Heat Stroke in Mecca : मक्का (सौदी अरेबिया) येथे उष्माघातामुळे ५५० हज यात्रेकरूंचा मृत्यू

२ सहस्र यात्रेकरू रुग्णालयात भरती !

रियाध (सौदी अरेबिया) – आखाती देशांसह मध्य-पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली असून त्याचा परिणाम सौदी अरेबियातील मक्का येथील हज यात्रेवरही झाला आहे. येथे तब्बल ५५० हज यात्रेकरूंचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे, तर २ सहस्रांहून अधिक यात्रेकरूंची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते. ५५० मृतांमध्ये इजिप्तमधील ३२३ नागरिकांचा समावेश आहे.

१. सौदी अरेबियातील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवामान पालटामुळे तेथील वातावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. तेथे सरासरी तापमान ०.४ अंशांनी वाढत आहे. १७ जून या दिवशी मक्का येथील ग्रँड मशिदीच्या परिसरात ५१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

२. यात्रेकरूंना उन्हाचा न्यूनतम त्रास व्हावा, यासाठी तेथील स्वयंसेवक लोकांना पाणी, शीतपेय, आईस्क्रिम आदी वाटत होते. हज व्यवस्थापन समितीने यात्रेकरूंना छत्रीचा वापर करण्याची सूचना दिली आहे, तसेच ‘अधिकाधिक पाणी प्या, दुपारच्या वेळी बाहेर पडू नका’, अशा सूचनादेखील दिल्या आहेत.