Puri Jagannath Temple : जगन्नाथ मंदिराची बंद असलेली ३ द्वारे उघडली !

  • ओडिशात भाजप सरकारने मंदिराविषयी घेतला मोठा निर्णय

  • कोरोना महामारीच्या कालावधीपासून भाविकांना ४ पैकी केवळ एका द्वारातून दिला जात होता प्रवेश !

पुरी जगन्नाथ मंदिर

भुवनेश्‍वर – ओडिशामध्ये भाजपचे सरकार स्थापन होताच त्याने मंदिराविषयी पहिला मोठा निर्णय घेतला आहे. शपथविधीनंतर काही वेळातच मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी मंत्रीमंडळाची बैठक बोलावून पुरी जगन्नाथ मंदिराचे चार पैकी बंद असलेली ३ द्वारे उघडण्याची संमती दिली. एवढेच नाही, तर मंदिराच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी निधी उभारण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मुंख्यमंत्री आणि इतर मंत्री यांच्या उपस्थितीत सर्व द्वारे उघडण्यात आली. ‘हा आमच्यासाठी अतिशय भावनिक क्षण आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले. मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याची मागणी लोकांनी केली होती.


काय आहे प्रकरण ?

जगन्नाथ मंदिराच्या ४ दिशांना ४ द्वारे आहेत. पूर्वेकडील द्वाराला सिंहद्वार म्हटले जाते. ‘या मार्गावरून जो भाविक प्रवेश करतो, त्याला मोक्षप्राप्ती होते’, अशी लोकांची श्रद्धा आहे. उत्तरेकडील द्वाराला हस्ती(हत्ती)द्वार, दक्षिणेकडील द्वाराला अश्‍वद्वार आणि पश्‍चिमेकडील द्वाराला व्याघ्रद्वार म्हटले जाते. अश्‍वद्वारातून प्रवेश करणार्‍या भाविकामधील काम नष्ट होतो, व्याघ्रद्वार हे धर्म आणि धार्मिकता यांची जाणीव होते, तर हस्तीद्वारातून प्रवेश करणार्‍याला धनाची प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे हे प्रत्येक द्वार भाविकांसाठी खोलावेत, अशी मागणी केली जात होती.

‘मंदिराची सर्व द्वारे उघडणार’, हे भाजपच्या निवडणूक घोषणापत्रातील आश्‍वासन होते. आता ते आश्‍वासन पूर्ण केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. द्वारे बंद असल्याने भाविकांचे प्रचंड हाल होत होते. कोरोना महामारीनंतर तत्कालीन बिजू जनता दल सरकारने मंदिराचे सिंहद्वार सोडून उर्वरित ३ द्वारे बंद केली होती. भाविकांना एकाच दरवाजातून प्रवेश करता येत होता. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते.


मंदिरासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उभारणार !

मुख्यमंत्री मांजी म्हणाले की, मंत्रीमंडळाने मंदिराचे संवर्धन आणि देखभाल यासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिराच्या कारभारात हस्तक्षेप करणार नाही; पण तेथे कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

संपादकीय भूमिका

सत्तेत येताच तात्काळ निर्णय घेणार्‍या भाजप सरकारचे अभिनंदन ! आता सरकारने मंदिराच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !