दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सांगली येथे खंडणी उकळणार्‍या धर्मांधाला अटक !; पुण्यात ३३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त !…

सांगली येथे खंडणी उकळणार्‍या धर्मांधाला अटक !

सांगली, ११ जून (वार्ता.) – ‘बंदुकीच्या धाकाने १२ लाख रुपयांची खंडणी उकळणारा संशयित आरोपी आणि यासीन खलील इनामदार (रा. हडको वसाहत) याला संजयनगर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्य संशयित आरोपींचा शोध चालू आहे’, अशी माहिती पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी दिली.

पुण्यात ३३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त !

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघातून ‘महायुती’चे (भाजपचे) मुरलीधर मोहोळ यांनी ‘महाविकास आघाडी’चे उमेदवार (राष्ट्रीय काँग्रेसचे) रवींद्र धंगेकर यांचा १ लाख १८ सहस्र ८७८ मतांनी पराभव केला. या दोघांव्यतिरिक्त मतदारसंघातून निवडणूक लढवणार्‍या ३३ उमेदवारांची ८ लाख २५ सहस्र रुपये अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाली आहे. त्यामध्ये ‘वंचित बहुजन आघाडी’चे उमेदवार वसंत मोरे यांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरतांना स्वत:ची माहिती, मालमत्तांचे विवरणपत्र, प्रतिज्ञापत्र यांसह २५ सहस्र रुपये अनामत रक्कम भरावी लागते.

देहलीत जाऊन मराठी माणसाचा आवाज बुलंद करा !

राज ठाकरे यांची खासदार नरेश म्हस्के यांना सूचना

मुंबई – देहलीत गेलात, तरी मराठी माणसाला विसरू नका. मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्हाला देहलीत पाठवले आहे, असे उद्गार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथील नवनिर्वाचित खासदार, शिवसेना नेते नरेश म्हस्के यांना उद्देशून काढले. राज ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊनच प्रचाराला प्रारंभ केला असल्याचे त्यांनी म्हटले होते.