Impeachment Motion On Justice Shekhar Yadav : न्यायमूर्ती यादव यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्तावाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

  • अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी ‘कठमुल्ला’ शब्द वापरल्याचे प्रकरण

  • काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी राज्यसभेत ठेवला होता महाभियोग प्रस्ताव !

न्यायमूर्ती शेखर कुमार यादव

प्रयागराज – अलाहाबाद उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या विरोधात संसदेत प्रविष्ट (दाखल) केलेल्या महाभियोग प्रस्तावाला आव्हान देणारी जनहित याचिका  फेटाळून लावली आहे. न्यायालयाने म्हटले की, समाजातील कमकुवत वर्गाच्या हितासाठी जनहित याचिकेची सुविधा असते. न्यायमूर्ती यादव स्वतः सक्षम आहेत. त्यांना वाटत असेल की, त्यांच्यावर अन्याय होत आहे, तर ते न्यायालयात जाऊ शकतात.

१. अधिवक्ता अशोक पांडे यांनी या प्रकरणी जनहित याचिका प्रविष्ट केली होती.  महाभियोग प्रस्तावावर राज्यसभेच्या अध्यक्षांना कोणतीही कारवाई करण्यापासून रोखण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांनी असा युक्तीवाद केला की, न्यायमूर्ती यादव यांनी हे विधान हिंदु समुदायाचे सदस्य म्हणून केले आहे आणि हे विधान द्वेषपूर्ण भाषणाच्या श्रेणीत येत नाही. राज्यघटनेच्या कलम १९ च्या अंतर्गत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि एक नागरिक असण्याच्या नात्याने न्यायमूर्तींनाही आहे. तसेच त्यांनी न्यायालयाच्या बाहेर केलेले वक्तव्य त्यांना न्यायमूर्तीच्या पदावरून हटवण्याचे कारण बनू शकत नाही.

२. न्यायमूर्ती अताउर रहमान मसूदी आणि न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपिठाने ही याचिका न्यायसंगत नसल्याचे सांगत ती फेटाळून लावली.

काय आहे प्रकरण ?

न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी गेल्या महिन्यात ८ डिसेंबरला प्रयागराज येथे विश्‍व हिंदु परिषद आयोजित कार्यक्रमात भाषण केले होते. त्यांनी म्हटले होते की, भारतातील शासन बहुसंख्य समुदायाच्या इच्छेनुसार असले पाहिजे. तसेच त्यांनी ‘कठमुल्ला’ यांसारखे शब्द वापरले होते, जे मुसलमान समुदायासाठी अवमानजनक असल्याचे सांगून त्याला विरोध करण्यात आला. काँग्रेसचे हिंदुद्वेष्टे खासदार कपिल सिब्बल यांनी इतर ५४ खासदारांसह राज्यसभेत न्यायमूर्ती यादव यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मांडला होता. न्यायमूर्ती यादव यांचे भाषण द्वेष पसरवणारे होते आणि त्यामुळे न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा दुखावली गेली आहे, असा आरोप या प्रस्तावातून करण्यात आला होता. (मुसलमानप्रेमाने संपूर्ण जीवन व्यतीत केलेल्या कपिल सिब्बल यांच्यासारख्या काँग्रेसी नेत्यांकडून अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला जाणे, यात काय आश्‍चर्य ? – संपादक)