(म्‍हणे) ‘वर्ष १९८५ च्‍या एअर इंडिया कनिष्‍क बाँबस्‍फोटाची चौकशी चालूच !’

कॅनडाच्‍या पोलिसांनी प्रसारित केले निवेदन

एअर इंडियाच्‍या कनिष्‍क विमानामध्‍ये झालेला बाँबस्‍फोट

ओटावा (कॅनडा) – वर्ष १९८५ मध्‍ये एअर इंडियाच्‍या कनिष्‍क विमानामध्‍ये झालेल्‍या बाँबस्‍फोटाच्‍या प्रकरणी कॅनडाच्‍या पोलिसांनी अन्‍वेषण चालू असल्‍याचे सांगितले. पोलिसांनी याला ‘सर्वांत अधिक काळ चाललेला आणि गुंतागुंतीचा ‘घरगुती आतंकवाद’, असे  म्‍हटले आहे. या बाँबस्‍फोटाच्‍या ३९ व्‍या वर्षपूर्तीनिमित्त कॅनडातील भारतीय वाणिज्‍य दूतावासांनी यात बळी पडलेल्‍या प्रवाशांना श्रद्धांजल वाहण्‍याचे कार्यक्रम आयाजित केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी हे वक्‍तव्‍य केले आहे. २३ जून या दिवशी कॅनडातील व्‍हँकुव्‍हरच्‍या स्‍टॅनले पार्कच्‍या कॅपरले प्‍लेग्राउंड परिसरात एअर इंडिया मेमोरियलमध्‍ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला. त्‍याच वेळी टोरोंटोच्‍या क्‍वीन्‍स पार्कमधील सर्व्‍हिस साऊथ लॉनमध्‍ये मृत झालेल्‍यांच्‍या स्‍मारकाच्‍या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्‍यात आली.

१. २३ जून १९८५ या दिवशी एअर इंडियाचे कनिष्‍क विमान लंडनच्‍या हिथ्रो विमानतळावर उतरणार होते; मात्र त्‍यापूर्वी स्‍फोट झाला होता. विमानातील सर्व ३२९ लोक मारले गेले. यातील बहुतांश भारतीय वंशाचे कॅनडाचे नागरिक होते.

२. पोलीस साहाय्‍यक आयुक्‍त डेव्‍हिड टेबोल यांनी प्रसारित केलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, एअर इंडिया विमानाच्‍या प्रकरणाचे अन्‍वेषण आमच्‍या इतिहासातील सर्वांत लांब आणि निश्‍चितपणे देशांतर्गत आतंकवादाच्‍या सर्वांत जटिल अन्‍वेषणांपैकी एक असून आमचे अन्‍वेषण चालू आहे. या बाँबस्‍फोटाचा परिणाम कालांतराने अल्‍प झालेला नाही. या स्‍फोटांमुळे पुढच्‍या पिढ्यांवर परिणाम झाला आहे. आतंकवादाच्‍या इतर घटनांमध्‍ये गमावलेल्‍या निष्‍पाप जिवांना आपण कधीही विसरता कामा नये.

(सौजन्य : India Narrative)

संपादकीय भूमिका

  • कॅनडासारख्‍या प्रगत देशात ३९ वर्षांपूर्वीच्‍या बाँबस्‍फोटाची चौकशी अजूनही चालू असणे, हे लज्‍जास्‍पदच होय !
  • पोलिसांनी अशा प्रकारचे निवेदन करून जगाच्‍या डोळ्‍यांत धूळफेक करण्‍याचा प्रयत्न केला असला, तरी यामुळे कॅनडाची प्रतिमा मलिनच झाली आहे. तेथील खलिस्‍तानान्‍यांच्‍या पाठिंब्‍यावर चालणार्‍या उद्दाम ट्रुडो सरकारला हे कळत नाही का ?