१. ‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात देशभरातून अनेक साधक आणि जिज्ञासू आश्रम पहाण्यासाठी, तसेच शिबिरांत सहभागी होण्यासाठी येत असतात. आश्रमात येणार्या प्रत्येकाला चांगल्या अनुभूती येतात.
२. रामनाथी आश्रमातील सात्त्विक वातावरणामुळे आश्रमात काही मास रहाणार्या साधकांच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत वाढ होणे
आश्रमात जाणार्या साधकांच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत वाढ होते. त्यांना पुष्कळ गोष्टी शिकायला मिळतात. जे साधक स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवण्यासाठी काही मासांसाठी आश्रमात येतात, त्यांच्यातील स्वभावदोष अन् अहं यांचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात अल्प होते. याचे मुख्य कारण, म्हणजे रामनाथी आश्रमातील वातावरण सात्त्विक आहे. तेथील साधक गुरुसेवा आनंदाने, झोकून देऊन आणि भावपूर्ण करत असतात. तिथे त्यांना अनेक संतांचा सहवास मिळतो. यामुळे आश्रमात पुष्कळ मोठ्या प्रमाणात चैतन्य आहे.
३. साधक आणि जिज्ञासू घरी गेल्यावर त्यांच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत खंड पडत असणे आणि त्यांना रामनाथी आश्रमात मिळालेले चैतन्य त्यांच्यात टिकून न रहाणे
साधक किंवा जिज्ञासू यांनी आश्रमात व्यवस्थितपणा, वेळेचे काटेकोर पालन करणे, चेहर्यावर हास्य ठेवणे, भावजागृतीचे प्रयत्न करणे, सेवेची तळमळ, प्रेमभाव हे सर्व अनुभवलेले आणि त्यांना शिकायला मिळालेले असूनही ते त्यांच्या घरी गेल्यावर त्याप्रमाणे कृती करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. साधकांचे व्यष्टी साधनेचे जे प्रयत्न रामनाथी आश्रमात गतीने होतात, त्यांत काहीतरी कारणांनी खंड पडतो. साधकांनी आश्रमात ग्रहण केलेले चैतन्य ते घरी गेल्यानंतर टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे टाळतात. त्यामुळे त्यांनी आश्रमात ग्रहण केलेले चैतन्य काही काळानंतर अल्प होते आणि साधक पुन्हा मूळ स्थितीत येतो. आपल्या घरचे वातावरण रामनाथी आश्रमाएवढे चैतन्यमय नसते; कारण तसे चैतन्य निर्माण करण्यासाठी करावे लागणारे कठोर प्रयत्न साधकांकडून होत नाहीत.
४. आश्रमात ग्रहण केलेले चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी साधकांनी करायचे प्रयत्न !
अ. साधकांनी आश्रमात असतांना वहीत लिहून घेतलेल्या सूत्रांचे वाचन ते घरी गेल्यानंतर लगेच करावे. ‘प्राधान्याने कोणत्या गोष्टी कृतीच्या स्तरावर करू शकतो’, याचे चिंतन करून त्या करायला हव्यात. त्यांनी वहीत लिहिलेली सूत्रे अधूनमधून वाचायला हवीत.
आ. साधकांनी नामजप, प्रार्थना, कृतज्ञता आणि अन्य आध्यात्मिक स्तरावरील उपाय पूर्ण व्हावेत, याकडे लक्ष द्यायला हवे.
इ. साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया प्रामाणिकपणे राबवायला हवी. त्यांनी सतत अंतर्मुख राहून स्वतःचे निरीक्षण करावे. ‘मी इतरांमध्ये पालट करू शकत नाही; मात्र मी स्वतःमध्ये निश्चितच पालट करू शकतो’, हे अध्यात्मातील महत्त्वाचे सूत्र साधकांनी लक्षात ठेवून सातत्याने प्रयत्नरत रहायला हवे.
ई. साधकांनी ‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूकडे कटाक्षाने लक्ष ठेवून निरपेक्षभावाने प्रत्येक कृती करायला हवी.
उ. कुटुंबातील सदस्य साधना करणारे असतील किंवा नसतील, तरीही साधकांनी त्यांच्यात गुरुरूप पाहून त्याप्रमाणे कृती करायला हवी. त्यामुळे साधकांमध्ये सहजतेने प्रेमभाव निर्माण होऊ शकतो.
ऊ. साधक आश्रमात असतांना भावजागृतीसाठी करत असलेले प्रयत्न त्यांनी घरी असतांनाही करायला हवेत.
ए. साधकांनी ‘स्वतःचे घर, म्हणजे प.पू. डॉक्टरांचा आश्रमच आहे’, असा भाव ठेवून प्रत्येक कृती करण्याचा प्रयत्न करावा.
५. साधकांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रती व्यक्त करायची कृतज्ञता !
रामनाथी आश्रम हा साक्षात् वैकुंठासम आहे. तिथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा निवास आहे. त्या आश्रमात जाण्याची संधी मिळणे, हे साधकांचे अहोभाग्य आहे. सर्वांनी याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेतला, तर ती गुरुचरणी खरी कृतज्ञता ठरेल.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सुचवलेली ही शब्दसुमने त्यांच्या पवित्र चरणांवर कृतज्ञताभावाने समर्पित करतो.’
– गुरुचरणदास,
(पू.) अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत), अमरावती (१७.५.२०२४)