आर्थिक फसवणूक झाल्याने शहापूर येथील शेतकर्‍यांचे उपोषण, दीड महिना उलटूनही मुख्य आरोपी पसार !

शहापूर येथे ‘आमरण उपोषणा’स बसलेले शेतकरी

खामगाव (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – ‘आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तरीही या प्रकरणी न्याय मिळत नसल्याने तालुक्यातील शहापूर येथील शेतकर्‍यांनी ५ जूनपासून स्थानिक ग्रामपंचायती समोर ‘आमरण उपोषण’ चालू केले आहे. दीड महिन्याचा कालावधी उलटूनही आरोपी पसार असल्याने अन्वेषणयंत्रणा अकार्यक्षम आहेत’, असा आरोप येथील शेतकर्‍यांनी केला आहे. या उपोषणात रामकृष्ण मोरखडे, रामदास चराटे, भास्कर कोगदे आदी सहभागी झाले आहेत.

जिल्हाधिकारी सागर मेतकर यांना शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, ग्राम शहापूर येथील सुनील हरिदास पारखेडे, गणेश हरिदास पारखेडे, हरिदास उपाख्य हरिभाऊ दौलत पारखेडे यांनी शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यांच्या विरोधात खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात १ एप्रिल २०२४ या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचे अन्वेषण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे.

या प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी सुनील पारखेडे हा पसार असून सहआरोपी गणेश पारखेडे, हरिदास पारखेडे हे जामिनावर सुटले आहेत. हे आरोपी वेगवेगळ्या पद्धतीने तक्रादारावर दबाव आणत असून तक्रारीच्या विरोधात खोटे गुन्हे नोंद करण्याच्या धमक्या देत आहेत. या प्रकरणामध्ये अन्वेषणाच्या संदर्भात ५० ते ५२ दिवसांचा कालावधी उलटूनही मुख्य आरोपी पसार असून अन्वेषणयंत्रणा अन्वेषण करण्यामध्ये असक्षम ठरलेली आहे. (साध्या गुन्ह्यातील आरोपींना अटक न करणारे असे पोलीस आतंकवाद्यांना कसे शोधणार ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • न्यायाअभावी शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येणे हे प्रशासनाला लज्जास्पद !
  • अन्वेषणयंत्रणा अकार्यक्षम !
  • शेतकर्‍यांनी तक्रार करून दीड महिना झाला, तरी मुख्य आरोपी पोलिसांना कसे काय सापडत नाहीत ?
  • जामिनावर सुटलेले आरोपी तक्रारदार शेतकर्‍यांवर दबाव घालण्याचे धाडस कुणाच्या जोरावर करत आहेत, हे शोधले पाहिजे ! शासनकर्ते आणि वरिष्ठ यांनी लक्ष घालणे आवश्यक !