
श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – येथील सनातनचे साधक डॉ. अमित मकवाना यांची कन्या कु. ओजस्वी ‘महाले पोद्दार लर्न स्कूल’मध्ये इयत्ता दुसरीत शिकत आहे. तिला ‘देववाणी संस्कृत श्लोक ऑलिंपियाड’ स्पर्धेत १० लेव्हल (स्तर) उत्कृष्टरित्या उत्तीर्ण झाल्याविषयी नागपूर येथे मान्यवरांच्या हस्ते ‘श्लोकाचार्य’ उपाधी आणि मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल ‘महाले पोद्दार लर्न स्कूल’चे अध्यक्ष ओम महाले, अमोल महाले, मुख्याध्यापिका श्वेता दंड, वर्षा आगाशे यांनी तिचे अभिनंदन केले.
ती अहिल्यानगर जिल्ह्यात ‘श्लोकाचार्य’ उपाधी मिळवणारी एकमेव विद्यार्थिनी आहे. मागील वर्षी तिने लेव्हल ५ आणि ६ मध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. ‘देववाणी’च्या संचालिका आणि ओजस्वीच्या आई डॉ. नेहा मकवाना म्हणाल्या की, ‘देववाणी ऑलिंपियाड’ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्कृत संवर्धनासाठी कार्य करणारी संस्था असून यावर्षी सहस्रों विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. स्पर्धेमुळे संस्कृत भाषेची ओळख आणि आदर निर्माण होतो. बोलणे प्रभावी होऊन स्पष्ट उच्चार, बुद्धीमत्ता आणि स्मरणशक्ती यांच्या विकासासाठी लाभ होतो.