भक्तीभावाने अर्पण केलेली सेवा सत्य साईबाबा यांनी स्वीकारल्याची आलेली अनुभूती !

‘भक्ताने सत्य साईबाबा यांच्या (बाबांच्या) चरणी लहानातली लहान गोष्ट भक्तीभावाने अर्पण केली, तरी सत्य साईबाबा ती स्वीकारून आपल्याला आशीर्वाद देतात. ते त्या व्यक्तीची परिस्थिती, संपत्ती किंवा पद पहात नाहीत. यासंदर्भात मला आलेली अनुभूती येथे दिली आहे.

सत्य साईबाबा

१. भाचीच्या घरातील देवघरात सत्य साईबाबा यांचे छायाचित्र असून प्रत्येक गुरुवारी आरतीसाठी तिच्याकडे फुले घेऊन जात असणे

‘माझ्या भाचीच्या घरातील देवघरात सत्य साईबाबा (बाबा) यांचे छायाचित्र असून त्याची प्रतिदिन पूजा केली जाते. मी प्रत्येक गुरुवारी जवळच्या मंदिरातून काही फुले विकत घेऊन तिच्या घरी आरतीसाठी जातो. कधी ‘मला आरतीला पोचायला उशीर होईल’, असे वाटते, तेव्हा वेळेत जाता येण्यासाठी मी माझ्या चालकाला जवळच्या मंदिरातून फुले आणायला सांगतो.

कर्नल रामाकृष्णन् सी.एन्. (निवृत्त)

२. ‘फुले स्वतःच निवडून घेऊन आरतीला जावे’, असा विचार आल्याने चालकाला फुले आणायला न सांगणे

त्या दिवशी गुरुवार होता. ‘मला उशीर होणार’, असे वाटल्याने ‘चालकाला फुले आणायला सांगायला हवे’, असा विचार माझ्या मनात आला; पण घरची प्रतिदिनची देवपूजा करतांना अकस्मात् माझ्या मनात आले, ‘आज स्वतःच मंदिरात जाऊन सत्य साईबाबांसाठी फुले निवडून घ्यायला हवीत.’ त्यामुळे मी वेळ वाचवण्यासाठी चालकाला इतर काही गोष्टी करायला पाठवले; पण फुले आणायला सांगितली नाहीत. देवपूजा करतांना माझ्या मनात आले, ‘सत्य साईबाबांच्या चरणी प्रार्थना करावी, ‘त्यांनी माझ्याकडून काही सेवा करून घ्यावी.’ मी तशी प्रार्थना केली. माझी पूजा संपेपर्यंत दुपार झाली. तेव्हा मला वाटले, ‘माझ्या भाचीच्या घरी होणारी सत्य साईबाबांची आरती संपली असेल !’

३. भाचीने एका भक्तासाठी ‘१०० रुपयांची फुले घेऊन या’, असे सांगणे

मी घाईघाईने गाडीत बसतांना तिला भ्रमणभाष करून तिची क्षमा मागितली. माझा तिच्याशी पुढील संवाद झाला.

मी : मला उशीर झाला आहे; पण मी सत्य साईबाबांच्या दर्शनासाठी येऊ शकतो का ?

भाची : तुम्ही येणार आहात का ?

मी : हो, फुले घेतो आणि लगेच येतो.

भाची : फुले आणणार असाल, तर माझ्यासाठी आणखी १०० रुपयांची फुले आणाल का ? एका भक्ताला ती फुले सत्य साईबाबांच्या चरणी अर्पण करायची आहेत. तुम्ही आल्यानंतर मी तुम्हाला पैसे देईन.

४. ‘सत्य साईबाबांनीच ही सेवेची संधी दिली आहे’, हे लक्षात येणे

तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘स्वतः मंदिरात जाऊन फुले निवडून घेण्याचा विचार आणि त्या सेवेची संधी सत्य साईबाबांनीच मला दिली आहे.’ मी फुले आणायला मंदिरात गेलो, तेव्हा तेथील फूलविक्रेत्याकडे केवळ झेंडूची पिवळ्या रंगाची सुंदर फुले होती. देहली येथे ही फुले सहसा मिळत नाहीत. मी १०० रुपयांची फुले मागितल्यावर त्याने मला पुष्कळ अधिक फुले दिली.

५. गृहकृत्य साहाय्यक सेविकेची आर्थिक स्थिती चांगली नसूनही तिने सत्य साईबाबांच्या चरणी १०० रुपयांची फुले अर्पण करणे

माझ्या भाचीने स्वतः त्या फुलांनी देवघर सजवले. ती मला म्हणाली, ‘‘माझ्या घरी येणार्‍या गृहकृत्य साहाय्यक सेविकेने पूजेसाठी ती फुले आणायला सांगितली होती. ती एकटीच रहाते. तिला घरी पुष्कळ कामे करावी लागतात. तिला शक्य नसतांनाही तिने १०० रुपयांची फुले सत्य साईबाबांच्या चरणी अर्पण करायला सांगितली आहेत. तिला कामे सोडून फुले आणायला जाणेही शक्य नाही.’’

६. सत्य साईबाबांनी दिलेली प्रचीती !

माझी भाची आरतीची सिद्धता करत असतांना ती सेविका घाईघाईने आली आणि फुलांची ती सुंदर सजावट पाहून तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. तिने हात जोडून प्रार्थना केली, ‘‘(सत्य साई)बाबा, मला प्रार्थना करता येत नाही; परंतु ‘ही फुले तुम्ही स्वीकारावी’, अशी माझी इच्छा आहे.’’ आम्ही आरती करतांना सत्य साईबाबांनी तिची प्रार्थना स्वीकारली असल्याचे अनेक संकेत मिळत होते. देवघरातील हनुमानाच्या मूर्तीला वाहिलेले फूल आपोआप खाली पडले. सत्य साईबाबांनी त्वरित तिने अर्पण केलेली फुले आणि माझी सेवा स्वीकारल्याचा हा संकेतच दिला होता.

गृहकृत्य साहाय्यक सेविकेला प्रसादाच्या समवेत ते फूलही प्रसाद म्हणून दिले. यातून लक्षात आले, ‘स्वामी (सत्य साईबाबा) पडद्यामागे राहून भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे सर्व घडवतात !’

– कर्नल रामाकृष्णन् सी.एन्. (निवृत्त), देहली (जून २०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक