मुंबई, १८ जून (वार्ता.) – नुकतेच संतपद प्राप्त केलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. चेंबूर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांना पुष्पहार घालून, तसेच शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार, मुंबईचे समन्वयक श्री. बळवंत पाठक, रायगड समन्वयक श्री. सुनील कदम आणि समितीचे श्री. सतीश सोनार उपस्थित होते. या वेळी दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका सौ. स्नेहा आगवेकर याही उपस्थित होत्या. नुकतेच सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमामध्ये भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित करण्यात आले. या निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचा सन्मान करून त्यांचा आशीर्वाद घेतला. या वेळी भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी अमेरिकेतून हिंदु संमेलनासाठी आलेले निमंत्रण आणि अमेरिकत जाण्याचा पहिला अनुभव, तेथे त्यांच्या प्रवचनांना मिळालेला प्रतिसाद, राष्ट्र आणि धर्म कार्यात त्यांची धर्मपत्नी सौ. (कै.) सुमंगला शेवडे यांनी दिलेली साथ यांविषयीचे अनुभव सांगितले. सद्य:स्थितीत हिंदु धर्माचा प्रचार-प्रसार आणि हिंदु धर्मावरील आघात यांविषयीही भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी मार्गदर्शन केले.