श्रीराममंदिरानंतर आता ‘हिंदु राष्ट्रा’साठी संघटित प्रयत्न आवश्यक ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

गोव्यात २४ जूनपासून चालू होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सोलापूरमधील हिंदुत्वनिष्ठही सहभागी होणार 

सोलापूर, १८ जून (वार्ता.) – ५०० वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत उभे राहिलेले प्रभु श्रीरामाचे मंदिर हे हिंदु राष्ट्र निर्मितीच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल आहे. तथापि सध्या हिंदूंसमोरील समस्या सोडवण्यासाठी हिंदूंची ‘इकोसिस्टम’ (सुनियोजित कार्यप्रणाली) निर्माण करून ‘हिंदु राष्ट्रा’साठी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी १८ जून या दिवशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. या वेळी तुळजापूर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. बापू ढगे, ‘अक्कलकोट प्रज्ञापीठ’चे अध्यक्ष श्री. प्रसाद पंडित, भाजपचे माजी नगरसेवक श्री. चंद्रकांत रमणशेट्टी, पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्‍वस्त आणि उद्योजक श्री. सत्यनारायण गुर्रम आणि पूर्वभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय साळुंखे हे मान्यवर उपस्थित होते.

डावीकडून श्री. सत्यनारायण गुर्रम, श्री. प्रसाद पंडित, श्री. किशोर गंगणे, श्री. राजन बुणगे, श्री. बापू ढगे, श्री. चंद्रकांत रमणशेट्टी आणि श्री. संजय साळुंखे

श्री. बुणगे पुढे म्हणाले, ‘‘जागतिक स्तरावर विविध देशांमधील वाढत जाणारी युद्धे आणि अस्थिरता पहाता हिंदु धर्म हा विश्‍वबंधुत्वाची आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ची संकल्पना मांडून सर्व समाजाला जोडू शकणारा एकमेव धर्म आहे. यासाठीच हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही बारावे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’, म्हणजेच ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे होणार आहे. या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, घाना, नेपाळ आणि बांगलादेश या देशांतून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी येणार आहेत. यासह भारतातील २६ राज्यांतील १ सहस्रांहून अधिक हिंदु संघटनांच्या २ सहस्रांहून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आह. सोलापूर जिल्ह्यातील अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता या महोत्सवाला उपस्थित रहाणार आहेत.’’

६५ वर्षांत हिंदूंची लोकसंख्या ८ टक्क्यांनी घटली, तर मुसलमानांची ४३.१५ टक्क्यांनी वाढली !

या निवडणुकीच्या काळात जाहीर झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले की, भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५० ते २०१५ या ६५ वर्षांच्या कालावधीत हिंदूंची लोकसंख्या अनुमाने ८ टक्क्यांनी न्यून झाली आहे. त्या तुलनेत याच कालावधीत मुसलमानांची लोकसंख्या अनुमाने ४३.१५ टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढ अनैसर्गिक म्हणावी लागेल; कारण भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर यांची संख्या वाढत चालली आहे. त्यांना पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड यांसारखी भारतीय नागरिकत्वाची ओळखपत्रे बनवून देणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे, तसेच सीएए आणि एन्.आर्.सी. संपूर्ण भारतात त्वरित लागू केले पाहिजे.