Noida Cyber Fraud : कुरियरद्वारे आक्षेपार्ह साहित्य आल्याचे सांगून वृद्ध महिलेची १ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक !

नोएडा (उत्तरप्रदेश) – नोएडातील ७३ वर्षांच्या महिलेला सलग ५ दिवस ब्लॅकमेल करून तिच्याकडून १ कोटी ३० लाख रुपये लुबाडण्यात आले. गुन्हेगारांनी या महिलेला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहारात तिचा सहभाग असल्याची भीती दाखवून तिच्याकडून पैसे उकळले होते.

सूची अग्रवाल असे या पीडित वृद्ध महिलेचे नाव आहे. त्यांना गुन्हेगारांनी १३ जून या दिवशी मुंबईच्या अंधेरीतील कुरियरच्या दुकानातून बोलत असल्याचा दूरभाष केला होता. ‘आम्हाला एक पार्सल मिळाले आहे. त्यामध्ये आक्षेपार्ह सामान आहे’, असे त्यांनी महिलेला सांगितले. त्यानंतर दुसर्‍या गुन्हेगाराने स्वत:ला तपास अधिकारी असल्याचे भासवत महिलेला मुंबईला येण्याचा आदेश दिला. ‘आमचे ऐकले नाही, तर अमली पदार्थ नियंत्रण विभाग तुमची चौकशी करील’, अशी भीती आरोपींनी तिला दाखवली. त्यानंतर या महिलेने कुटुंबियांना याविषयी काहीही सांगितले नाही आणि ५ दिवसांमध्ये त्यांना १ कोटी ३० लाख रुपये ऑनलाईन हस्तांतरित केले.

संपादकीय भूमिका

देशात अशा प्रकारच्या फसवणुकीचे वाढते प्रकार पहाता केंद्रीय गृहमंत्रालयाने याकडे गांभीर्याने पाहून कारवाई करणे आवश्यक आहे !