विशाळगड येथे होणार्‍या उरूसाला प्रशासनाने अनुमती नाकारली !

विशाळगड

कोल्हापूर – शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड येथे १२ जानेवारीला होणार्‍या उरुसाला प्रशासनाने अनुमती नाकारली आहे, असे वृत्त दैनिक पुढारीने दिले आहे, तसेच काही वृत्तवाहिन्यांवरही दाखवण्यात आले. या संदर्भात नेमकी माहिती जाणून घेण्यासाठी शाहूवाडी येथील तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना दूरभाष केला; मात्र त्यांनी तो उचलला नाही. त्यामुळे या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही.

गेल्या ६ मासांपासून बंद असणारा विशाळगड ५ जानेवारीपासून प्रशासनाने काही अटी आणि शर्ती घालून खुला केला आहे. यापुढे कोणताही कार्यक्रम घ्यायचा असल्यास प्रशासनाची अनुमती घेऊनच तो घ्यावा लागेल, असेही त्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. विशाळगड येथील अतिक्रमणाविषयी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना लढा देत असून पूर्ण अतिक्रमण निघाल्यावरच गड खुला करावा, अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.

सांगलीत हिंदू गर्जना सभेत केलेल्या मागणीला यश ! – नितीन शिंदे 

या संदर्भात हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘१० जानेवारी या दिवशी सांगली येथे झालेल्या हिंदू गर्जना सभेत आम्ही मंत्री श्री. नितेश राणे यांच्यासमोर विशाळगड येथील सद्य:स्थिती मांडून कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावर उरूस भरवण्यास अनुमती देण्यात येऊ नये, अशी जाहीर मागणी केली होती. त्यावर मंत्री श्री. नितेश राणे यांनी ‘कोणत्याही परिस्थितीत तेथे उरूस होऊ देणार नाही. वेळप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक मावळा बनून आम्ही तिथे उभे राहू’, अशी सभेतच ग्वाही दिली होती. त्यामुळे सांगलीत हिंदू गर्जना सभेत केलेल्या मागणीला यश आले आहे, असेच म्हणावे लागेल.’’