हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार होण्यासाठी आपण सातत्याने आध्यात्मिक धारणेच्या आधारावर प्रयत्नरत राहूया ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी, कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने संत संदेश !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोमंतकाच्या पवित्र भूमीवर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हिंदु राष्ट्राच्या उत्कर्षासाठी होणार्‍या या महोत्सवामध्ये चर्चेला येणारे विषय जिव्हाळ्याचे आहेत. त्यामुळे या महोत्सवाला शुभकामना पाठवणे, हे माझे अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य आहे. मी या महोत्सवाच्या संयोजकांचे अभिनंदन करतो आणि महोत्सवाच्या निर्विघ्नतेसाठी शुभकामना प्रदान करतो. योगायोगाने मी बोलत आहे, त्या दिवशी, म्हणजेच २० जून या दिवशी ‘शिवसाम्राज्यदिना’चा उत्सव आहे. महान शिवछत्रपतींच्या साम्राज्य स्थापनेला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. महाराजांनी हे साम्राज्य हिंदु आणि गोरगरीब जनता यांच्या रक्षणासाठी स्थापन केले होते. हिंदुत्वामध्ये संपूर्ण विश्वाचे मांगल्य सामावले आहे. त्यामुळे ‘हिंदुसाम्राज्यदिन’ हा महत्त्वाचा उत्सव आपण सगळे साजरे करतो. योगायोगाने २० जून या दिवशी ‘बकरी ईद’ही होती. त्या निमित्ताने शेकडो गोमाता आणि सहस्रो जनावरे यांची हत्या करण्यात येत असल्याच्या बातम्या पहायला मिळाल्या. हे सर्व पहात असतांना डोळे सारखे पाणावत आहेत. या ३५० वर्षांमध्ये शिवछत्रपतींच्या त्या संकल्पाची आपण किती पूर्तता केली ?, याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा अशा महोत्सवांची आवश्यकता आहे.

त्यामुळे ‘वन्ही तो चेतवावा रे । चेतविताचि चेततो ।।’ या समर्थांच्या उक्तीप्रमाणे आपण या मार्गावर हळूहळू का होईना पुढे जात राहिले पाहिजे. जगाला सुखी व्हायचे असेल, तर भारत समर्थ हवा आणि भारत समर्थ करण्यासाठी हिंदू सशक्त पाहिजे. त्यात मला हिंदु राष्ट्राचे आणि हिंदु साम्राज्याचे खरेखुरे समीकरण सापडते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘राजकारणाचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण झाले पाहिजे’, असे म्हटले होते. या सैनिकीकरणाचा गाभा आध्यात्मिकीकरण हा आहे. अर्जुन सैनिक होता; पण तो मुळात आध्यात्मिक धारणेचा होता. त्याप्रमाणे आपण सर्वांनी आध्यात्मिक धारणेच्या आधारावर सैनिकाची वृत्ती बाळगूया आणि हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार होण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत राहूया. यासाठी परमात्मा सर्वांना निश्चितपणे बळ देईल, अशी श्री भवानीमातेच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वांना शुभकामना आणि भरभरून शुभेच्छा !