स्वामी विवेकानंद यांच्या स्वदेश आणि स्वधर्म यांविषयीच्या हृद्य आठवणी

उद्या, १२ जानेवारी या दिवशी ‘स्वामी विवेकानंद यांची १६२ वी जयंती आहे’, त्या निमित्ताने…

भारतातील बंगाल प्रांतात स्वामी विवेकानंद यांच्या रूपात एक तेजस्वी संन्यासी जन्माला आला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच नरेंद्र गुरूंच्या शोधात फिरत होता. दक्षिणेश्वरला वास्तव्य करणारे रामकृष्ण परमहंस मात्र नरेंद्राची प्रतीक्षा करत होते. ज्याने ‘आपल्या गुरूंना कधीही पाहिले नाही, आपले गुरु कोण हेही ज्याला नीट माहिती नाही’, असा नरेंद्र गुरूंच्या शोधात फिरत होता; पण रामकृष्ण परमहंस यांनी आपल्या ज्ञानचक्षुंनी आपल्या शिष्याला पाहिले होते. लौकिक अर्थाने कोणत्याही प्रकारचे शिक्षण न घेतलेले रामकृष्ण परमहंस मात्र साक्षात्कारी असल्यामुळे गुरूंचे गुरु होते.

अशा गुरूंचा आंग्ल विद्याविभूषित शिष्य नरेंद्र आध्यात्मिक विद्या आत्मसात् करण्यासाठी व्याकुळ झाला होता. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व प्राप्त झाल्यावर नरेंद्र आध्यात्मिक ज्ञानाने परिपक्व झाला. भारतभर प्रवास करून आपला देश, संस्कृती, समाज जाणण्याच्या हेतूने पायी प्रवास करणारा आधुनिक काळातील संन्यस्त वृत्तीचा तरुण नरेंद्र ‘स्वामी विवेकानंद’ झाल्यावर शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत गेला. तिथे हिंदु धर्माची महती सार्‍या जगाला सांगून धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध केले. वेद, उपनिषदांसारख्या अनेक ग्रंथातून ज्ञानाची गंगा अविरतपणे वहाणार्‍या भारत भूमीचे पर्यायाने सनातन हिंदु धर्माचे प्रतिनिधीत्व स्वामी विवेकानंद यांनी जागतिक धर्म परिषदेत केले. अशा स्वामी विवेकानंद यांना आपल्या उज्वल ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक परंपरेविषयी नितांत आदर होता. मायभूमीविषयी असलेला जाज्ज्वल्य अभिमान त्यांच्या आचार, विचार आणि वाणी यांतून सहजतेने प्रकट होत होता. याचा अनुभव सार्‍या जगाने घेतला.

स्वामी विवेकानंद

१. स्वामी विवेकानंद यांच्या स्वदेशाभिमानावरून दांभिकतेने विचारणा करणार्‍या व्यक्तीला त्यांनी दिलेले परखड उत्तर

स्वामी विवेकानंद यांचा स्वदेशाभिमान ऐकून कुणीतरी त्यांना म्हणाले, ‘स्वदेशावर प्रेम करणे, हे गृहस्थाश्रमी लोकांना शोभून दिसते; कारण ते गृहस्थाश्रमी लोकांचे कर्तव्य आहे. तथापि एखाद्या संन्याशाने आपल्या देशावरील माया, ममता सोडून जगातील सर्व देशांकडे समदृष्टी ठेवून त्यांच्या कल्याणाची कामना मनात बाळगावी, हे अधिक श्रेयस्कर आहे.’

यावर स्वामी विवेकानंद त्या गृहस्थाला म्हणाले, ‘स्वतःच्या आईला जो दोन घास खाऊ घालू शकत नाही, तो दुसर्‍याच्या आईला काय पोसणार ? आपल्या प्रचलित धर्मात, आचार व्यवहारात, सामाजिक रूढीत अनेक दोष आहेत, हे मी मान्य करतो. या सर्व दोषांचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. म्हणून या सार्‍या गोष्टी वृत्तपत्रांमधून इंग्रजांसमोर उघड्या करण्याची आवश्यकता नाही. घरातील बारीक सारीक दोष गाजावाजा करून बाहेर सांगत बसण्याचा मूर्खपणा कुणीही करू नये. आपल्या मांडीवर झालेला घाव रस्त्यातून जाणार्‍या येणार्‍याला दाखवण्यात काहीही अर्थ नाही. घरातील घाणेरडे कपडे बाहेरच्या लोकांना दिसतील, अशा ठिकाणी टांगून ठेवणे उचित नाही.

श्री. दुर्गेश परुळकर

इंग्रजांनी आपल्या देशावर उपकार केल्याची भावना मनात बाळगणे, ही लाचारी आहे. ही गुलामगिरीची मानसिकता आहे. इंग्रजांनी आपल्यावर कोणतेही उपकार केलेले नाहीत. देशातील लोकांच्या मनातील श्रद्धा समूळ नष्ट करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. श्रद्धेसह मानवतेचाही नाश होतो, हे किती लोकांना कळते ? आपल्या देवीदेवतांची निंदा आणि आमच्या धर्माची कुचाळी (कुचेष्टा) केल्यावाचून त्यांना स्वतःच्या धर्माचे श्रेष्ठत्व दाखवता येत नाही. ज्या धर्माचा प्रचार करायचा, त्यावर प्रचारकाचा पूर्ण विश्वास असला पाहिजे. एवढेच नाही, तर त्याची वागणूकसुद्धा त्याला अनुसरून असली पाहिजे. अनेक मिशनरी लोक तोंडाने बोलतात एक आणि वागतात वेगळेच. मला असल्या दांभिकतेची भयंकर चीड आहे.’

‘जगातील सर्वांत श्रेष्ठ आणि पुरातन असलेला हिंदु धर्म अन् भारतभूमी त्याविषयी अभिमान बाळगणे, कृतज्ञतेची भावना जतन करणे, म्हणजे कोणत्या मायापाशात अडकणे’, असा अर्थ होत नाही. महानतेची ओळख करून देण्यासाठी गृहस्थाश्रमीच असावे लागते, असे नाही. संन्यासीसुद्धा आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित करू शकतो. हीच हिंदु धर्माची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. आद्यशंकराचार्य हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, हे सांगण्यास स्वामी विवेकानंद विसरले नाहीत.

(क्रमश: सोमवारच्या दैनिकात)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/873241.html

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली.