पू. भगवंत कुमार मेनरायकाका (वय ८५ वर्षे) यांच्या देहत्यागानंतर सनातनच्या सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

 ‘सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८५ वर्षे) यांनी ४.६.२०२४ या दिवशी सायंकाळी ७.१५ वाजता देहत्याग केला. त्यानंतर देवाच्या कृपेने माझ्याकडून त्यांच्या देहत्यागाचे आणि अंत्यविधींचे झालेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे. (भाग १)

पू. भगवंत मेनराय

१. पू. भगवंत कुमार मेनरायकाकांनी उत्तरायणात आणि शिवरात्रीच्या दिवशी देहत्याग करणे

सुश्री (कु.) मधुरा भोसले

१ अ. पू. मेनरायकाकांनी उत्तरायण पूर्ण होण्यापूर्वी देहत्याग केल्याने त्यांचा मृत्यू सात्त्विक काळात होणे : उत्तरायणात पृथ्वीभोवती तेजतत्त्वाचे वायूमंडल कार्यरत असते, तर दक्षिणायनात पृथ्वीतत्त्वाचे वायूमंडल कार्यरत असते. पृथ्वीतत्त्वापेक्षा तेज, वायु आणि आकाश ही पंचमहाभूते अधिक सात्त्विक अन् चैतन्यदायी असतात. पू. मेनरायकाकांनी दक्षिणायन आरंभ होण्याआधी ४ जूनलाच देहत्याग केल्यामुळे त्यांचा देहत्याग सात्त्विक काळात झाला. (२०.६.२०२४ या दिवशी दक्षिणायन प्रारंभ होत आहे.)

१ आ. पू. मेनरायकाकांनी भौमप्रदोषाच्या दिवशी आणि शिवरात्र या तिथीला देहत्याग केल्यामुळे त्यांच्या लिंगदेहाला मृत्यूत्तर प्रवासात शिवलोकातून वायु आणि तेज या स्तरांवरील आध्यात्मिक ऊर्जा अन् चैतन्य मिळाल्याचे जाणवणे : ४.६.२०२४ या दिवशी वैशाख कृष्ण त्रयोदशी होती. या दिवशी भौमप्रदोष (मंगळवारी येणारा प्रदोष. शिवाला प्रसन्न करण्यासाठी केलेल्या व्रताला ‘भौमप्रदोष’ म्हणतात.) आणि शिवरात्र होती. त्यामुळे या तिथीला नेहमीपेक्षा शिवतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत होते. या शुभतिथीला पू. मेनरायकाकांनी देहत्याग केल्यामुळे त्यांच्या लिंगदेहाला शिवलोकातून वायु आणि तेज या स्तरांवरील आध्यात्मिक ऊर्जा अन् चैतन्य मिळाल्याचे जाणवले. त्यांच्या लिंगदेहाला मृत्यूत्तर प्रवास करण्यासाठी पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक ऊर्जा मिळाल्याचे जाणवले, तसेच त्यांच्या पार्थिवाभोवती शिवाच्या भस्माप्रमाणे दिसणारे करड्या रंगाचे तेजस्वी वलय संरक्षककवचाच्या स्वरूपात कार्यरत असल्यामुळे पृथ्वीवर सगुण-निर्गुण या स्तरांवर आक्रमणे करणार्‍या पाताळातील वाईट शक्तींना पू. मेनरायकाकांच्या पार्थिवावर नियंत्रण मिळवता आले नाही.

२. पू. मेनरायकाकांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र !

२ अ. पू. मेनरायकाकांच्या पार्थिवात पुष्कळ प्रमाणात चैतन्य असल्यामुळे ते सजीव असल्याप्रमाणे त्यात जिवंतपणा जाणवत होता.

