धर्मांतरित हिंदूंना स्वधर्मात घेण्याचे प्रयत्न आणि त्याविषयी आलेले अनुभव

२४ जून २०२४ या दिवशीपासून श्री रामनाथ देवस्थान, गोवा येथे चालू होत असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने…

पू. भागीरथी महाराज यांचा परिचय

पू. भागीरथी महाराज

पू. भागीरथी महाराज हे बेलतरोडी, नागपूर येथील ‘श्री गुरुकृपा सेवा संस्थान’चे अध्यक्ष आहेत. ते विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय सल्लागारही आहेत. ते नागपूर आणि विदर्भ भागातील अनेक गावांमध्ये संपर्क करून धर्मांतर झालेल्या हिंदूंना पुन्हा स्वधर्मात घेण्याचे कार्य करत असतात. ते पू. श्री रामज्ञानी दास महाराज यांचे गुरुबंधू आहेत. ते प्रतिवर्षी त्यांच्या आश्रमात ‘समरसता’ यज्ञाचे भव्य आयोजन करून हिंदूंना संघटित करण्याचा प्रयत्न करतात.

१. हिंदूंना स्वधर्मात आणण्याचा कार्यक्रम थांबवण्यासाठी ख्रिस्त्यांकडून २१ लाख रुपयांचे प्रलोभन

हिंदु राष्ट्र ते हिंदु विश्व !

‘वर्ष २००३ पासून मी धर्मांतरित झालेल्या हिंदूंना स्वधर्मात परत आणण्याचे कार्य करत आहे. वर्ष २०११ मध्ये आणि वर्ष २०२३ मध्ये असे दोनदा माझ्याकडे काही लोक आले होते. ते म्हणाले, ‘‘आपण ‘सामाजिक समरसतेचा यज्ञ’ हा कार्यक्रम चांगला करत आहात. आपण नवरात्र, महाशिवरात्र, श्रीकृजष्ण जन्माष्टमी यांसारखे अनेक उत्सव साजरे करता, तेही हेही ठीक आहे; परंतु आपण ज्या सनातन धर्मासंबंधी बोलून धर्मांतर झालेल्या हिंदूंना परत स्वधर्मात घेता, हे थांबवा.’’ ते एका बॅगेमध्ये नोटांची बंडले घेऊन आले होते. ते म्हणाले, ‘‘यामध्ये २१ लाख रुपये आहेत. ते तुमच्याकडे ठेवून घ्या आणि भव्य असा यज्ञ करा. तुमचे जे काही अनुष्ठान आहे, ते करा; पण ‘घरवापसी’ (धर्मांतरित हिंदूंना स्वधर्मात घेणे) बंद करा.’’ मी त्यांना म्हटले, ‘‘धन्यवाद ! तुमचे पैसे तुमच्याजवळच ठेवा. ज्या दिवशी मला गरजूंसाठी याची आवश्यकता भासेल, तेव्हा त्यांना मी तुमचा पत्ता देईन. त्यांना तुम्ही हे पैसे द्यावे. मला काही तुमचे पैसे नको.’’

२. घरवापसी बंद पाडण्यासाठी ख्रिस्त्यांकडून संघटनेत फूट पाडण्याचे प्रयत्न

त्यानंतर काही लोकांनी माझ्या विरोधात शेजारच्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संघटनेत फूट पाडण्याचे प्रयत्न झाले. तोडण्याची परंपरा आहे; परंतु जोडण्याची एकच परंपरा आहे, ती म्हणजे सनातन शाश्वत धर्म घेऊन चालणे, सत्य बोलणे, दया करणे, तसेच आप्तस्वकियांकडून नकळतपणे चूक झाली असेल, तर त्यांना क्षमा करणे. त्यामुळे समाज जोडला जातो. आपल्या हिंदु बांधवांकडून चूक झाल्यास आपण त्यांचा तिरस्कार आणि अनादर करतो. याउलट धर्मांतरितांना त्यांच्या पंथियांकडून त्यांना सन्मान मिळतो, हे टाळले पाहिजे.

३. कोरोना महामारीच्या काळात हिंदुत्वनिष्ठांनी गरिबांना दिलेल्या साहित्याचे श्रेय लाटण्याचा ख्रिस्त्यांचा प्रयत्न

कोरोना महामारीच्या काळात अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी समाजात विविध प्रकारच्या संचाचे वितरण केले; पण त्यावर कुणाचेही ‘लेबल’ छापले नव्हते. तेथे जाऊन ख्रिस्त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही तुमच्यासाठी सामुग्री पाठवली होती, ती मिळाली का ?’’ लोक म्हणाले, ‘‘मिळाली’’; कारण की, त्या संचावर काही लिहिलेलेच नव्हते. अशा प्रकारे लोकांचे धर्मांतर केले जाते. असे धर्मांतरित झालेल्या हिंदूंना परत स्वधर्मात घेण्याचे कार्य आम्ही विदर्भात केले. त्यानंतर आमचे कार्य थांबवण्याचे त्यांनी (ख्रिस्त्यांनी) प्रयत्न भरपूर केले.

४. प्रभु श्रीरामासारखे सर्व समाजघटकांना जोडण्याचे कार्य करणे आवश्यक !

