वाराणसी (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरातील श्रीरामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार्या १२१ वैदिक ब्राह्मणांचे नेतृत्व करणारे मुख्य पुजारी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे २२ जून या दिवशी सकाळी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. डिसेंबर २०२१ मध्ये काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनाच्या पूजेतही ते सहभागी झाले होते.
प्रत्येक प्रकारच्या पूजाविधीमध्ये ते पारंगत होते. त्यांनी वेद आणि अनुष्ठान यांची दीक्षा त्यांचे काका गणेश दीक्षित भट्ट यांच्याकडून घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकामध्ये दीक्षित यांच्या पूर्वजांचाही सहभाग होता, असे सांगितले जाते. पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ ठरवणारे गणेश्वर शास्त्री द्रविड यांनीही शोक व्यक्त केला आहे.