‘हलाल प्रमाणपत्रा’ला ‘ॐ प्रमाणपत्रा’चा झटका !

‘१२ ज्योतिर्लिंगांपैकी आद्यज्योतिर्लिंग समजल्या जाणार्‍या त्र्यंबकेश्वरमध्ये (जिल्हा नाशिक) ‘हिंदूंपासून हिंदूपर्यंत’ या मोहिमेअंतर्गत मंदिर परिसरातील दुकानदारांना ‘ॐ शुद्धता प्रमाणपत्र’ विनामूल्य वितरीत करण्यात आले. ‘ॐ प्रमाणपत्र’ ही हिंदूसंघटन आणि हिंदूंचे सक्षमीकरण यांची लढाई आहे, तसेच ती हिंदूंच्या अस्तित्वाचीही एक चळवळ आहे.

१. ‘ॐ शुद्धता प्रमाणपत्रा’ची आवश्यकता का ?

मंजिरी मराठे

‘हलाल प्रमाणपत्रा’चा (हलाल म्हणजे इस्लामनुसार जे वैध ते) प्रारंभ ५० वर्षांपूर्वी झाला. ‘हलाल हे केवळ मांस-मटण यांच्याशी संबंधित आहे’, अशी अजूनही सर्वसामान्य जनतेची समजूत आहे; पण लग्नसमारंभात दिली जाणारी सुपारीची पुडी, ‘बेकिंग’ पावडर, खाद्यपदार्थ, प्रसिद्ध आस्थापनांचे पिझ्झा, बर्गर, औषधे, सौंदर्यप्रसाधने, पर्यटन ते शेअर (समभाग) बाजार अशी हलाल प्रमाणपत्राची व्याप्ती आहे.

आपल्याच देशात आपलेच उत्पादन विकायचे असेल, तर हलाल प्रमाणपत्राची सक्ती केली जाते. प्रत्येक उत्पादनासाठी पैसे घेतले जातात. आपल्याच पैशातून वर्ष २०२३ मध्ये हलाल अर्थव्यवस्था १० सहस्र कोटी डॉलर्सवर (८३ सहस्र कोटी रुपयांवर) पोचली होती. आता ती अधिकच वाढली असेल. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी समांतर अशी ही अर्थव्यवस्था आहे. काही इस्लामी देशात आपली उत्पादने विकायची असतील, तर हलाल प्रमाणपत्राची सक्ती केली जाते. आपल्या देशात हलाल प्रमाणपत्राची सक्ती का ? ‘हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘जमियत-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ या संघटना हा पैसा गोळा करतात. या प्रमाणपत्राच्या माध्यमातून गोळा झालेला पैसा आपल्याच विरोधात देश विघातक कारवायांसाठी वापरला जातो. यावर भारत शासनाचे कुठलेही बंधन नाही. याला हिंदूंनी कधीतरी एकजुटीने विरोध करणे आवश्यक होते, त्याच्या विरोधात उभे राहणे आवश्यक होते. त्याचा प्रारंभ ‘ॐ प्रतिष्ठान’च्या माध्यमातून झाला आहे.

२. ‘ॐ शुद्धता प्रमाणपत्रा’ला त्र्यंबकेश्वरपासून (जिल्हा नाशिक) प्रारंभ

हलालचे चिन्ह असलेली वस्तू विकत न घेणे आणि त्याविषयी विक्रेत्याला जागरूक करणे, हे प्रत्येक हिंदु नक्कीच करू शकतो; पण ती जागरूकता येण्यासाठी बराच वेळ जाईल. आपल्या देवस्थानांमध्ये कोट्यवधी भाविक दर्शनाला जात असतात. अनेक ठिकाणी मिळणारे पूजा साहित्य आणि प्रसाद यांमध्ये गायीची चरबी वापरलेला प्रसाद, थुंकलेले साहित्य, रसायनमिश्रित हळद-कुंकू विक्रीस ठेवलेले आढळून आले आहे. अमरावतीमध्ये तर पाव भाग खवा आणि पाऊण भाग गायीची चरबी वापरून केलेल्या पेढ्यांचा प्रचंड मोठा व्यवसाय आहे. हे लक्षात आल्यानंतर ‘ॐ प्रमाणपत्रा’ची आवश्यकता अधिकच वाटू लागली. त्याला देवस्थानांपासूनच प्रारंभ करण्याचे निश्चित झाले. महंत आचार्य पिठाधीश्वर अनिकेत शास्त्री महाराज यांनी पुढाकार घेतल्यामुळे याला त्र्यंबकेश्वरपासून प्रारंभ करण्याचे ठरले. नाशिक क्षेत्रातील १३ प्रमुख हिंदु धार्मिक संघटना आणि विक्रेते ‘ॐ शुद्धता प्रमाणपत्रा’च्या समर्थनार्थ उभे ठाकले. नाशिक, पुणे आणि मुंबई येथूनही असंख्य मंडळी या चळवळीत सहभागी झाली.

