नामजप करत अन्न ग्रहण करणे, हे पवित्र यज्ञकर्मच !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. नामजप करत अन्न ग्रहण करण्याचे महत्त्व

‘एकदा मला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांचा सत्संग लाभला. तेव्हा त्यांनी मला नामजप करत अन्न ग्रहण करण्याचे महत्त्व सांगितले. सद्गुरु पिंगळेकाका म्हणाले, ‘‘बरेच जण सामूहिक कार्यक्रमात किंवा घरी अन्न ग्रहण करण्यापूर्वी श्लोक म्हणून अन्न ग्रहण करतात; पण त्यांना त्याचा भावार्थ तितकासा ठाऊक नसतो. काही जण नुसते श्लोक म्हणायचा; म्हणून म्हणतात. त्याचा अर्थ ठाऊक करून त्याप्रमाणे कृती केल्यास त्याचा निश्चितच आपल्याला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.’’

२. अन्न हे पूर्णब्रह्म असणे

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।।

३. कर्मकांडाप्रमाणे यज्ञ करतांना अग्नि, आहुती आणि मंत्रजप यांची आवश्यकता भासणे, जठरातील अग्नी प्रज्वलित झाल्यानंतरच भूक लागून नामजप करत अन्न ग्रहण करणे केल्यास ते यज्ञकर्म होणे

श्री. अतुल पवार

आपण जेव्हा कर्मकांडाप्रमाणे यज्ञ करतो, तेव्हा आपल्याला अग्नि, आहुती आणि मंत्रजप यांची आवश्यकता भासते. अशाच प्रकारे यज्ञ आपण अन्न ग्रहण करतांनाही करू शकतो. जठरातील अग्नी प्रज्वलित झाल्यानंतरच आपल्याला भूक लागते. तेव्हा आपण अन्न ग्रहण करतो, म्हणजे आहुती देतो. ती आहुती देत असतांना आपण नामजप करत अन्न ग्रहण केल्यास ते यज्ञकर्म होते. ते अन्न कुणाला मिळते, तर अग्नीला. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेलेच आहे, ‘‘अग्नीमधील वैश्वानर मीच आहे.’’

अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १५, श्लोक १४

अर्थ : मीच सर्व प्राण्यांच्या शरिरात रहाणारा, प्राण आणि अपान यांनी संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन चार प्रकारचे अन्न पचवतो. म्हणजे आपण जे अन्न ग्रहण करत असतो, ते प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्णालाच जाऊन मिळते; म्हणून अन्न ग्रहण करत असतांना आपण त्या भावाने नामजप करत ग्रहण करावे.’

– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०२४)