भारतीय संस्कृतीतील समाजजीवन !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी लेखन केलेली ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

प्रकरण ३

मागील भाग येथे वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/804749.html

पू. प्रा. सु.ग. शेवडे

‘धारणाद्धर्म इत्याहुर्धर्मेण विधृताः प्रजाः ।’ (महाभारत, शान्तिपर्व, अध्याय ११०, श्लोक ११)
अर्थ : धर्म प्रजेची धारणा करतो. प्रजेला धरून ठेवतो. सर्व प्रजा धर्मबंधनांनी बांधलेली असे.

‘अगा जया जें विहित । तें ईश्वराचें मनोगत ।।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी ९११), म्हणजे ‘अरे अर्जुना, ज्याला जे उचित कर्म सांगितलेले आहे, तेच त्याने करावे, असे ईश्वराचे मनोगत आहे’, असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.

(लेखांक ६)

१. ४ वर्ण आणि त्यांची कर्तव्ये !

१ अ. ब्राह्मण : अध्ययन, अध्यापन, यजन (यज्ञ करणे), याजन (पूजा), दान आणि प्रतिग्रह (ग्रहण करणे) ही ब्राह्मणाची कर्तव्ये सांगितली आहेत. ब्राह्मणाने स्वतः वेदशास्त्रांचे अध्ययन करावे, तेच पुढील ब्राह्मणांना शिकवावे. यज्ञ-यागादी धार्मिक कर्मे स्वतः करावीत. लोकांकडूनही ती करून घ्यावीत. सत्पात्रे दान द्यावे आणि दानावरच आपले जीवन चालवावे. अर्थात् पिढ्यान्‌पिढ्या अध्ययन करत असायच्या. ज्ञानोपासना करायच्या. त्यामुळे पुढच्या पुढच्या पिढ्यांत आनुवंशिक गुण वृद्धींगत होत. शुचिर्भूत रहाणी, शुद्ध अन्नाचे भक्षण, पवित्रतेवर आत्यंतिक भर, विरक्तवृत्ती ही ब्राह्मणाच्या जीवनाची महत्त्वाची अंगे असत.

ब्राह्मणाने श्रीमंत होऊ नये. द्रव्यसंचय करू नये. लोकांकडून धार्मिक कर्मे करून घ्यावीत. त्यासाठी संपूर्ण समाजाने त्याला आदर्श मानावे, असे त्याचे वर्तन हवे. ‘वर्णानां ब्राह्मणो गुरुः ।’ (चाणक्यनीती, अध्याय ५, श्लोक १), म्हणजे ‘ब्राह्मण हा चारही वर्णांतील लोकांचा गुरु होय’, अशा त्याच्या आचारधर्मामुळेच सर्व वर्णियांना तो आदरणीय असे. तसा तो नसेल, तर समाज त्याला धिक्कारत असे. ‘यादृशं भक्षयेदन्नं बुद्धिर्भवति तादृशी ।’, म्हणजे ‘जसे अन्न खावे, तशी बुद्धी होते’; म्हणून ब्राह्मणाने शुद्ध आणि सात्त्विक आहारच घ्यावा. ही पथ्ये ब्राह्मणाला सांगितली आहेत.

१ आ. क्षत्रिय : संपूर्ण समाज सुसंरक्षित असायला हवा. कुणी आपल्या राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहू नये; असा खंबीर, सामर्थ्यवान, बलवान, बलोपासक समाज म्हणजे क्षत्रिय समाज. नित्य व्यायाम करावा. शरीर बलवान बनवावे. शरिराला सुदृढ बनवणारे उत्तम अन्न खावे. शस्त्रास्त्रांचे ज्ञान घ्यावे. अश्वारोहण, दांडपट्टा, भालाफेक, मल्लखांब अशा अनेक गोष्टींचा सराव करावा. शरीर भक्कम बनवावे. चपळ बनवावे. नेमबाजी करता येण्यासाठी रानावनात जाऊन धावत्या अतीचपळ हरिण, ससा अशा प्राण्यांच्या शिकारी कराव्यात. त्या निरपराध, गरीब प्राण्यांची मरतांनाची तडफड पाहूनही मन द्रवू नये, असे मनास शिक्षण द्यावे. मृत शाकाहारी प्राण्यांची शरीरे फुकट न घालवण्यासाठी मांसाहार करावा. अर्थात् हा नित्याचा आहार नसे. वाघ-सिंहासारख्या हिंस्र प्राण्यांचीही शिकार करावी. त्यातून शरीर आणि मन यांचे सामर्थ्य वाढते; परंतु हिंस्र मांसाहारी प्राण्याचे मांस अत्यंत निषिद्ध आणि खाण्यायोग्य नसल्याने त्याच्या शरिराचे चामडे, नखे इत्यादी उपयुक्त वस्तू काढून घ्याव्यात. राजसत्ता सांभाळावी आणि आपल्या राष्ट्राच्या रक्षणार्थ जीवित वेचावे, हा क्षात्रधर्म आहे, असा हा एक सुसंस्कृत वर्ग !

१ इ. वैश्य : शेती, गोसंवर्धन, व्यापार-उदीम ही वैश्यांची कर्तव्ये आहेत. विविध शेतमालाचे उत्पादन, देशोदेशीहून आपल्या लोकांना लागणार्‍या वस्तूंची खरेदी आणि विक्री, गोपालन, दूध-दुभते उत्पादन आणि विक्री करणे. पिढीजात व्यापारादी मार्गाने अर्थोपासना करणारा हा वर्ण देशाला पुष्कळ कर देऊन संपन्न करत असे. यांच्याच द्वारे राष्ट्र अर्थसंपन्न होई. वैश्य वर्ण हा कधीही योद्धा नसे. त्याच्याकडून ती अपेक्षाही नसे. त्यामुळे त्याला शिकार आणि मांसाहार वर्ज्य असत. हा वर्ग आहाराच्या संदर्भात जवळजवळ ब्राह्मणासारखा असे. तरीही आत्यंतिक शुद्धतेचा, सोवळ्या-ब्राह्मणी कटाक्ष यांच्याकडून अभिप्रेत नसे; मात्र हा वर्ग सुसंस्कृत, सश्रद्ध आणि दातृत्वशील असे. संपन्न असल्याने मोठमोठी घरे, त्यांतील कलाकुसर, नक्षीकाम, दागदागिने, फर्निचर, जडजवाहिर यांची त्यांना हौस असायची. त्या सर्व हौशी पूर्ण करण्यानिमित्त अनेक कलाकार आणि कारागीर यांना त्यांचा आश्रय मिळत असे. देशाचा व्यापार जितका मोठा, तितके उत्पादन मोठे ! संपूर्ण देशाला या वैश्यांनी श्रीमंत केले.

(क्रमशः)

– भारताचार्य धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

लेखांक ७. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/805407.html