२ आ. पू. मेनरायकाकांचा मृत्यू आनंदावस्थेत झाला असून ते अखंड आनंदावस्थेत असणे : पू. मेनरायकाकांच्या देहत्यागाच्या वेळी ते तुर्यावस्थेत असून सानंद समाधी अवस्था अनुभवत होते. त्यांच्या लिंगदेहाची ही आध्यात्मिक अवस्था टिकून राहिल्यामुळे त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत असतांना ‘ते गाढ निद्रेत आहेत’, असे मला जाणवले. (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. मेनरायकाकांची मुलगी सुश्री (कु.) संगीता मेनराय यांना सांगितले, ‘‘पू. मेनरायकाकांचा मृत्यू आनंदावस्थेत झाला असून ते अखंड आनंदावस्थेत आहेत.’’)

२ इ. शिवाने पू. मेनरायकाकांच्या पार्थिवाच्या रक्षणासाठी वासुकी नागाला पाठवणे : पू. मेनरायकाका शिवभक्त होते. त्यांच्या पार्थिवाचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण करण्यासाठी शिवाने त्याच्या गळ्यातील वासुकी नागाला पू. मेनरायकाकांकडे पाठवले. मी पू. मेनरायकाकांच्या पार्थिवाचे दर्शन घेत असतांना मला त्यांच्या डोक्याजवळ पिवळ्या रंगाच्या दैवी नागाचे दर्शन झाले. त्यानंतर तो नाग त्यांच्या डोक्यापासून त्यांच्या चरणांपर्यंत गेला आणि त्याने त्याचा फणा वाकवून पू. मेनरायकाकांच्या चरणांना स्पर्श करून त्यांना नमस्कार केला. वासुकी नागाकडून ही क्रिया चालू असतांना तो तारक रूपात होता. जेव्हा पाताळातून धुराप्रमाणे असलेली एक आकृती पू. मेनरायकाकांच्या पार्थिवाकडे आली, तेव्हा वासुकी नागाने मोठ्याने फुत्कार करून वाईट शक्तीवर वायूचा प्रवाह सोडला. त्यामुळे ती वाईट शक्ती पळून गेली.

२ ई. शिवगणांनी पू. मेनरायकाकांच्या पार्थिवाभोवती बेलपत्र, रुद्राक्ष आणि भस्म यांचे मंडल घालणे : शिवगणांनी पू. मेनरायकाकांच्या पार्थिवाभोवती बेलपत्र, रुद्राक्ष आणि भस्म यांचे मंडल घातले होते. त्यामुळे पू. मेनरायकाकांच्या पार्थिवाभोवती शिवतत्त्वाचे संरक्षककवच निर्माण होऊन त्यांचा पार्थिव देह शिवतत्त्वमय चैतन्याने भारित झाला होता.

३. पू. मेनरायकाकांवर शिवाची विशेष कृपा असल्याचे सिद्ध होणे

३ अ. पू. मेनरायकाकांचे प्राण त्यांच्या आज्ञाचक्रातून बाहेर पडल्यावर त्यांच्या लिंगदेहाचे रूपांतर चंदेरी रंगाच्या तेजस्वी ज्योतीमध्ये होणे : ‘पू. मेनरायकाका शिवभक्त असल्यामुळे त्यांची शिवावर पुष्कळ श्रद्धा होती आणि त्यांच्या खोलीत पारदशिवलिंग म्हणजे पार्‍याचे शिवलिंग होते. त्याची ते नियमितपणे पूजा करत होते’, असे मला त्यांची कन्या सुश्री संगीता मेनरायकडून समजले. त्यांच्यावर शिवाची विशेष कृपा होती. ४.६.२०२४ या दिवशी त्यांच्या देहत्यागापूर्वी शिवाने नंदी आणि भृंगी (नंदीनंतर प्रमुख असणार्‍या दुसरा शिवगण) या प्रमुख शिवगणांना पू. मेनरायकाकांकडे पृथ्वीवर पाठवले होते. पू. मेनरायकाकांना शेवटची घरघर लागल्यावर शिवगणांनी ‘हर हर महादेव’ असा जयघोष करून शिवाला प्रार्थना केली. त्यानंतर पू. मेनरायकाकांचे प्राण त्यांच्या आज्ञाचक्रातून बाहेर पडले. तेव्हा त्यांच्या लिंगदेहाचे रूपांतर चंदेरी रंगाच्या तेजस्वी ज्योतीमध्ये झाले. त्या ज्योतीभोवती पिवळसर रंगाची कड होती. गणाध्यक्ष नंदीने ही दिव्य ज्योत त्याच्या ओंजळीत घेतली आणि तो शिवलोकाकडे निघाला. तेव्हा पृथ्वीपासून शिवलोकापर्यंतचा सूक्ष्म मार्ग बेलाच्या पानांनी आच्छादित करण्यात आला होता. त्याच्या समवेत असणार्‍या शिवगणांच्या हातात त्रिशूळ होते आणि ते पू. मेनरायकाकांच्या मृत्यूत्तर प्रवासात येणारे अडथळे दूर करत होते.

