भारतीय संस्कृतीतील समाजजीवन !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी लेखन केलेली ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

पू. प्रा. सु.ग. शेवडे

प्रकरण ३

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचे ‘भारतीय संस्कृती’ हे छोटेसे पुस्तक आमच्या नव्या पिढीला भारतीय संस्कृतीची तोंडओळख व्हावी; म्हणूनच लिहून प्रकाशित करत आहोत.         

‘धारणाद्धर्म इत्याहुर्धर्मेण विधृताः प्रजाः ।’

(महाभारत, शान्तिपर्व, अध्याय ११०, श्लोक ११)

अर्थ : धर्म प्रजेची धारणा करतो. प्रजेला धरून ठेवतो. सर्व प्रजा धर्मबंधनांनी बांधलेली असे.

‘अगा जया जें विहित । तें ईश्वराचें मनोगत ।।

’(ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी ९११) म्हणजे ‘अरे अर्जुना, ज्याला जे उचित कर्म सांगितलेले आहे, तेच त्याने करावे, असे ईश्वराचे मनोगत आहे’, असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय संस्कृतीतील व्यक्तीजीवन, विविध प्रकारची बंधने अन् प्रकार, चतुर्विध आश्रम, तसेच भारतीय संस्कृतीतील कुटुंबजीवन’ हे वाचले.

१८ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘४ वर्ण आणि त्यांची कर्तव्ये’ यांतील ‘ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य’ यांविषयी वाचले. आज त्याचा पुढचा भाग येथे देत आहोत.

(लेखांक ७)

लेखांक ६. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/805070.html


१. ४ वर्ण आणि त्यांची कर्तव्ये !

१ ई. शूद्र : काही लोक हा शब्द ‘क्षुद्र’ असा उच्चारतात. ते चुकीचे आहे. शूद्र हे क्षुद्र नव्हते. शूद्र हा चौथा वर्ण होता. या वर्णाने तीन वर्णांची सेवा करावी. म्हणजे काय करावे ? कष्ट, कला आणि कारागिरी हे यांचे कार्य ! कुणी सोन्याचे दागिने बनवीत, कुणी लाकडाचे फर्निचर सिद्ध करत, कुणी तांब्या-पितळेची भांडी बनवत, तर कुणी काचेची भांडी, बांगड्या इत्यादींची निर्मिती करत असे. कुणी कापड विणायचे, तर कुणी कापसापासून धागा बनवत. कुणी कपडे शिवत, तर कुणी शेती करत. या सर्व सोनार, सुतार, लोहार, कोष्टी, शिंपी, कासार इत्यादी जाती या शूद्र वर्णाच्या असत.

पिढीजात विशिष्ट व्यवसाय करून त्या त्या व्यवसायात ते पारंगत होत. समाजातील सर्वच घटकांना त्यांची आवश्यकता असे. अशा शेकडो जाती शूद्रवर्णात आहेत. त्या चारही वर्णांची सेवा करत. शेती, बागायती, तसेच अन्य व्यवसायांत जे मजूर किंवा कामगार लागत, तेही शूद्रवर्णीय असत. हा वर्ण श्रमोपासना करून उपजीविका करत असे.

२. जातींच्या उत्पत्तीचा उद्देश

‘ज्ञानोपासना, बलोपासना, अर्थोपासना आणि श्रमोपासना ईश्वराने आपल्यावर सोपवली आहे’, या श्रद्धेने हा संपूर्ण भारतीय समाज कर्तव्यबुद्धीने कार्य करत असे. ही परंपरा सांभाळण्याच्या दृष्टीने जाती जोपासल्या गेल्या. वर्ण-जाती यांच्यातील लग्नसंबंध स्ववर्णात आणि स्वजातीतच होत. एकाच वर्णात अनेक जाती असत. त्या भौगोलिक किंवा शाखाभेदाने निर्माण झालेल्या होत्या.

३. ब्राह्मणांमधील जाती 

चार वेद आणि त्यांच्या अनेक शाखा यांच्या अध्ययनाप्रमाणे ब्राह्मणांत शाखाभेद असत. हिरण्यकेशी, आश्वलायन, माध्यंदिन, कण्व इत्यादी शाखांच्या भेदांमुळे त्या त्या शाखांतच लग्ने होत. सारस्वत, कोकणस्थ, कर्‍हाडे, देशस्थ इत्यादी ब्राह्मणांतील जाती या प्रादेशिक भेदांमुळे झाल्या. पैकी सारस्वत हे मूळ सरस्वती नदीच्या तीरावरील होते. मोठ्या दुष्काळ प्रसंगात त्यांनी मत्स्याहार चालू केला, असे म्हणतात. गौड ब्राह्मण हे मूळ गौड या प्रदेशातील होत. वंग देशापासून भुवनेश्वरपर्यंतच्या प्रदेशास ‘गौड देश’ असे नाव होते. हेही लोक अगदी मूळ सरस्वती तीरावरील असावेत; म्हणून त्यांना गौड सारस्वत असे ही नाव आहे.

कोकणस्थ हे मूळचे कोकणातीलच. त्यांच्या गोर्‍या रंगावरून आणि घार्‍या डोळ्यांवरून त्यांच्या उगमाचा संबंध अरब देशांशी लावण्याचा उद्व्याप इतिहासाच्या अज्ञानाचा किंवा दुष्ट हेतूने केलेल्या उद्व्यापाचा भाग आहे. कोणत्याही परकीय वंशाचा भारतीय वंशात इतका सहज संकर होऊ शकेल, हे भारतीय संस्कृतीच्या पोलादी भिंतींच्या संरक्षणामुळे असंभव आहे.

जातीपद्धतीत व्यवसायाची हमी, विनामूल्य व्यवसायशिक्षण, घरच्या घरी शिक्षण आणि घरच्या घरीच व्यवसाय, पोटासाठी घर सोडून बाहेर जाण्याची आवश्यकता नसणे, कौटुंबिक जीवनातील एकात्मता, बेकारीचा प्रसंग न येणे आणि एकूण स्थिर जीवन या गोष्टींचा लाभ होत असे.

(क्रमशः)

– भारताचार्य धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

लेखांक ८. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/805759.html