साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
भ्रमणभाषच्या आधारे संपर्क करून किंवा लघुसंदेश पाठवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. तात्कालिन सामाजिक समस्या, नागरिकांची अगतिकता, अज्ञानीपणा, भोळेपणा आदी कारणांनी समाजातील अनेक दुष्प्रवृत्ती लुबाडणूक करत असतात. अशाच प्रकारे पुढील काही कारणांसाठी आधारकार्ड क्रमांक, ‘ए.टी.ए.म्.चा पिन’, ‘ओटीपी’ मागून किंवा पाठवलेली लिंक ‘क्लिक’ करण्यास सांगून नागरिकांची फसवणूक यापूर्वीही करण्यात आली होती अन् अजूनही होत आहे.
१. अशी केली जाते भ्रमणभाषद्वारे फसवणूक
अ. वीजदेयक वेळेत न भरल्याने आज रात्री ९.३० वाजता तुमचे वीज कनेक्शन बंद होणार आहे. ते बंद न होण्यासाठी आमच्या…….. फोन क्रमांकावर फोन करावा.
आ. भ्रमणभाषचे ‘सिम कार्ड’ 4G मधून 5G मध्ये ‘ट्रान्सफर’ करायचे आहे. ते केले नाही, तर तुमचे ‘कार्ड ब्लॉक’ होईल आणि ते पुन्हा कधीच चालू करता येणार नाही. भ्रमणभाष कंपनीच्या ‘सर्व्हिस सेंटर’मधे जाऊन ही प्रक्रिया करता येणार नाही. त्यामुळे ‘आॅनलाईन’ पद्धतीने हे करावे लागेल.
इ. अबकारी खात्यातून (‘फॉरेन एक्सचेंज’मधून) किमती वस्तूंची सोडवणूक करायची आहे.
ई. ‘तुमची काही नको ती छायाचित्रे माझ्याकडे आहेत’ किंवा ‘तुम्ही मला संपर्क केला होता. तुमचा ‘मिस्ड कॉल’ पाहून मी पुन्हा संपर्क केला’, असे धादांत खोटे बोलणे. नागरिकांनी नकार दिल्यास फसवणूक करणारे अरेरावीने बोलतात.
उ. काही वेळा ‘Any Desk ॲप इन्स्टॉल’ करण्यासाठीही सांगितले जाते.
अशा वेळी कोणत्याही परीस्थितीत आपल्या मोबाईलवर ‘Any Desk’ किंवा मोबाईलवर बोलत असलेल्या व्यक्तीने सांगितलेले अन्य कोणतेही ॲप ‘इन्स्टॉल’ करू नये.
ऊ. काही वेळा भ्रमणभाष घेतल्यानंतर एक ‘आय.व्ही.आर्. ऑडिओ (स्वयंचलित टेलिफोन प्रणाली)’ चालू होतो आणि ‘तुमचा फोन नंबर दोन घंट्यांत ‘डिॲक्टिव्ह’ होत आहे. याविषयी अधिक माहितीसाठी ९ क्रमांक दाबा’, अशी सूचना येते.
अशा वेळी तो ‘कॉल कट’ करून आपले ‘ सिम कार्ड’ असलेल्या कंपनीच्या ‘ग्राहक सेवा केंद्र’ (सर्व्हिस प्रोव्हायडर) येथे संपर्क साधावा.
२. ‘फोन किंवा मेसेज’ आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता फोन ‘कट’ करावा !
फसवणूक करणार्यांकडून एकूणच परिस्थितीचा अपलाभ घेत गोड बोलण्यातून नागरिकांना भुरळ घातली जाते अथवा घाबरवले जाते. या वेळी सतर्कतेच्या अभावी फसवणूक करणार्या लोकांच्या भूलथापा किंवा पारितोषिकांच्या आमिषांना भुलल्याने नागरिकांची फसवणूक होते. त्यामुळे नागरिकांना अशा प्रकारे कोणताही फोन किंवा मेसेज आल्यास त्यांनी घाबरून जाऊ नये. आपले मोबाईलचे ‘सिम कार्ड’ असे अकस्मात् बंद होत नाही किंवा विद्युत् जोडणीही बंद केली जाऊ शकत नाही. वर उल्लेखलेला कोणताही प्रकार घडत नसतो. त्यामुळे अशा प्रसंगी न घाबरता अथवा कोणत्याही ‘ऑफर’ने हुरळून न जाता आत्मविश्वासाने आणि शांतपणे उत्तर देऊन फोन ‘कट’ करावा.
३. फसवणुकीचा आणखी एक प्रकार लक्षात घेऊन ‘पेमेंट ॲप्स’वरील विनावापर खाती रितसर बंद करा !
काही वेळा साधक ‘पेटीएम्’, ‘गूगल पे’ किंवा ‘मोबिक्विक’ अशा संकेतस्थळांवर पैसे देवाणघेवाणीचे खाते चालू करतात. कालांतराने त्यातील एखाद-दुसरे खाते वापरू लागतात आणि अन्य खाती तशीच रहातात. अशा प्रकारच्या जुन्या बंद असणार्या खात्यांच्या ‘पे लेटर’ (आता खर्च करा, पुढच्या मासात पैसे भरा !) या सुविधेचा वापर परस्पर करून फसवणूक करण्यात येऊ शकते. त्यामुळे साधकांची विनावापर कोणती खाती असतील, तर ती त्यांनी रितसर पद्धतीने बंद करावीत.
वास्तविक पहाता ‘कोणत्याच कारणाने नागरिकांना भ्रमणभाषवर आधारकार्ड क्रमांक, ‘ए.टी.ए.म्.ची पिन’, ‘ओटीपी’ मागितला जात नाही’, असे शासन-प्रशासन, ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ इत्यादींनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. हे लक्षात घेऊन कुणीही आधारकार्ड क्रमांक, ‘ए.टी.ए.म्.ची पिन’, ‘ओटीपी’ यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास किंवा बक्षीस मिळाल्याची ‘लिंक’ पाठवून ती ‘क्लिक’ करण्यास सांगितल्यास त्याकडे कटाक्षाने दुर्लक्ष करावे. अशा प्रकारच्या भूलथापांना प्रतिसाद देऊन स्वतःची आर्थिक फसवणूक होऊ देऊ नये !
अशा प्रकारचे फसवणुकीचे प्रकार झाल्यावर गुन्हा नोंदवल्यानंतर त्याचे अन्वेषण करूनही काही लाभ होत नाही. दोषी सापडण्याचे अन् त्यांना दंड होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. त्यामुळे ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ (एखादी वाईट गोष्ट घडून गेल्यावर ती सुधारण्यापेक्षा प्रथमतः ती घडू न देणे कधीही चांगले ! ) यानुसार वेळीच सावधानता बाळगून आपली होणारी संभाव्य हानी टाळावी. स्वतः सतर्क राहून कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांनाही सावध करावे ! |