३. ‘ॐ शुद्धता प्रमाणपत्र’, म्हणजे व्यवसाय किंवा शासकीय यंत्रणेला आव्हान नव्हे !

नाशिकनंतर देशभरातील दुकानदारांना ‘ॐ शुद्धता प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. ‘हिंदु विक्रेत्याकडून विकण्यात येणारे उत्पादन, हे हिंदूंनीच बनवलेले असावे’, याचीही खातरजमा केली जाणार आहे. ‘ॐ शुद्धता प्रमाणपत्र’ हा काही पैसे कमावण्यासाठी चालू केलेला व्यवसाय नाही किंवा शासकीय यंत्रणेला आव्हान देण्याचाही प्रयत्न नाही. हा प्रयत्न आहे तो हिंदूंच्या व्यवसाय वृद्धीचा, हिंदूंच्याच सक्षमीकरणाचा, हिंदूंच्या एकजुटीचा आणि हिंदूंच्या बळाचा !

४. ‘ॐ शुद्धता प्रमाणपत्रा’च्या यशस्वीततेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सहभाग आवश्यक !

मुसलमानांनी प्रश्न विचारण्यापूर्वी शंकाकुशंका घेणारे आपल्यातीलच पुष्कळ विरोधक आहेत; पण त्यापैकी कुणीही हलालच्या विरोधात आवाज उठवलेला ऐकिवात नाही. आपल्यावर शेकडो वर्षे राज्य केलेल्यांना आपल्यातील दोष नेमके ठाऊक आहेत आणि म्हणूनच ते आपल्यावर शिरजोर होत आहेत. ‘ॐ प्रतिष्ठान’ हा ५० वर्षे जुन्या झालेल्या संघटनेला टक्कर देण्याचा प्रयत्न आहे. हे काम सोपे नाही. हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि सावरकरप्रेमी संस्था या सर्वांच्या सहकार्यानेच हे काम शक्य होणार आहे.

५. ‘ॐ शुद्धता प्रमाणपत्र’ पडताळण्याची प्रक्रिया

‘ॐ शुद्धता प्रमाणपत्रा’वर असलेला ‘क्यू.आर्. कोड’ (क्यू.आर्. कोड, म्हणजे सांकेतिक भाषेतील संक्षिप्त स्वरूपातील संगणकीय माहिती) ‘स्कॅन’ केला की, ‘ॐ शुद्धता प्रमाणपत्र’ घेतलेल्या केंद्राचे नाव आपल्याला भ्रमणभाषसंचावर दिसेल. ते नाव आणि प्रत्यक्ष केंद्रावरचे नाव एकच असेल, तर आपण योग्य ठिकाणी असल्याचे आपल्या लक्षात येईल. जर ‘क्यू.आर्. कोड स्कॅन’ केल्यानंतर दिसणारे नाव आणि केंद्राचे नाव एक नसेल, तर ते प्रमाणपत्र चुकीचे असून त्या केंद्राचे नाही, हे आपल्या लक्षात येईल. अशा वेळी तेथे खरेदी न करता आपल्याला त्याची तक्रारही नोंदवायची आहे.

६. हिंदूंचे अस्तित्व आणि भवितव्य यांसाठी ‘ॐ शुद्धता प्रमाणपत्र’ चळवळीत सहभागी व्हा !

ही यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेच; पण ती देशभर राबवण्यासाठी विविध गावे आणि शहरे यांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांसमवेत इतरही पुष्कळ मनुष्यबळ लागणार आहे. त्यातूनही रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे सर्व हिंदूंना आवाहन आहे की, हिंदूंचे अस्तित्व, हिंदूंचे भवितव्य आणि हिंदूंची व्यवसायवृद्धी यांसाठी ‘ॐ शुद्धता प्रमाणपत्र’ चळवळीत सहभागी व्हा अन् आपल्या भावी पिढ्यांचे आयुष्य सुकर करा !’

– मंजिरी मराठे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई.