चिपळूणमध्ये शिधापत्रिका सदस्यांची ‘ई-केवायसी’ मोहीम चालू
चिपळूण – सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा विभागांतर्गत शिधापत्रिका (रेशन कार्ड) ‘ई-केवायसी’विषयी नवीन आदेश घोषित केला आहे. बोगस धान्य वाटपास आळा बसावा; म्हणून शिधापत्रिकेवर (रेशन कार्डवर) नावे असलेल्या सर्व सदस्यांची ई-केवायसी केली जात आहे. शिधापत्रिकाधारकाने ई-केवायसी केले नाही आणि अधिकार्यांना तपासणीत काही त्रुटी आढळल्या, तर त्याचे नाव शिधापत्रिकेतून काढले जाणार आहे. चिपळूण येथे ही मोहीम आता चालू करण्यात आली आहे.
शासनाकडून ३० सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. तालुक्यात प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी एकूण ४१ सहस्र २८८ शिधापत्रिकाधारक आहेत. यातील प्राधान्याची ६ सहस्र २३६ शिधापत्रिका धारक आहेत. जे कार्डधारक ई-केवायसी करणार नाहीत, त्यांना धान्य वितरित केले जाणार नाही. लवकरात लवकर केवायसी भरला नाही, तर धान्य मिळण्यात अडचणी येऊ शकतात. या मोहिमेतून बनावट शिधापत्रिकाधारक शोधण्यात येत आहेत. या मोहिमेमुळे बरेच ग्राहक चुकीच्या पद्धतीने रेशन घेत असतात त्यालाही आळा बसणार आहे.