Pakistani Terror Attack Reasi Pilgrims : जम्मूतील हिंदु भाविकांवरील आक्रमणामागे पाकिस्तानी आतंकवादी !

जम्मूतील हिंदु भाविकांवरील आक्रमणाचे प्रकरण

जम्मू – येथील रियासी भागामध्ये श्री वैष्णौदेवी मंदिराकडे जाणार्‍या हिंदु भाविकांच्या बसवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ७ भाविक, १ बसचालक आणि बसवाहक यांचा मृत्यू झाला. आतंकवाद्यांनी बसचालकावर केलेल्या गोळीबारानंतर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. त्यानंतरही आतंकवाद्यांनी बसवर गोळीबार केला. आतंकवाद्यांनी ३० ते ४० गोळ्या झाडल्या. यामुळे बसमध्ये घायाळ झालेले नागरिक निपचित पडून राहिले. दोन्ही आतंकवादी पाकिस्तानी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार या आतंकवादी आक्रमणामागे अबू हमजा या आतंकवाद्याचा हात असून त्याचा शोध चालू आहे.

बसमध्ये उत्तरप्रदेश, देहली आणि राजस्थान येथील भाविकांचा समावेश

ज्या बसवर आक्रमण झाले, त्यामध्ये उत्तरप्रदेश, देहली आणि राजस्थान राज्यांतील भाविक प्रवास करत होते. यांतील घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सरकारकडून मृतांच्या नातेवाइकांना हानीभरपाई म्हणून १० लाख, तर घायाळांना ५० सहस्र रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी !

या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एन्.आय.ए.कडे) सोपवण्यात आली आहे. ड्रोनद्वारे घटनास्थळी अन्वेषण केले जात आहे. न्यायवैद्यक पथक घटनास्थळी पोचले आहे.

बसमध्ये मेल्याचे नाटक करून पडून राहिल्याने वाचलो ! – भाविकाने सांगितली स्थिती

बसमधील प्रवासी भाविकाने सांगितले की, आमची बस दरीत कोसळल्यानंतरही आतंकवादी बसवर गोळीबार करत होते. ते मध्ये मध्ये थांबून आमच्या बसवर गोळीबार करत होते. त्यामुळे आम्हाला बसमध्ये मेल्याचे नाटक करून पडून रहावे लागले. आतंकवाद्यांनी अनुमाने २० मिनिटे गोळीबार केला. ३० मिनिटांनंतर पोलीस घटनास्थळे पोचले आणि आम्हाला बाहेर काढले.

अन्य एका भाविकाने सांगितले की, तेथे ६-७ आतंकवादी होते. त्यांचे चेहरे ‘मास्क’ने झाकलेले होते. आरंभी त्यांनी रस्त्यावर बसला घेरले आणि गोळीबार केला. बस दरीत पडल्यावर ते बसच्या दिशेने खाली आले आणि सर्व लोक मारले गेले याची निश्‍चिती करण्यासाठी गोळीबार करत राहिले. आम्ही गप्प पडलो होतो.

‘द रेसिस्टन्स फ्रंट’ने स्वीकारले आक्रमणाचे दायित्व !

या आतंकवादी आक्रमणाचे दायित्व लष्कर-ए-तोयबाची शाखा असणार्‍या ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या जिहादी आतंकवादी संघटनेने स्वीकारले आहे. या संघटनेला पाकिस्तानचे समर्थन आहे. या संघटनेचे आतंकवादी घटना घडली, तेथील जंगलात लपले होते आणि अचानक बससमोर येऊन त्यांनी गोळीबार केला.

संपादकीय भूमिका

  • गेली ३४ वर्षे पाकिस्तान भारतात, विशेषतः काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करत आहे, हे जगजाहीर असतांना भारताने पाकला कायमस्वरूपी धडा कधीच शिकवला नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
  • ही आक्रमणे हिंदूंवर होत असूनही हिंदूंनी या संदर्भात सरकारवर कधीही दबाव न आणल्याने ही स्थिती पुढेही कायम रहाणार आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये ! जर ही स्थिती पालटायची असेल, तर हिंदूंना संघटित होऊन सरकारवर दबाब आणणे आवश्यक आहे !
  • यापूर्वीही आतंकवाद्यांनी हिंदु भाविकांच्या बसला लक्ष्य करून अनेक निष्पाप हिंदूंना ठार मारले आहे. या आक्रमणातून सरकारने काहीच धडा घेतला नाही का ? जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंवरील संकट पहाता अशा बसगाड्यांमध्ये सशस्त्र पोलीस का नसतात ? , याचे उत्तर हिंदूंना मिळाले पाहिजे !