त्यांना हिंदुत्वापासून दूर ठेवण्यात आले आहे. अशा परंपरा स्थापन करा की, केवळ भारतच नाही, तर पूर्ण विश्वात अनेक हिंदु राष्ट्रे होतील. हिंदूंना येणार्‍या समस्या आणि त्यांची दुर्बलता यांचे निवारण करण्यासाठी अन्य संघटनांचे साहाय्य घेऊ शकता. विचारांची देवाण-घेवाण करून आपापल्या क्षेत्रामध्ये एक रणनीती ठरवून कृती करूया आणि आपापल्या क्षेत्रात वैचारिक क्रांतीची ज्योत पेटवूया, असे मार्गदर्शन ‘शिवधारा मिशन फाऊंडेशन’चे संस्थापक प.पू. डॉ. संतोष देवजी महाराज यांनी केले.

सनातन संस्थेने अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दायित्व द्यावे !

सनातन संस्था सखोल कार्य करत आहे. तिने विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांना धर्मप्रसाराच्या कार्याचे थोडे दायित्व द्यावे. सनातन संस्थेच्या कार्याची उंची आणि खोली पुष्कळ मोठी आहे, ते लक्षात येत आहे. सनातन संस्था पुष्कळ व्यापक कार्य करत आहे. सनातन संस्थेने काळाची आवश्यकता ओळखून योग्य त्या कार्यावर लक्ष केंद्रित केले आहे. संस्थेच्या साधकांमध्ये उत्साह आणि सतर्कता आहे. सध्या साधना आणि पुरुषार्थ दोन्ही आवश्यक आहेत. आपल्या देवतांनीही हातात शस्त्रे घेतली होती. क्षत्रिय धर्माचे पालन करणार्‍यांना हीन लेखू शकत नाही, असे उद्गार प.पू. डॉ. संतोष देवजी महाराज यांनी काढले.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांविषयी गौरवोद्गार

अधिवेशनात पुष्कळ शिकायला मिळत आहे. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते विविध प्रांतांतून आले आहेत. ते उच्चशिक्षितही आहेत, तरी त्या सर्वांमध्ये एकाच प्रकारची सौम्यता, मधुरता, नम्रता आणि आपलेपणा आहे. ही गुरुदेवांकडून (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून) घेतलेली प्रेरणा आहे, असे गौरवोद्गार प.पू. डॉ. संतोष देवजी महाराज यांनी काढले.

धर्मकार्यातील योगदानानेच आपल्या जीवनाचे सार्थक होईल ! – महामंडलेश्वर नर्मदा शंकरपुरीजी महाराज, निरंजनी आखाडा, जयपूर, राजस्थान

महामंडलेश्वर नर्मदा शंकरपुरीजी महाराज

चांगले काम करतांना येणारी संकटे, म्हणजे आपली परीक्षा असते. मार्गक्रमण करतांना खड्डे, दरी येते; परंतु आपण ते कसे पार करतो ? हा चिंतनाचा विषय आहे. धर्मासाठी आपण काय योगदान देत आहोत ? हा चिंतनाचा विषय आहे. जग तुडवून पुढे जाईल, असे बनावे कि फुलाप्रमाणे सुगंध देणारे व्हावे ? हे आपण ठरवावे. सुगंध आणि दुर्गंध दोन्ही ईश्वरानेच निर्माण केले आहेत; पण आपण कुठे उभे रहायचे ? हे आपण ठरवायचे आहे. गटाराच्या बाजूला उभे राहून दुर्गंध घेत ईश्वराला दोष द्यायचा, असे चालणार नाही. ‘बुद्धी भ्रष्ट झाल्याने चुकीचे वागलो’, असे कारण आपणाला देता येणार नाही; कारण भगवंताने मनन-चिंतन करण्याची क्षमता दिली आहे. केवळ क्षमायाचनेने आपण भगवंताच्या जवळ पोचू शकतो. कुणी पुष्पहार घातला किंवा पाठ थोपटली, म्हणजे जीवन सार्थकी लागले, असे होत नाही. जेव्हा आपल्याकडे असलेले धर्मकार्य पूर्ण करू, तेव्हा आपल्या जीवनाचे सार्थक होईल.

