दुसर्याची प्रकृती गंभीर, कळंबजवळ घडली घटना
पुणे – जिल्ह्यातील मंचर पोलीस ठाण्याच्या परिसरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर मोहिते पाटील याने भरधाव चारचाकी चालवत दुचाकीला धडक दिली. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसर्याची प्रकृती गंभीर आहे. २२ जूनला रात्री पुणे-नाशिक महामार्गावर कळंबजवळ ही भीषण घटना घडली आहे. ओम भालेराव असे मृत तरुणाचे नाव आहे.
मयूर याने अपघातग्रस्ताला साहाय्य केले नाही !
चारचाकीने दिलेली धडक इतकी भीषण होती की, दुचाकी दूर उडाली. या अपघातानंतर मयूर मोहिते पाटील हा साहाय्य न करता चारचाकीमध्येच बसून होता. या घटनेनंतर मृतांचे नातेवाईक आणि जमा झालेले लोक यांनी मंचर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली. ‘मयूर याने ओम भालेराव यांना रुग्णालयात नेण्यास वेळीच साहाय्य केले असते, तर त्याचा जीव वाचला असता’, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
मयूर याच्या विरुद्ध गुन्हा नोंद !
मयूर मोहिते पाटील याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मयूर मोहितेने मद्यप्राशन केले होते कि नाही ? याचे अन्वेषणही पोलीस करत आहेत. पुतण्याने मद्यप्राशन केलेले नव्हते, असे दिलीप मोहिते पाटलांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.