पालखी प्रस्थानदिनी देऊळवाड्यामध्ये ५६ दिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकर्‍यांनाच प्रवेश !

  • श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा !

  • पालखी प्रस्थान सोहळा बैठकीतील निर्णय !

संत ज्ञानेश्वर महाराज

पिंपरी (जिल्हा पुणे) – श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यादिनी देऊळवाड्यामध्ये गर्दी होऊ नये, यासाठी दिंड्यातील ठराविक वारकर्‍यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ‘श्रीं’च्या रथापुढील २०, मागील २७ आणि ९ उपदिंड्या, अशा ५६ दिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकर्‍यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मंदिर प्रवेशपत्र पालखी प्रस्थानाच्या २ दिवस पूर्वी चोपदार आणि संस्थान यांच्याकडून देण्यात येतील. प्रस्थान सोहळ्याच्या नियोजनाविषयी देवस्थानच्या भक्तनिवासामध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मंदिराच्या क्षेत्रफळाचा विचार करून अनावश्यक गर्दी न्यून करण्याविषयी या बैठकीमध्ये चर्चा झाली. वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी प्रस्थानादिनी १२५, १०० किंवा ९५ वारकरी संख्या निश्चित करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे वरील निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला.

गेल्या वर्षी मंदिरामध्ये प्रवेशाच्या वेळी महाद्वारात, वारकरी शिक्षण संस्थेच्या बोळासमोरून महाद्वाराकडे येतांना वारकर्‍यांची गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली होती. त्या वेळी वारकरी विद्यार्थी आणि पोलीस यांच्यामध्ये वादावादी झाली. गर्दी न्यून करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला होता. असा अनुचित प्रकार यापुढे घडू नये, यासाठी वरील उपाययोजना काढण्यात आली.