
सातारा, ११ जानेवारी (वार्ता.) – निकोप समाजरचनेसाठी प्रगल्भ नेतृत्वगुण आवश्यक असतात. हे नेतृत्वगुण ग्रंथ व्यासंगातून जन्माला येतात. पुस्तकी पांडित्य एवढेच जगण्याचे भान देणारे व्यवहार ज्ञान महत्त्वाचे आहे. त्यासाठी उत्तम वाचन आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरीमध्ये २४ व्या सातारा ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते.
खांडेकर पुढे म्हणाले, ‘‘सातारा येथे सलग २४ वर्षे ग्रंथप्रदर्शन भरत आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. विद्यार्थ्यांना ग्रंथांपर्यंत घेऊन जाणे आणि ग्रंथ वाचनाची आवड निर्माण करणे, ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. त्यातून सुसंस्कृत वाचक घडत असतो. पुस्तकवाचन ही आयुष्यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या घरात एक छोटे ग्रंथालय निर्माण करावे. ग्रंथवाचनामुळे आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगले काम करू शकतो; मात्र एखादे काम करण्यामध्ये आपण निष्णात असायला हवे. पुस्तक प्रेमातून आपल्याला हे ध्येय गाठता येते, तसेच या देशाचे चांगले नागरिक म्हणून आपण देशाचा विकासही वाचन संस्कृतीच्या माध्यमातून घडवून आणू शकतो.’’