देवभक्ती करणारी मीरा, शबरी, ध्रुवबाळ, प्रल्हाद, संत रविदास, तुलसीदास, कबीर एवढेच नाही, तर हनुमानालाही थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; पण यांपैकी कुणाचीही भक्ती थांबली नाही. आपण त्यांच्या एवढे नाही; पण थोडेतरी कार्य करू शकतो. प्रभु श्रीराम यांनी वनवासात असतांना आदिवासी, वनवासी आणि पतित जनांना आलिंगन देऊन आपलेसे करून घेतले होते. प्रभु श्रीरामाने सर्वांना जोडण्याचे कार्य केले. जेव्हा आपण ‘जय श्रीराम’ म्हणतो, तेव्हा आपल्याला श्रीरामाच्या पवित्र चरित्राचे स्मरण झाले पाहिजे. भगवान राम मर्यादापुरुषोत्तम आहेत. मर्यादेने जीवन कसे जगायचे, याची शिकवण ते आम्हाला देतात. आपल्या या भारतात महापुरुषांचे असे अनेक अवतार झाले. त्यामुळे आपल्या भारतभूमीला ‘मातृभूमी’ म्हटले जाते. या भूमीला ‘मातेचा’ दर्जा मिळाला. आपण रशियामाता, इंग्लंडमाता, जर्मनीमाता, पाकिस्तानमाता असे ऐकले नसेल; परंतु भारतमाता आहे, जिच्या नावाने आपण ‘भारत माता की जय’, अशा घोषणा देतो.

५. आपला धर्म आणि संस्कृती यांचा अभिमान बाळगा !

आपण भारतभूमीमध्ये जन्माला आलो आहोत. त्यामुळे आपण हिंदु धर्म अाणि संस्कृती यांना धारण केले पाहिजे. थोर क्रांतीकारक भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांनी भारतमातेसाठी आनंदाने फाशी स्वीकारली; परंतु त्यांनी त्यांचा धर्म सोडला नाही. आपण थोड्याशा पैशांसाठी आपला सनातन धर्म सोडून देतो. त्यामुळे आपल्याहून मोठा धर्मद्रोही कोण असेल ? ‘ज्याप्रमाणे एक बीज शेतात पेरल्यावर तो त्याचे अस्तित्व संपवून टाकतो आणि अंकुरित होऊन पुन्हा फळ देतो. अशा प्रकारे मी नष्ट होईन, मरून जाईन; परंतु माझा हिंदु धर्म कधीच नष्ट होता कामा नये. एवढेच नाही, तर माझ्यासारखे अनेकांना बनवले पाहिजे’, असा संकल्प घेतला पाहिजे.

६. एका व्यक्तीला स्वधर्मात परतआणल्याने एक मंदिर बांधण्याची पुण्यप्राप्ती

आम्ही गावोगावी आणि वनवासी क्षेत्रात गेलो. तेथे आम्हाला धर्मांतरित झालेले काही जण भेटले. आम्ही त्यांना परत हिंदु धर्मात येण्याचे आवाहन केले. त्यांना सांगितले, ‘‘येणार्‍या काळात हिंदु राष्ट्र येणार आहे. त्यामुळे लवकर परत या. नाहीतर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल.’’ ते हिंदु धर्मात परत आल्यावर त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही स्वतःच्या इच्छेने स्वधर्मात परत आले आहात. तुम्हाला मी आणले नाही. आता तुम्ही इतरांनाही असेच स्वधर्मात परत घेऊन यावे.’’ सनातन धर्मापासून लांब गेलेल्या एका व्यक्तीला परत आपल्या धर्माशी जोडून घेतल्यामुळे एक मंदिर बांधण्याचे किंवा एका मंदिरात भंडारा करण्याचे पुण्य सहजपणे प्राप्त होते.

७. समाज संघटित रहाण्यासाठी ‘एक प्रभाग (वॉर्ड) एक सार्वजनिक उत्सव’ उपक्रम आवश्यक !

आपल्या देशात एकता आणि अखंडता भंग पावली होती. त्यामुळे लोकमान्य टिळक यांना वाटले की, आपण सत्संग, भजन आणि कीर्तन यांच्या माध्यमातून समाजाला जोडू शकतो. हे लक्षात घेऊन त्यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम सार्वजनिक गणशोत्सवाचा प्रारंभ केला. त्यानंतर हळूहळू संपूर्ण देशात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणे चालू झाले. त्या निमित्ताने संतांना बोलावणे, संतांचे प्रवचन ऐकणे, रामायण कथा सांगणे, भागवत कथा सांगणे असे कार्यक्रम होऊ लागले. या माध्यमातून समाजाची एकजूट करण्याचा मार्ग त्यांनी अवलंबला. आज याच्या विपरित होऊ लागले आहे. एकेका वॉर्डात अनेक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरे होऊ लागले आहेत. तसेच विविध मंदिरे बांधली जाऊ लागली आहेत. त्यामुळे समाज विभागला जाऊ लागला आहे. अशाने मंदिरांची स्थापना करण्याचे पुण्य मिळेल का ? याचाही हिंदूंनी विचार करणे आवश्यक आहे.

आम्ही सनातन धर्मापासून लांब गेलेल्या एकेका व्यक्तीला स्वधर्मात परत आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एकेक मंदिर उभारण्याचे पुण्य आम्हाला मिळते, या भावनेतून कार्य आरंभले आहे. हे कार्य करणारा मी कुणीच नाही. सर्व भगवंतच करत आहे.

– पू. भागीरथी महाराज, अध्यक्ष आणि संचालक, गुरुकृपा सेवा संस्थान, बेलतरोडी, नागपूर.