सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. भगवंत कुमार मेनरायकाका (वय ८५ वर्षे) यांच्या देहत्यागानंतर सनातनच्या सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय (वय ८५ वर्षे) यांच्या देहत्यागानंतरचा आज ११ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…

पू. भगवंत मेनराय

‘सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८५ वर्षे) यांनी ४.६.२०२४ या दिवशी सायंकाळी ७.१५ वाजता देहत्याग केला. त्यानंतर देवाच्या कृपेने माझ्याकडून त्यांच्या देहत्यागाचे आणि अंत्यविधींचे झालेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.        (भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/803536.html

५. पू. मेनरायकाकांचे पार्थिव स्मशानात आणल्यावर शिवाच्या ‘रुद्र’ या रूपाने त्यांचे दर्शन घेणे आणि पार्थिवाला अग्नी दिल्यावर चिताग्नीच्या ज्वालांमध्ये शिवाच्या तिसर्‍या नेत्रात वास करणारे ‘वैश्वानर’ हे अग्नीचे रूप प्रगट होणे

पू. मेनरायकाकांमध्ये ७ टक्के इतक्या प्रमाणात शिवतत्त्व कार्यरत होते. त्यांचे पार्थिव स्मशानात, म्हणजे रुद्रभूमीत आणल्यावर सूक्ष्म रूपात वास करणार्‍या शिवाच्या ‘रुद्र’ या रूपाने (स्मशानातील शिवाच्या रूपाला रुद्र म्हणतात. त्यामुळे स्मशानाला ‘रुद्रभूमी’ असेही म्हटले जाते.) पू. मेनरायकाकांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आल्यावर त्यांच्यातील शिवतत्त्व जागृत होऊन चिताग्नीच्या ज्वालांमध्ये शिवाच्या तिसर्‍या नेत्रात वास करणारे ‘वैश्वानर’ हे अग्नीचे रूप प्रगट झाले. त्यामुळे पू. मेनरायकाकांचे अंत्यविधी होत असतांना ‘मृत्यूत्तर विधी होत आहेत’, असे न वाटता ‘यज्ञकर्माप्रमाणे पवित्र विधी होत आहेत’, असे जाणवले. त्या वेळी स्मशानातही चैतन्य पसरल्यामुळे स्मशानाला यज्ञशाळेप्रमाणे दिव्य स्वरूप प्राप्त झाले होते.

६. ‘पू. मेनरायकाकांचे पृथ्वीवरचे तप पूर्ण होऊन आता शिवलोकात तप चालू झाले आहे,’ असे देवाने सांगणे

सुश्री (कु.) मधुरा भोसले

पू. मेनरायकाका समष्टी संत असल्यामुळे त्यांचा लिंगदेह शिवलोकात गेला आणि त्याला सायुज्य मुक्ती मिळाली, म्हणजे त्यांचे सूक्ष्म रूप शिवाच्या सगुण रूपाशी एकरूप झाले. तेव्हा शिवाने पू. मेनरायकाकांना सांगितले, ‘कलियुगाची आणखी ५०० वर्षे पूर्ण झाल्यावर पृथ्वीवर स्थापन केलेले हिंदु राष्ट्र अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी श्रीविष्णूचे अंशावतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पृथ्वीवर पुन्हा जन्म घेणार आहेत. तेव्हा त्यांच्या अवतारी कार्यामध्ये अनेक दैवी जीव सहभागी होणार आहेत. तेव्हा तुम्ही (म्हणजे पू. मेनरायकाका) पृथ्वीवर जन्म घेणार आहात आणि तुम्हाला ‘सद्गुरु’ अन् ‘परात्पर गुरु’ ही आध्यात्मिक पदे प्राप्त होणार आहेत. त्यानंतर काही काळानंतर तुम्हाला मोक्ष मिळणार आहे, म्हणजे तुमचे सूक्ष्म रूप माझ्या (शिवाच्या) निर्गुण रूपाशी, म्हणजे ईश्वराशी एकरूप होणार आहे. तोपर्यंत तुमचे सूक्ष्म रूप माझ्या सगुण रूपात समाधिस्त रहाणार आहे.’ याविषयी देवाने सांगितले, ‘पू. मेनरायकाकांचे पृथ्वीवरचे तप पूर्ण होऊन आता त्यांचे शिवलोकात तप चालू झाले आहे.’

 

७. पू. मेनरायकाका सनातनच्या इतिहासात अजरामर झाले !

शिवभक्ती केली अंतर्मुख होऊन ।
शिवाची कृपा झाली निस्सीम भक्ती करून ।। १ ।।

शिवाचे मन जिंकले ध्यानसाधना करून ।
जीवन सार्थक झाले श्री गुरूंची कृपा प्राप्त करून ।। २ ।।

कर्मयोग आणि भक्तीयोग यांचा सुरेख संगम झाला  ।
ज्ञानयोगाची जोड मिळाल्याने आत्मसाक्षात्कार झाला ।। ३ ।।

पृथ्वीवरील जीवन पूर्ण करून शिवलोकी गेले ।
पू. मेनरायकाका सनातनच्या इतिहासात अजरामर झाले ।। ४ ।।

पू. मेनरायकाकांनी विविध योगमार्गांनी केलेल्या साधनेचे प्रमाण, त्यांच्या देहाभोवती निर्माण झालेल्या संरक्षककवचाचा सूक्ष्म रंग आणि त्यांच्या साधनेचे स्वरूप 

‘हे भगवंता, तुझ्या कृपेने माझ्याकडून पू. मेनरायकाकांच्या देहत्यागाचे आणि त्यांच्या अंत्यविधीचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा झाली अन् तू आम्हाला सूक्ष्म स्तरावरील सूत्रांचे ज्ञान दिलेस’, त्याबद्दल मी तुझ्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘पू. मेनरायकाकांसारखी निस्सीम भक्ती आम्हा साधकांमध्येही निर्माण होऊ दे’, अशी तुझ्या सुकोमल चरणी आर्त प्रार्थना आहे.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.६.२०२४)

(समाप्त)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.