सनातनच्या आश्रमात ईश्वराच्या शक्तीचा अनुभव घेतला !

नामजप आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी आपण सनातन संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करायला हवा. सनातन संस्था करत असलेल्या कार्याची तुलना होऊ शकत नाही. गोवा येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरात गेलो असतांना तेथील भाजीपाल्याचे एक-एक पान बोलत होते. तेथील परिसर पाहिल्यावर तेथे परमात्म्याची शक्ती कार्यरत असल्याचा मला अनुभव आला. हे मला कुणी सांगितले नाही, तर याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. संख्याबळापेक्षा दर्जा महत्त्वाचा आहे, असे गौरवोद्गार महामंडलेश्वर नर्मदा शंकरपुरीजी महाराज यांनी काढले.

आफ्रिकेतील लोकांना सनातन धर्माचे महत्त्व पटले, तर तेथे मोठ्या प्रमाणात प्रसार होईल ! – श्रीवास दास वनचारी, इस्कॉन, घाना, आफ्रिका

श्रीवास दास वनचारी

सनातन धर्म अनादी, अनंत आहे. सनातन धर्म लाखो वर्षे जुना आहे. सनातन धर्म हे सर्व धर्मांचे मूळ आहे. प्रभुपाद स्वामीजींनी अमेरिकेत ‘इस्कॉन’ची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी सनातन धर्माचा जगभर प्रसार केला. त्यांनी सनातन धर्मांतील विविध ग्रंथांचे जगभरातील विविध भाषांमध्ये भाषांतर केले. जगभरात महाभारताला एक विशेष महत्त्व आहे. आफ्रिकेत सनातन धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात चालू आहे. आफ्रिकेत हिंदूंची ५७ मंदिरे आहेत. आफ्रिकेत रामायण आणि भगवद्गीता यांचा अभ्यास केला जातो. तेथील ख्रिस्ती हिंदु धर्माला विरोध करतात. त्यांना हिंदु धर्माचा प्रचार आफ्रिकेत नको असतो; मात्र आम्ही ‘हरिनाम’ म्हणत त्यांना सामोरे जातो.

आफ्रिकेतील लोक कुंभकर्णाप्रमाणे झोपलेले आहेत. त्यांना सनातन धर्माचे महत्त्व पटले, तर तेथे सनातन धर्माचा आणखी मोठ्या प्रमाणात प्रसार होणार आहे. घानामध्ये अनेक लोग हिंदु धर्म स्वीकारतात. तेथे सनातन धर्माच्या अंतर्गत सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य चालू आहे.

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती आंदोलनात सहभागी व्हा ! – आचार्य राजेश्वर, राष्ट्रीय अध्यक्ष, संयुक्त भारतीय धर्मसंसद, राजस्थान

आचार्य राजेश्वर

‘भागवत कथेचा कार्यक्रम रहित करून हानी झाली तरी चालेल; परंतु वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला जायचेच’, असे मी ठरवले होते. ज्या संघटना संपूर्ण भारतात हिंदुत्वाचे कार्य वाढवत आहेत, त्यांना या अधिवेशनाला येण्याची संधी मिळाली आहे. उपदेश करणारे पुष्कळ असतात; परंतु प्रत्यक्षात कृती करणारे अल्प असतात. १३.२७ एकर एवढ्या श्रीकृष्ण जन्मभूमीवर आज मशीद आहे. आतापर्यंत कुतुबुद्दीन, तुघलक, जहांगीर आदी अनेक आक्रमकांनी श्रीकृष्ण मंदिरासह येथील शेकडो मंदिरे पाडली. अनेक वेळा श्रीकृष्णाचे भव्य मंदिर उभारण्यात आले; परंतु ते पाडण्यात आले. आता परत श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त करून तिथे भव्य मंदिर उभारायचे आहे. हा लढा देण्यासाठी साधनेने आणि नामजपाने आपले आध्यात्मिक सामर्थ्य वाढवायला हवे. त्यामुळे आपण आपले धैर्य गमावून कर्तव्यच्युत होणार नाही. श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीसाठी तुम्ही सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे मी आवाहन करतो.