गेल्या आठवड्यात डग्लस मरे या ब्रिटीश लेखकाचे ‘द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप’ हे पुस्तक वाचायला प्रारंभ केला. हे पुस्तक वाचत असतांना इंटरनेटवर डग्लस मरे यांच्याच ‘इस्लामोफिलिया’ (Islamophilia – इस्लामची आवड) या विचित्र नावाच्या पुस्तकाने लक्ष वेधून घेतले. जगभरातील साम्यवादी पुरोगामी माध्यमे, तथाकथित इंटरनेटच्या माध्यमातून झालेले विद्वान (इंटरनेट इंटेलेक्च्युअल्स), हॉलीवूड इत्यादींमुळे आपण ‘इस्लामोफोबिया’ (इस्लामविषयीची भीती) या शब्दाशी एव्हाना परिचित झालेलो असतो; पण हे इस्लामविषयीचे ‘फिलिया’ हा काय प्रकार आहे हे मला कळेना. फिलिया म्हणजे आवड.
१० जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘इस्लामोफोब’ म्हणजे काय ? आणि अमेरिकेतील ‘इस्लामोफोबिया’विषयी पुस्तकात करण्यात आलेले भाष्य’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे दिला आहे.
लेखाचा भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/872081.html
६. ‘१००१ इस्लामी शोध’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून इस्लामचा तरुणांना आकृष्ट करणारा जिहाद

अनेकानेक विषण्ण करून सोडणार्या धक्कादायक अशा प्रसंगांनी हे पुस्तक भरलेले आहे; पण या सगळ्यात मला सर्वांत धोकादायक वाटलेले, म्हणजे लेखकाने दिलेल्या ब्रिटनमधील एका विज्ञान प्रदर्शनाचे उदाहरण. वर्ष २००६ पासून ब्रिटनमध्ये एका विज्ञानविषयक फिरत्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात यायला लागले. या विज्ञान प्रदर्शनाचा प्रारंभ (इस्लामबहुल अशा) मँचेस्टरमधून करण्यात आला. ‘फाऊंडेशन फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी अँड सिव्हिलायजेशन’ या संस्थेच्या माध्यमातून ‘समृद्ध मुसलमान वारसा’संदर्भात जनजागृती करण्यासाठी या प्रदर्शनाची योजना करण्यात आल्याचे सांगितले गेले. मुसलमान जगताने आधुनिक जगाला विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांसंदर्भात दिलेल्या देणगीची कल्पना आजच्या पिढीला यावी, हा या प्रदर्शनाचा उद्देश होता. या प्रदर्शनाचे नाव होते ‘१००१ इस्लामिक इन्व्हेंशन्स’ अर्थात् ‘१००१ इस्लामी शोध’. या प्रदर्शनाचे आयोजन अतिशय भव्यदिव्य स्वरूपात करण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी ब्रिटीश आमदार, खासदार, मंत्री यांसारख्या मान्यवरांना तर आवर्जून आमंत्रणे देण्यात आली होतीच; पण त्यासह न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी, ब्रसेल्समधील युरोपीय संसदेचे सभासद अशा जगभरातील अनेकानेक प्रबळ लोकांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर बेन किंग्जले या भारतीय वंशाच्या ब्रिटीश कलाकाराला घेऊन या प्रदर्शनावर एक लघुपट बनवून त्याचे जागतिक दौरे आयोजित करण्यात आले. हे प्रदर्शन बघायला लाखोंच्या संख्येने गर्दी लोटली, ज्यात शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भरणा अधिक होता.

प्रदर्शनात इस्लामने जगावर केलेल्या उपकारांची सूचीच्या सूची होती. घड्याळ, कॅमेरा, संगीत, स्वच्छता, भोजन, अन्नपदार्थ, फॅशन किंबहुना अगदी रुबिक्स क्यूबचा शोधसुद्धा इस्लामनेच लावला आहे, असे दावे केले गेले. कला, बीजगणित, भूमिती, लेखनकला, शेती, वैद्यकशास्त्रातील सारे शोध, धरणे, पवन चक्क्या, व्यापार, कापड, कागदनिर्मितीची कला, कुंभारकाम, काचनिर्मिती, दागिने, चलन हे सारे सारे जगाला इस्लाममुळे मिळाले, असेही ठामपणे सांगितले गेले. अगदी विमानाचा शोधही ९ व्या शतकात अब्बास इब्न फिरनास या मुसलमान माणसाने लावला, असे ठासून सांगितले गेले.
या प्रदर्शनांना सहस्रो, लाखो शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनी भेट देतात आणि आपण वापरतो ती प्रत्येक जीवनावश्यक वस्तू, प्रत्येक वैद्यकीय, स्थापत्य, विज्ञान यांविषयक शोध हा इस्लामनेच लावला आहे, हे असत्य त्यांच्या कोवळ्या मनावर नकळतपणेच; पण अगदी ठामपणे सत्य म्हणून बिंबवले जाते. त्यांच्या मनात आपोआपच इस्लामविषयी आदर निर्माण होतो, हळूहळू तो वाढत जातो आणि आपसूकपणेच ते इस्लामकडे आकृष्ट होतात. प्रारंभीच्या काळात तलवारीच्या बळावर आणि काही शतकांनी ती पद्धत कालबाह्य व्हायला लागल्यानंतर आधुनिक विश्वात लव्ह जिहाद, भूमी जिहाद, अनेक अपत्ये जन्माला घालून स्वतःची संख्या वाढवण्याच्या अनेक प्रयत्नांपैकी हा सर्वांत नवीन आणि अत्यंत आकर्षक अन् रक्तविहीन असा धर्मप्रचाराचा हा ‘कॅच-देम-यंग जिहाद’ (तरुणांना आकृष्ट करणारा जिहाद) म्हणावा लागेल.
(क्रमश: सोमवारच्या दैनिकात)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/873292.html
– हेरंब ओक, न्यूयॉर्क, अमेरिका. (८.१.२०२५)