३ आ. पू. मेनरायकाकांचा लिंगदेह शिवलोकात गेल्यावर चंद्रदेव आणि चंद्रदेवाची पत्नी रोहिणी यांनी पू. मेनरायकाकांच्या तेजस्वी चंदेरी रंगाच्या ज्योतीची निरांजन ओवाळून आरती करणे अन् शिवगणांनी पुष्पवृष्टी करणे : जेव्हा नंदी आणि शिवगण शिवलोकात आले, तेव्हा त्यांचे स्वागत शिवाच्या मस्तकावरील चंद्रदेवाने केले. चंद्रदेव आणि चंद्रदेवाची पत्नी रोहिणी यांनी पू. मेनरायकाकांच्या तेजस्वी चंदेरी रंगाच्या ज्योतीची निरांजनाने ओवाळून आरती केली अन् शिवगणांनी पुष्पवृष्टी गेली. त्यानंतर शिव ध्यानातून बाहेर आला आणि त्याने डमरू वाजवून पू. मेनरायकाकांच्या लिंगदेहाचे स्वागत केले. शिव समाधीतून बाहेर आल्यामुळे त्याचे तेज पूर्णपणे जागृत होऊन प्रगट झाले होते. त्यामुळे शिवाने धारण केलेले नवनाग सोन्याच्या अलंकारांप्रमाणे चमकत होते.

३ इ. पू. मेनरायकाकांचा चंदेरी रंगाच्या ज्योतीच्या स्वरूपातील लिंगदेह शिवाच्या हृदयात सामावला जाणे आणि पू. मेनरायकाकांना सायुज्य मुक्ती मिळणे : त्यानंतर मला चंदेरी रंगाच्या ज्योतीमध्ये पू. मेनरायकाकांचे सूक्ष्म रूप दिसले. त्या रूपाने शिवाला दोन्ही हात जोडून भावपूर्ण वंदन केले आणि त्यानंतर ही ज्योत शिवाने त्याच्या उजव्या हाताच्या तळव्यावर धारण केली. तेव्हा पार्वतीदेवीने या ज्योतीला कापराच्या आरतीने ओवाळले. शिवाने पू. मेनरायकाकांनी आतापर्यंत केलेली साधना आणि त्यांची शिवभक्ती यांचे सविस्तर वर्णन केले. त्यानंतर शिवाने पू. मेनरायकाकांच्या सूक्ष्म रूपाची इच्छा जाणून घेतली. तेव्हा पू. मेनरायकाकांच्या सूक्ष्म रूपाने शिवाशी एकरूप होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ही पू. मेनरायकाकांची चंदेरी रंगाची ज्योत शिवाच्या हृदयात सामावली गेली. त्यामुळे पू. मेनरायकाकांना सायुज्य मुक्ती मिळाली. तेव्हा शिव प्रसन्न झाला आणि शिवलोकात वैराग्याचे प्रतीक असणार्‍या भस्माचा सुगंध पसरला आणि त्यानंतर पवित्र असणार्‍या शिवतत्त्वाने युक्त असणार्‍या कापराचा मधुर सुगंध दरवळला.’ (क्रमशः)

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.६.२०२४)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.