NOTA : वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीत ६७ लाख ८८ सहस्र ४९२ मतदारांकडून नोटाचा वापर !

  •  मागील वेळेपेक्षा नोटाचा वापर करणार्‍यांमध्‍ये २ लाख ७५ सहस्र १३७ जणांची भर

  •  नोटाचा वापर करणार्‍यांमध्‍ये बिहारमध्‍ये प्रथम, तर महाराष्‍ट्र ८ व्‍या स्‍थानी

(‘नोटा’ म्‍हणजे उमेदवार नाकारण्‍यासाठी केलेले मतदान होय. यामध्‍ये निवडणुकीसाठी उभ्‍या असलेल्‍या उमेदवारांपैकी कुणीही पात्र वाटले नाही, तर मतदार ‘नोटा’ हे बटण दाबून स्‍वत:चे मत देतो.)

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीमध्‍ये देशात एकूण ६७ लाख ८८ सहस्र ४९२ मतदरांनी ‘नोटा’ पर्यायाचा वापर केला. वर्ष २०१९ च्‍या लोकसभा निवडणुकीत ६५ लाख १३ सहस्र ३५५ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला होता. वर्ष २०१९ च्‍या तुलनेत वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीत नोटाचा वापर करणार्‍यांची संख्‍या २ लाख ७५ सहस्र १३७ इतकी वाढली आहे. वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीत देशात बिहारमध्‍ये नोटाचा सर्वाधिक म्‍हणजे ८ लाख ९७ सहस्र ३२३ मतदारांनी वापर केला. नोटाचा वापर करणार्‍यांमध्‍ये महाराष्‍ट्र ८ व्‍या क्रमांकावर आहे. महाराष्‍ट्रात एकूण ४ लाख १५ सहस्र ५८० मतदारांनी नोटाचा वापर केला.

देशात नोटाचा वापर करणार्‍यांमध्‍ये छत्तीसगड दुसर्‍या क्रमांकावर असून येथे ५ लाख ९९ सहस्र २४४ जणांनी या पर्यायाचा वापर केला. तिसर्‍या क्रमांकावर असलेल्‍या मध्‍यप्रदेश राज्‍यात ५ लाख ३२ सहस्र ६६७ मतदारांनी, ४ थ्‍या क्रमांकावरील बंगालमध्‍ये ५ लाख २२ सहस्र ७२४ मतदारांनी, पाचव्‍या क्रमांकावरील तमिळनाडू राज्‍यात ४ लाख ६१ सहस्र ३२७ मतदारांनी, सहाव्‍या क्रमांकावरील गुजरातमध्‍ये ४ लाख ४९ सहस्र २५२, तर ७ व्‍या क्रमांकावरील उत्तरप्रदेशमध्‍ये ६ लाख ३४ सहस्र ९७१ मतदारांनी नोटाचा वापर केला.  लक्षद्वीपमध्‍ये नोटाला सर्वांत अल्‍प १३२ मते मिळाली. भारतातील १६ राज्‍यांमध्‍ये नोटाला १ लाखाहून अधिक मते मिळाली आहेत.

महाराष्‍ट्रातील १६ मतदारसंघांत १० सहस्रांहून अधिक मतदारांकडून नोटाचा वापर !

महाराष्‍ट्रात नोटाचे प्रमाण घटले !

वर्ष २०१९ च्‍या लोकसभा निवडणुकीत महाराष्‍ट्रात ४ लाख ८८ सहस्र ७६६ जणांनी नोटाचा वापर केला. वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीत महाराष्‍ट्रात ४ लाख १५ सहस्र ५८० जणांनी नोटाचा वापर केला. म्‍हणजे वर्ष २०१९ च्‍या तुलनेत वर्ष २०२४ मध्‍ये नोटाचा वापर करणार्‍यांची संख्‍या ७३ सहस्र १८६ इतकी घटली आहे. वर्ष २०२४ मध्‍ये महाराष्‍ट्रातील बीड जिल्‍ह्यात सर्वांत अल्‍प म्‍हणजे २ सहस्र ८७ जणांनी नोटाचा वापर केला होता.

संपादकीय भूमिका

  • भारतात ६७ लाखांहून अधिक मतदारांनी ‘नोटा’चा वापर करणे, याचा अर्थ  उमेदवार अपात्र असल्‍याचे इतक्‍या मोठ्या प्रमाणात मतदारांना वाटले, असाच होतो. राजकीय पक्ष याचा गांभीर्याने विचार करणार का ?