नवी देहली – २१ जून या दिवशी देशात ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ चालू केला होता. यंदा १० वा ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा केला जाणार आहे. योगदिन साजरा करण्यास चालू झाल्यापासून देशभर योग उपक्रमांची जनजागृती झाली. अनेकांनी योग करण्यास प्रारंभ करून आयुष्यात अमूलाग्र पालट घडवून आणला आहे. यंदाच्या योगदिनाला अवघे १० दिवस उरलेले असतांना पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘योगा’ला जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन लोकांना केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ आवाहनच केले नाही, तर त्यांच्या डिजिटल रूपातील योग प्रशिक्षकाचे काही व्हिडिओही प्रदर्शित केले आहेत. या व्हिडिओमध्ये मोदी यांच्या डिजिटल रूपातील प्रशिक्षक योगाचे विविध प्रकार शिकवतांना दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर प्रसारित केलेल्या एका ‘पोस्ट’मध्ये म्हटले आहे की, यंदा जग दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करेल. या उपक्रमातून एकता आणि सुसंवाद साधला जाईल. योगाने सांस्कृतिक आणि भौगोलिक सीमा ओलांडल्या आहेत आणि त्याने जगभरातील लाखो लोकांना सर्वांगीण कल्याणासाठी एकत्र केले आहे.